खिचडीचा मूग

डॉ. मंदार नि. दातार
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपल्या प्राचीन भारतीय अन्नामधील तीन ‘म’ आठवत आहेत ना? माष, मसूर आणि मूग. आपल्या आजच्या अन्नात तूर आणि हरभऱ्याचे प्राबल्य होण्याआधी मूग आणि माष म्हणजे उडीद आपल्याकडे लोकप्रिय होते. भारतातच हिमालयाच्या पायथ्याशी एका रानवनस्पतीपासून मूग आणि उडीद हे दोनही उत्क्रांत झाले, असे अभ्यासक मानतात. त्यानंतर कधीतरी ही रानटी वनस्पती लागवडीखाली आणली गेली. सर्वमान्य युगाच्या तब्बल हजार वर्षे आधीही यजुर्वेदासारख्या ग्रंथात मुगाचे संदर्भ आहेत. पण त्याही आधी पाचशे वर्षे मूग वापरात असल्याचे पुरावे नर्मदातीरी मध्य प्रदेशात महेश्‍वरजवळ उत्खननात सापडले आहेत. 

मूग आपल्या भारतीय अन्नाचा महत्त्वाचा भाग होता ही निरीक्षणे अनेकांनी केली आहेत. ‘इब्न बतुता’सारख्या भारतात आलेल्या प्रवाशांनी आपल्या मुगाच्या खिचडीविषयी लिहून ठेवले आहे. नल राजाने लिहिलेल्या ‘पाकदर्पण’ या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे म्हटले आहे. हा ग्रंथ भारतात पूर्वी नेमक्‍या कोणत्या वनस्पती खाल्ल्या जात हे माहीत करून घेण्यासाठी मोलाचा आहे. कारण तो पंधराव्या शतकाच्या आधी लिहिला गेला असल्याने वास्को दा गामा येथे यायच्या आधीच्या खाद्य वनस्पती यात आहेत. नल राजाच्याही आधी चरक ऋषींनी मुगाचा संदर्भ दिला आहे. त्यांनी मुगाला तुवरिका असे नाव वापरले आहे. मात्र मराठीतले मूग किंवा हिंदीतले मुंग ही नावे संस्कृतमधील ‘मुद्ग’ वरून आली आहेत. 

आजही भारतभर मूग अगदी चवीने खाल्ला जातो. हिरव्या रंगाचे मूग जास्त लोकप्रिय आहेत. याच हिरव्या रंगावरून ब्रिटिशांनी त्याला ‘ग्रीन ग्राम’ असे नाव दिले. मात्र हिरव्याबरोबरच काळे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचेही मूग भारतात काही ठिकाणी मिळतात. उडिदाप्रमाणे मूग भारतातच न राहता तो आशियाभर अनेक देशांमध्ये गेला आणि तिथल्या अन्नाचा भाग झाला. इंडोनेशियात मुगाची खीर केली जाते तर फिलिपाईन्समध्ये मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. चीन, कोरिया मध्येही मूग खाल्ला जातो. आपल्याकडेही मूग - उसळ, आमटी, खिचडी यासारख्या तिखट पदार्थांबरोबरच शिऱ्यासारख्या गोड पदार्थांतही वापरतात. मूग गेली साडेतीन ते चार हजार वर्षे आपल्या अन्नात आहे. ‘मूग गिळून गप्प बसणे’ हा लोकप्रिय वाक्‍प्रचारही एका अर्थे आपल्या समाज जीवनातील मुगाचे महत्त्वच सांगणारा आहे. 

संबंधित बातम्या