उसाचा रसदार प्रवास 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, माणसाच्या आजवरच्या उत्क्रांतीच्या प्रवासात ज्या वनस्पतींनी त्याला मोलाची साथ दिली त्यात गवताचा क्रमांक फार वरचा लागतो. या गवतात बहुतांश धान्ये आहेत, पण या जोडीने असेही एक गवत आहे ज्याने आपल्या आयुष्यात गोडवा आणला; ते आहे ऊस! 

उसाचे उगमस्थान पापुआ न्यू गिनी आहे. तेथून हे उसाचे पूर्वज तब्बल आठ हजार वर्षे आधीच इंडोनेशियामार्गे भारतात पोचले होते. मात्र भारतातच त्याच्यावर संकर आणि सुधारणा होऊन आपला आजचा ऊस तयार झाला. दीड हजार वर्षांपूर्वी आपल्याकडे साखर तयार करायला सुरुवात झाली होती असे मानतात. ही साखर म्हणजे आजच्या खडीसाखरेचे पूर्वजच होय. भारतातून मध्यपूर्वेमार्गे ऊस इजिप्तमध्ये पोचला आणि तेथे व्यापारीदृष्ट्या शुद्ध स्वरूपात साखर तयार करायचे कारखाने सुरू झाले. आपल्याकडे ऋग्वेद, अथर्ववेदात उसाचे म्हणजे ईक्षुचे उल्लेख आहेत. चरक ऋषींनीही उसाचे प्रकार सांगितले आहेत. समुद्रमार्गे भारतात पोचणे शक्‍य व्हायच्या आधीही भारतात काही युरोपियन, ग्रीक प्रवासी येऊन गेले. त्यांनी भारतातल्या उसाचे वर्णन केले आहे. सम्राट अलेक्‍झांडरच्या दरबारातील निरकस नावाचा सैन्याधिकारी सर्वमान्य युगापूर्वी साडेतीनशे वर्षे आधी भारतात येऊन गेला होता. त्या काळात ग्रीकांना पदार्थाला गोडपणा आणण्यासाठी मध हा एकच पदार्थ माहीत होता. या निरकसने ग्रीसला परत गेल्यावर उसाचे वर्णन ‘मध भरलेला तरीही जवळपास मधमाशा नसलेला बांबू’ असे केले होते. हे वर्णन ऐकून ग्रीक मंडळी नक्कीच अचंबित झाली असणार. त्यानंतर आलेल्या इब्न बतूतानेही केरळमधील उत्तम उसाचे वर्णन केले आहे. गुळाच्या आणि साखरेच्या खूप आधीपासून असलेल्या उपलब्धतेमुळे भारतात गोड पदार्थांची प्रचंड विविधता आहे. मात्र पारतंत्र्याच्या काळात उसाची मागणी वाढल्यामुळे आपल्याला काही काळ जावामधून ऊस निर्यात करावा लागला. पुढे मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नांतून कोईम्बतूरला ऊस संशोधन संस्था सुरू झाली. या संस्थेने नंतर उसाची अनेक नवनवीन वाणे विकसित केली आणि आपण साखरेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. भारतामधूनच ऊस युरोपात गेला याचा अजून एक पुरावा आहे. इंग्रजीत साखरेसंदर्भातले शुगर, सॅकरिन किंवा उसाचे वनस्पतिशास्त्रीय नाव सॅकॅरम हे सारे शब्द संस्कृत शर्करा या शब्दावरूनच आले आहेत.  उसाचे अनेक रानटी भाऊबंद आपल्याकडे वाढतात. महाराष्ट्रातही नदीपात्रातही अशा काही जाती आहेत. उसाचा गोडवा म्हणजे या वनस्पतीने खोडात साठवलेली साखर. मात्र या वनस्पतीच्या मुळांमध्ये ही साखर अजिबातच नसते. आता कळले ना ऊस गोड लागला तरी मुळासकट का खायचा नाही ते! 

संबंधित बातम्या