आयुर्वेदिक जांभूळ

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे गेल्यावर मिळणाऱ्या रानमेव्यात करवंदे, तोरणे आणि तर काही फळांबरोबर जांभळे असतात. निदान तुम्ही बाजारात विकायला आलेली जांभळे खात्रीने खाल्ली असतील किंवा प्रवास करताना रस्त्याकडेच्या झाडाची जांभळे पाडून खाल्ली असतील. रानमेव्यातले जांभूळ अस्सल भारतीय झाड आणि भारतात स्थिरावल्यापासून आपल्या पूर्वजांच्या अन्नातले अत्यंत जुने आणि महत्त्वाचे फळ आहे. वेदकालीन साहित्यात जांभळाचे संदर्भ आहेत. इतकेच नव्हे, तर रामायण, महाभारतात तसेच कालिदासाच्या अनेक काव्यांमध्ये जांभळाचे उल्लेख आहेत. 

जांभळाचे सदाहरित वृक्ष आपल्याकडे दाट जंगलात किंवा नदीकिनारी मिळतात. भारतभर त्यांचा विस्तार आहे. भारताबरोबरच दक्षिण आशिया व आग्नेय आशियाच्या काही भागातही नैसर्गिक अवस्थेत जांभळाचे वृक्ष आढळतात आणि फळे तिथेही आवडीने खाल्ली जातात. भारतभर जरी हा वृक्ष वन्य असला तरी मानवी वस्तीच्या कडेने, देवळांमध्ये लावला जातो. लेंडी जांभूळ, भेडससारख्या जांभळाच्या काही इतर रानटी जातीही जांभळाप्रमाणे खाल्ल्या जातात. मात्र त्यांना जांभळाइतका गर नसतो. जांभळे नुसती खाल्ली जातात, तर काही पाककृतींमध्ये त्यांचा वापर करतात. प्राचीन काळी भारतात व्हिनेगर तयार करण्यासाठी जांभूळ वापरत असत. जांभूळ अत्यंत औषधी वृक्ष म्हणून आयुर्वेदातही त्याला मानाचे स्थान आहे. या साऱ्या अन्न आणि औषध या उपयोगाच्या जोडीने त्याचे लाकूडही घरबांधणीसाठी, छोटी अवजारे बनविण्यासाठी वापरले जाते. जसा अंजीरावरून मराठीत अंजिरी रंग आहे तसेच जांभळावरूनही रंगाचे नाव आहे. 

पावसाचा राजा वरुण पृथ्वीवर अवतरताना जांभूळ वृक्षाच्या स्वरूपात अवतरला आणि म्हणूनच या वृक्षाच्या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला अशी एक लोककथा प्रचलित आहे. संस्कृतमध्ये जांभळाला जंबू वृक्ष म्हणतात. या जंबूवरूनच भारताचे एक जुने जंबुद्वीप हे नाव आले आहे.

जांभळाचे तमीळ नाव नावल तर जावा बेटावर त्याच्या असणाऱ्या विपुलतेमुळे इंग्रजांनी त्याला जावा प्लम असे नाव दिले आहे. जांभळासारखाच जाम नावाचा गुलाबाच्या चवीचा इंग्रजीत रोज ॲपल असे नाव असणारा दक्षिण आशियातील वृक्ष आता भारतात अनेक ठिकाणी लावला जात आहे. जांभळाला उत्तर भारतात जामून म्हणतात. या जामूनचे आपल्या अन्नात इतके प्रस्थ होते, की बंगालमध्ये जेव्हा गुलाबपाणी घातलेल्या आणि मैदा किंवा खव्यापासून बनलेल्या नवीन गोड पक्वान्नाचा जन्म झाला तेव्हा जांभळावरूनच या पक्वान्नाला गुलाबजामुन असे नाव दिले गेले.

संबंधित बातम्या