स्वयंपाकघरातील मुशाफिरी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 29 एप्रिल 2019

टेस्टी-बेस्टी
उन्हाळ्याच्या सुटीत वेळ कसा घालवावा हा प्रश्‍नच असतो. मग काही सोपे आणि आवडते पदार्थ छोट्यांनी मोठ्यांसाठी केले तर?  दुसऱ्यासाठी काही केल्याचा आनंदही मिळेल, नवीन काही शिकता येईल आणि मधल्यावेळी चटपटीत खाण्याचा आनंदही मिळेल.

मुलांनो, काही गोष्टी मात्र जरूर लक्षात ठेवा. 

  • स्वयंपाक घरातील प्रयोग सुरू करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावे. त्यानंतर, केसांना, नाकाला किंवा कचऱ्याच्या डब्याला वगैरे हात लावू नये. लावावा लागल्यास हात पुन्हा स्वच्छ धुवावेत. 
  • स्वयंपाकघरात सहज हाताशी मिळेल अशी, सिल्व्हरेक्‍स, बरनॉल वा कैलासजीवनची ट्यूब ठेवावी. (मी फ्रीजमधेच अंडी वगैरेंच्या जवळ, सहज दिसेल अशी ठेवते). चुकून भाजलेच तर गॅस बंद करून लगेच नळाखाली वा फ्रीजच्या पाण्याखाली भाजलेला भाग पाच - दहा मिनिटे धरावा व दहा मिनिटांनी त्यावर औषध लावावे. 
  • समजा बोट कापले तर घाबरून जाऊ नये. लगेच पाण्याखाली हात धरावा वा स्वच्छ रुमालात बर्फाचा तुकडा गुंडाळून जखमेवर दाबून धरावा. नंतर जखमेवर चिमूटभर हळद दाबून दुसऱ्या बोटाने दोन मिनिटे दाबून धरावे. रक्त येणे थांबते. 
  • सुरुवातीला आई, बाबा, आजी, आजोबा यांच्यासमोरच प्रयोग करावेत. घरात एकटे असताना हे प्रयोग करू नये. 
  • उंची कमी असेल तर पदार्थ तळण्यासाठी मोठ्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी. आपण तळू नये. स्टुलावर वगैरे चढून गॅसवर काहीही करू नये. 
  • गॅसवर वस्तू ढवळताना एका हातात सांडशी घेऊन कढई पकडावी म्हणजे कढई सरकणार/कलंडणार नाही. 
  • स्वयंपाकघरात काम करताना दंगामस्ती/घाई करू नये व कोणालाही करू देऊ नये. 
  • आपले पदार्थ करून तयार झाल्यावर भांडी सिंकमध्ये पाणी घालून ठेवावीत. ओटाही स्वच्छ पुसून फडके धुऊन नीट वाळत घालावे. 
  • घरात मोठे कुणी नसताना लहान मुलांनी सुरी व गॅसचा वापर करू नये. 
  • नवीन नवीन पदार्थ आनंदाने करा, आनंदाने सगळ्यांना द्या आणि आनंदाने खा. छानच होतील.

चीजव्हेजी बॉल्स 
साहित्य : कव्हरसाठी : एक वाटी रवा, १ बटाटा, १ चमचा ओरेगॅनो पावडर, १ चमचा मीठ, १ चमचा तेल, २ चमचे तांदुळाची पिठी. 

सारणासाठी : एक मोठा बटाटा, बारीक चिरलेली लाल-पिवळी-हिरवी मिरची (एकूण एक वाटी होईल इतक्‍या), अर्धा चमचा मीठ, पाव चमचा मिरेपूड, अर्धा चमचा तिखट, १ चमचा ओरेगॅनो पावडर, चीजचे ३ क्‍यूब. 

