आपले प्राचीन भारतीय अन्न 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपण गेले काही आठवडे जगभरातून आपल्या ताटात आलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती घेत आहोत. दक्षिण अमेरिकेतून आलेल्या बटाटा, टोमॅटो, काजू, अननस, सीताफळापासून ते सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशातल्या गहू, हरभरा ते अंजीर, पिस्त्यासारख्या सुक्‍या मेव्यापर्यंत! पण मग हे सगळे वाचून तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, की भारतात नेमके काय खाल्ले जात होते? सुमारे पाचशे वर्षांपूर्वी वास्को द गामा भारतात येण्यापूर्वी, किंबहुना त्याच्याही आधी कितीतरी शतके आपले नेमके अन्न कसे होते? आपण अर्थातच मिरी, दालचिनी, वेलदोडा, लवंग यांसारखे भारतात उगम पावलेले मसाले जाणून घेतले. पण आपल्याकडे कोणती धान्ये, भाज्या, फळे होती हा प्रश्‍न पडणे अगदी स्वाभाविक आहे. 

तांदूळ हे आपले मूळ भारतीय धान्य. पण त्या जोडीने आपल्याकडे जी मुख्य प्रवाहात नव्हती अशी बरीच धान्ये होती. आपल्या जुन्या साहित्यात अठरा पगड धान्ये असा उल्लेख आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात ही धान्ये खाल्ली जात असत. तुम्ही कधी सातू, राळे, सावा ही नावे ऐकली आहेत का? ही सध्या आपल्या मुख्य प्रवाहात नसलेली; पण पूर्वी अन्नात असलेली धान्ये आहेत. त्या काळात आपल्या जेवणातल्या मुख्य भाज्या वांगी, तोंडली, पडवळ आणि अनेक प्रकारच्या शेंगा या होत्या. याखेरीज लोक रानातून दर हंगामात मिळणाऱ्या रानभाज्या अगदी आवडीने खात असत. टाकळा, पोकळा, भारंगी, कुरडू या आणि अशा अनेक भाज्या होत. तेल मुख्यतः तिळाचे असे. मूग, लाखाडी यासारख्या डाळी आणि उत्तर आणि दक्षिण भारतात विपुल खाल्ला जाणारा उडीद आपल्या अन्नात होता. 

फळांच्या बाबतीत आपला देश अत्यंत समृद्ध होता. फळांचा राजा मानला गेलेला आंबा मूळचा भारतीयच होय. त्याखेरीज फणस, कवट, लिंबूवर्गीय फळे, जांभूळ यांसारखी अनेक फळे आपल्या आहारात होती. जेवणाला गोडी आणणारा आणि जगात इतरत्र कुठेही नसलेला ऊस आपल्याकडे होता. अर्थात भारतात विविधता असल्याने सगळ्या भागात हे सारेच उपलब्ध नव्हते; पण तरी त्या त्या प्रदेशातील उपलब्धतेनुसार खाल्ले जाणारे अनेक घटक होते. तेव्हा यानंतरच्या काही आठवड्यात आपण याच अस्सल भारतीय असलेल्या आपल्या आहारातील काही वनस्पतींचा परिचय करून घेणार आहोत.

संबंधित बातम्या