मधुर फणस

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, साखर आणि गूळ जेव्हा आजच्या इतके प्रचलित नव्हते, तेव्हा गोडपणासाठी फळे हा एक महत्त्वाचा स्रोत होता. वास्को दा गामा इकडे यायच्या आधी आजइतकी फळांची विविधता जरी नसली तरी आपल्या आहारात विविध चवींची अनेक फळे होती. या फळांमध्ये फणसाचे स्थान त्याच्या मधुरपणामुळे फार वरचे होते. फणस हा अस्सल भारतीय असून त्याचा उदय आपल्या सह्याद्रीतच झाला असे मानतात. सर्वमान्य युगाच्या आधीपासूनच फणस आपल्या आहारात महत्त्वाचा भाग होता, याविषयी पुरातन साहित्यात एकमत आहे. फणसाच्या असंख्य पाककृतींचे उल्लेखही या जुन्या ग्रंथामध्ये दिसतात. 

एवढेच नव्हे, तर भारतात आलेल्या अनेक प्रवाशांनीही फणसाविषयी लिहिले आहे. सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी ह्युएन-त्सांग, चौदाव्या शतकात आलेला मोरोक्कोचा इब्न बतूता या दोघांनीही भारतातल्या फणसाची चव चाखून त्याविषयी लिहून ठेवले आहे. इब्न बतूताने तर फणसाला भारतातील सर्वांत चवदार फळ मानले आहे. 

फणसाला मल्याळममध्ये चक्का असे म्हणतात. या चक्कावरूनच त्याचे पोर्तुगीज नाव जॅक आणि त्यावरूनच इंग्रजीतले नाव जॅक फ्रूट आले आहे. फणसाचे तमिळमधले नाव सिक्कई आहे. सिक्कई म्हणजे साखरेभोवतीचा चोथा. फणसाचे गरे जरी गोड असले तरी भोवतालचा न खाल्ला जाणारा भाग बराच असतो, तोच अर्थ या नावात आला आहे. हिंदीमध्ये त्याला कटहल म्हणतात. कोकणात खाल्ल्या जाणाऱ्या फणसात कापा आणि बरका या दोन महत्त्वाच्या जाती आहेत. चिकट गऱ्यांचा बरका अधिक गोड आणि रसाळ असतो; तर कापा कमी गोड असला तरी कापायला सोपा असतो. फणसाचा खाल्ला जाणारा भाग म्हणजे त्याचे गरे होत. त्याव्यतिरिक्त फणसाच्या फळाच्या आवरणाला चार किंवा चारखंड; मधल्या देठासारख्या भागाला पाव, बीजाला आठळी, छोट्या कच्च्या फणसाला कुयरी असे अनेक खास वेगळे शब्द मराठीत आहेत. फळामध्ये भरपूर चीक असल्याने फणस सोलणे कौशल्याचे काम असते. 

फणस बांगलादेश आणि श्रीलंकेचे राष्ट्रीय फळ आहे. लागवडीबरोबरच तो जंगलातही वाढतो. त्यामुळे केवळ आपणच नव्हे, तर दक्षिण भारतातले रानटी हत्ती, गवेही जंगलात वाढणारे फणस आवडीने खातात. फणसाचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस आहे. आर्टोकार्पस शब्दाचा अर्थच ब्रेड फ्रूट किंवा भाकरीचे झाड असे आहे. आपल्याकडे जसा फणस आहे तशा आर्टोकार्पसच्या वेगवेगळ्या जाती इंडोनेशिया - मलेशियामध्ये खाल्ल्या जातात. 

जाता जाता फणसाविषयी अजून एक गोष्ट. तुम्हाला माहीत आहे का, की फणस हे वृक्षावर येणाऱ्या फळांपैकी सर्वांत मोठे फळ आहे!

संबंधित बातम्या