श्रीफळ नारळ 

डॉ. मंदार नि. दातार
शनिवार, 8 डिसेंबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा फळाबद्दल, ज्याला त्याच्या अनेक उपयोगांमुळे समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात कल्पवृक्ष मानतात. ते फळ आहे नारळ. मी त्याचे उपयोग लिहायला लागलो तर हे पान त्यानेच भरून जाईल. 

नारळ आपल्या संस्कृतीमध्ये, परंपरांमध्ये इतका महत्त्वाचा आहे की आपण त्याची पूजाही करतो, अन्नात वापरतो आणि भेट म्हणूनही देतो. कोकणामध्ये तर नारळीपौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून मगच मासेमारीला सुरुवात करतात. या जगभर पसरलेल्या नारळाचा मूळ प्रदेश आहे पापुआ न्यू गिनी नावाचे बेट. मात्र जाड साल, मधे असणारा काथ्या आणि कठीण कवच यामुळे तो समुद्रात दूरवर वाहत जाऊ शकतो आणि किनाऱ्याला लागल्यावर कित्येक महिन्यांनीही रुजू शकतो. त्यामुळे जगात बहुतांशी किनारी भागात नारळ आहेत. 

माणूस पृथ्वीवर यायच्या आधीच नारळ पृथ्वीवर अवतरला होता हे त्याच्या जीवाश्‍म नमुन्यांवरून लक्षात येते. त्यातला एक नमुना तर चक्क राजस्थानमध्ये सापडला आहे. त्याचे मराठीतले नारळ हे नाव नारीकेल या संस्कृत शब्दावरून आले आहे. मात्र नारिकेल हा शब्दच मुळी त्याच्या मलेशिया आणि इंडोनेशिया भागात आदिवासींनी वापरल्या गेलेल्या स्थानिक नावावरून आला आहे. या स्थानिक नावातले नियॉर म्हणजे तेल आणि कोई म्हणजे फळ होय. नारळाचे तमीळ नाव ‘थेंगई’चा अर्थ दक्षिणेकडून आलेला. नारळाचे संस्कृतमधले आणखी एक नाव म्हणजे श्रीफळ. त्याचे इंग्रजी कोकोनट हे नाव हे स्पॅनिश कोकावरून आले आहे. कोकाचा अर्थ ‘माणसाच्या चेहऱ्याचा’ असा आहे. काही अभ्यासकांच्या मते, श्रीफळ हे संस्कृत नाव मुळातले याच अर्थाचे शिरफळ असावे. 

भारतात नारळाचा सुरुवातीला विस्तार हा समुद्रकिनारीच असल्यामुळे हडप्पा येथे त्याचे अवशेष नाहीत. मात्र पुढे मध्यमयुगात भारतात आलेल्या अनेक प्रवाशांनी नारळाच्या भारतात असलेल्या विविध वापराविषयी उल्लेख केले आहेत. आजही नारळ वापरून भारतभर केलेल्या पाककृतींची यादी केली तर ती काही हजारात जाईल. 

जाता जाता नारळाविषयी एक गंमत. अंदमानमध्ये नारळाच्या झाडाखाली राहणारा बिर्गस नावाचा खेकडा नारळाबरोबरच उत्क्रांत झाला आहे. तो चक्क नारळाच्या झाडावर चढून झाडावरचे कोवळे नारळ फोडून त्यातले खोबरे फस्त करून टाकतो. आणखी एक, झाडावरून  नारळ काढणे खूप अवघड काम असल्यामुळे त्यासाठी बरेचदा माणसे मिळत नाहीत. म्हणून काही ठिकाणी नारळ काढण्यासाठी चक्क माकडांना प्रशिक्षित केले जात आहे. नारळ निसर्गाची आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे. शेवटी देवाची करणी आणि नारळात पाणी हेच खरे.

संबंधित बातम्या