कृती : सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन घ्या. कुकरमध्ये ४ वाट्या पाणी घाला. त्यात धुतलेले दोन्ही मोठे बटाटे घाला. त्यातला एक आपल्याला वरच्या आवरणासाठी व एक सारणासाठी लागणार आहे. कुकरचे झाकण बंद करून गॅस सुरू करावा. आच मोठी ठेवावी. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा. 
    कुकर पूर्ण थंड झाला, की बटाटे कुकरमधून काढून सोला. सोलून झाल्यावर एक ताटली घेऊन किसणीने किसून घ्या. एका नॉनस्टिक पॅनमध्ये दोन वाट्या पाणी घाला. त्यात चाळलेला एक वाटी रवा घाला. १ चमचा ओरेगॅनो पावडर, १ चमचा तेल व एक चमचा मीठ घाला व गॅस सुरू करा. मध्यम किंवा मोठी आच ठेवा. डाव्या हाताने पॅनचे हॅंडल पकडून उजव्या हाताने लाकडी सराट्याने अथवा लाकडी चमच्याने सतत ढवळत राहा. चार ते पाच मिनिटात घट्ट गोळा तयार होईल. आता झाकण ठेवा. गॅस कमी करावा व एका मिनिटाने गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. 

आता केलेल्या किसातला अर्धा कीस रव्याच्या या घट्ट गोळ्यात मिसळून हाताने मळून कणकेसारखा गोळा करा. या गोळ्याचे गुलाबजामएवढे गोळे करा. 
    आता उरलेला बटाट्याचा गोळा घ्या. त्यात चिरलेल्या लाल पिवळ्या व हिरव्या मिरच्या घाला.चीजक्‍यूब किसून घाला. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, एक चमचा ओरेगॅनो व पाव चमचा मिरेपूड घाला. सगळे मिश्रण छान कालवावे. 

आता बटाट्याचा एक गोळा घेऊन बोटांनी दाबत त्याचा खोलगट वाटीसारखा आकार करा. त्यात एक चमचा सारण घाला व गोळा नीट बंद करा. गोळा वा सारण हाताला चिकटत असेल, तर हात तांदुळाच्या पिठात बुडवून मग दोन्ही तळव्यांवर फिरवून आपल्या चीजव्हेजीबॉल्सना बॉलसारखा गुळगुळीत गोल आकार द्या. असे सगळे गोळे करून घ्या व एका ताटात ठेवा. 

एका कढईत २-३ वाट्या तेल घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा. २-३ मिनिटांनी बटाट्याचा छोटासा तुकडा तेलात टाका. तो चुर्र आवाज करत लगेच जर वर आला तर समजायचे, की तेल तापले आहे. आता एका झाऱ्यावर यातील दोन गोळे ठेवून हलकेच झारा तेलात बुडवावा व तिरपा करावा म्हणजे तेल अंगावर उडणार नाही. असे एकावेळी पाच-सहा गोळे तळायला ठेवा. एखाद मिनिटाने ते झाऱ्याने हलवावे. फोटोतल्यासारखा रंग येईपर्यंत हलवत हलवत तळावे. तळून झाल्यावर गॅस कमी करावा व झाऱ्याने एकेक करत सगळे  चीजव्हेजीबॉल्स बाहेर काढून टिश्‍यूपेपरवर ठेवा. 

हे चीजव्हेजीबॉल्स हिरव्या चटणीबरोबर किंवा हॉट अँड स्वीट/टोमॅटो सॉसबरोबर मस्त लागतात.


पिझ्झुले अर्थात पिझ्झ्याची पिल्ले 
साहित्य : बारा मिनी पिझ्झ्यांचे एक पाकीट, टोमॅटो सॉस, ३-४ चीज क्‍यूब्ज, बटर, प्रत्येकी १ हिरवी - लाल - पिवळी मिरची, एक कांदा, (हवे असल्यास ४-५ मश्रूम चकत्या करून किंवा १/२ वाटी स्वीट कॉर्नचे दाणे किंवा ४-५ पनीर क्‍यूब्जही बारीक तुकडे करून घालू शकता), पत्ताकोबीचा १/४ तुकडा. 

कृती : सगळ्या भाज्या भरपूर पाण्यातून स्वच्छ धुऊन घ्या. मग प्यायच्या पाण्याने धुऊन घ्या. कांद्याचे साल काढून कांदा लांब लांब चिरून घ्या. पत्ताकोबीदेखील बारीक लांबलांब चिरून घ्या. चिरताना हात कापू देऊ नका. 

