चटकदार चिंच
टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....
मित्रांनो, आपल्या जेवणातील पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी पूर्वीपासून अनेक वनस्पती वापरल्या गेल्या. कोकणात आमसूल किंवा कोकम, उत्तर भारतात अनारदाना, लिंबू, वाळवलेल्या कैरीचे आमचूर, आवळा या त्यातल्या काही. पण या सर्वांपेक्षा आपल्या आंबटपणासाठी लोकांच्या पसंतीस उतरलेली वनस्पती म्हणजे चिंच होय. चिंचेशिवाय तुमची भेळ पूर्ण होऊ शकणार नाही, ना आळूची भाजी.
चिंच हा शेंगावर्गीय वृक्ष भारतात सर्वत्र लावला जातो. चिंचेचे डेरेदार वृक्ष तुम्ही कुठे कुठे नक्की पहिले असतील. चिंचेची सुंदर हिरवट-पिवळ्या पाकळ्यांवर लाल रंगाचे ठिपके असलेली फुले तुम्ही कधी पाहिली आहेत का? या फुलांची, तसेच आंबट पानांची भाजीही काही ठिकाणी केली जाते. चिंचेच्या न पिकलेल्या शेंगा काहीशा टणक असतात, मात्र पिकल्या की मऊ होतात. शेंगांमधला गर आंबट असतो. या गरात लपलेले चपटे, काहीसे चौकोनी आकाराचे चिंचोके असतात. चिंचोक्याची पूड कॉफीमध्ये भेसळ म्हणून वापरतात तर त्याचे तेलही काढतात. चिंचेचा गर वाळवून, साठवून आपल्या जेवणात अनेक प्रकारे उपयोगात आणता येतो. चिंचेचा वृक्ष सावली देणारा आहे अन त्याचे लाकूडही अनेक प्रकारे उपयोगात येते.
दक्षिण भारतातील अन्नात चिंच हा महत्त्वाचा घटक आहे. तमिळमध्ये चिंचेला पुली म्हणतात. हाच शब्द तिथे आंबटपणासाठी समांतर झाला आहे. चिंचेचे टॅमॅरिंड हे इंग्रजी नाव तमार-ए- हिंद या अरेबिक नावावरून आले आहे. भारतातून जेव्हा चिंच अरबस्थानमध्ये पोचली तेव्हा त्यांना कोळ काढता येणारी ही वनस्पती खजुरासारखी वाटली. ‘तमार-ए- हिंद’मधला तमार म्हणजे खजूर आणि हिंद म्हणजे भारत. एकुणात या अरेबिक नावाचा अर्थ आहे भारतीय खजूर. युरोपात चिंच पोचली तेव्हा ती एखाद्या नारळ सुपारीसारख्या पाम वृक्षावर लागत असावी असे युरोपियन लोकांना वाटले; एवढा या तमार-ए- हिंद या नावाचा प्रभाव होता. वनस्पतिशास्त्र अभ्यासकांच्या मते चिंचेचा मूळ प्रदेश आहे आफ्रिकेचा विषुववृत्तीय भाग. पण भारतात तिचा पूर्वीपासून वापर होत होता. चिंचेचे संस्कृत नाव आम्लिका आहे. त्यावरून हिंदीतले इमली आले आहे. आज भारतातच नव्हे तर जगभर चिंच लावली जाते व ती लोकप्रिय झाली आहे. आज आपण चिंचेशिवाय जेवणाची कल्पनाही करू शकणार नाही.
तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत आहे का? कर्नाटकात विजापूर भागात चक्क लालभडक गर असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण चिंच मिळते. कधी तिकडे जायचे असेल तर आवर्जून ही चिंच शोधून ती चाखून बघा.