अाहा... आंबा! 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपण आजपर्यंत ज्या ज्या वनस्पतींविषयी वाचले, त्यांच्या बाबतीत कदाचित तुमची काही आवड-निवड असू शकेल, पण आज आपण वाचणार आहोत तो आंबा न आवडणारा माणूस मिळणे जवळपास अशक्‍यच आहे. मान्य आहे ना? अस्सल भारतीय फळांमध्येच काय जगातही आंब्याचा क्रमांक फार वरचा आहे. ईशान्य भारतात २५० ते ३०० लाख वर्षांपूर्वीचा आंब्याचा जीवाश्‍म सापडला आहे; आंबा खात्रीने इथलाच असल्याचा हा पुरावा आहे. भारतभर आंब्याच्या अक्षरशः हजारो जाती आहेत. तोतापुरी, निलम, गोव्याचा माणकूर, रत्ना, केशर, पायरी, बागनपल्ली, नुरपरी, आम्रपाली, मल्लिका, सिंधू, सुवर्णरेखा उत्तर भारतातल्या लंगडा, चौसा, रत्नाल या त्यातल्या काही प्रसिद्ध जाती. पण या साऱ्यांपेक्षा कोकणात देवगड व रत्नागिरीत मिळणारा हापूस आंबा जगभरात लोकप्रिय आहे. अफोन्सो दि आल्बुकर्क या आंब्यावर कलमाची पद्धत भारतात रूढ करणाऱ्या पोर्तुगीज दर्यावर्दीवरून आंब्याला अलफोन्सो व त्याचा अपभ्रंश होऊन हापूस हे नाव मिळाले. आंब्यामध्ये खूप वैविध्य असल्याने कोई लावून जसेच्या तसे आंबे मिळत नाहीत. मात्र कलमामुळे हव्या त्या जाती टिकवणे शक्‍य झाले आहे. 

तामिळमध्ये कच्च्या आंब्याला मंगाई असे म्हणतात, यावरूनच त्याचे मॅंगो हे इंग्रजी नाव आणि मॅंजिफेरा हे वनस्पती शास्त्रीय नाव आले आहे. मात्र बहुतांश भारतीय भाषेतली आंब्याची नावे संस्कृत ‘आम्र’वरूनच आली आहेत. वेदांपासून महाभारतापर्यंत सर्व जुन्या साहित्यात आंब्याचे उल्लेख आहेत. अनेक प्राचीन काव्यांमध्ये आणि शिल्पांमध्ये आंबा आहेच. भारतात आलेले अनेक परदेशी प्रवासी आंब्याची महती सांगतात. सतराव्या शतकात इथे आलेल्या फ्रेयरने आंब्याच्या चवीपुढे जर्दाळू, नाशपातीच काय तर सफरचंदेही फिकी पडतात असे लिहिले आहे. फोडी खाणे आणि रसाव्यतिरिक्त आंब्याचे अनेकविध पदार्थ आपल्या अन्नात आहेत. पूर्वी पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी कैरीची पूड आमचूरही लोकप्रिय होती. आपल्या संस्कृतीमध्ये आंब्याला तर विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक कार्यांमध्ये अन्‌ सणांमध्ये वापरण्यात येतात. 

आफ्रिका खंडातही आता मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली गेली आहे. हेच आंबे आता युरोपातील आंबाप्रेमींची जीभ तृप्त करतात. बहुतांश आंब्यांना उन्हाळ्यात फळे येतात पण मराठवाड्यात वर्षात दोन किंवा तीन वेळा फळे येणारे काही आंबे आहेत. चंदीगडमधला दीडशे वर्षे जुना आंब्याचा एक वृक्ष तर दरवर्षी सरासरी सतरा हजार किलो फळे देत असे, असे मोजले गेले आहे. आपले राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याविषयी जेवढे लिहू तेवढे थोडेच आहे. विचार करा, काही शतकांपूवी जेव्हा साखर आजच्या इतकी वापरात नव्हती आणि गोड पदार्थ सहज मिळत नसत, तेव्हा आपले पूर्वज फलराज आंब्याच्या मधुर मौसमाची किती आतुरतेने वाट पाहात असतील!

संबंधित बातम्या