आता गॅस सुरू करून मंद आच करून ठेवा. गॅसवर नॉनस्टिक पॅन किंवा कढई तापायला ठेवून त्यात एक चमचा बटर घाला. त्यात चिरलेल्या सगळ्या भाज्या घाला व अर्धा चमचा मीठ घाला. त्यातच अर्धी वाटी टोमॅटो सॉस घाला. सगळे ढवळून घ्या. आता त्यावर झाकण ठेवून दोन मिनिटांनी झाकण काढून ढवळा. गॅस बंद करा. तयार झालेले मिश्रण एखाद्या बोलमधे काढून ठेवा व पॅन धुऊन व पुसून घ्या. 

सगळे पिझ्झ्याचे बेस पाकिटातून बाहेर काढा. प्रत्येक पिझ्झाबेसच्या खालच्या सपाट भागाला बटर लावा. नेहमी ब्रेडला लावतो तसेच! बटर लावले, की तो पिझ्झाबेस बटरचा भाग पॅनला लागेल असा पॅनमध्ये ठेवा. साधारण सहा पिझ्झाबेस पॅनमध्ये मावतील. त्यावर एक एक चमचा सॉस घालून पसरवा. सहाही पिझ्झाबेसवर आता एकेक चमचा तयार केलेले पिझ्झ्याचे मिश्रण पसरवा. 

आता चीज क्‍यूबवरचे कव्हर काढून घ्या. किसणी पॅनवर धरून प्रत्येक पिझ्झ्यावर थोडे थोडे किसा. एका क्‍यूबमधे चार पिझ्झुले कव्हर होतील. 

आता पॅनवर झाकण ठेवा. गॅस मंद आचेवर पेटवून चार-पाच मिनिटे शिजू द्या. गॅस बंद करून सगळे पिझ्झुले एका मायक्रोवेव्हेबल प्लेटमध्ये काढा. ही प्लेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवून एक मिनीट गरम करा म्हणजे चीज मेल्ट होईल (वितळेल). पिझ्झा मऊ आवडत असेल, तर तसाच खाण्यास घ्यावा. जरा कुरकुरीत बेस हवा असेल, तर मायक्रोवेव्ह मधून काढून पिझ्झुले पुन्हा पॅनवर ठेवून पॅनमध्ये मंद गॅसवर दोन मिनिटे गरम करा. गॅस बंद करून दोन दोन पिझ्झुले एकेका प्लेटमध्ये काढून आधी आपल्या लहान भावंडांना, मग आजीआजोबांना मग आईबाबांना देऊन शेवटी स्वतःला घ्या. 

आई आणि आजी असंच करतात नं? आणि आपल्याला किती मस्त वाटतं! तसंच एखादेदिवशी आपण त्यांना गरमगरम पहिल्यांदा खायला दिलं, तर त्यांना तुमचं खूप कौतुक वाटेल आणि आनंदही होईल. 


मिनी उत्तप्पे 
साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ (किंवा अर्धा किलो तयार इडली पीठ), अर्धे गाजर, १ कांदा, १ चहाचा चमचा मीठ, १ चीज क्‍यूब, २ मोठे चमचे तेल. 

कृती : रात्री एका मोठ्या भांड्यात एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्या. त्यात तीन-चार वाट्या पाणी घालून चमच्याने किंवा हाताने चोळून भांडे तिरपे करून वरचे पाणी ओतून टाका. पुन्हा एकदा त्यात पाणी घालून ढवळून मग पुन्हा भांडे तिरपे करून पाणी ओतून द्या. 

आता या धुतलेल्या डाळ - तांदुळामध्ये २ वाट्या पाणी घालून झाकून ठेवून द्या. 

सकाळी उठल्यावर मिक्‍सरच्या भांड्यात हे डाळ - तांदूळ व त्यातील थोडे पाणी घालून मिक्‍सरला झाकण लावून मिक्‍सर सुरू करा. एक मिनीट मिक्‍सर चालवून मिक्‍सर बंद करा. पुन्हा मिक्‍सर सुरू करा. एक मिनीट चालवून बंद करा. असे एकंदर तीन किंवा चारदा केले की आपले उत्तप्प्याचे पीठ छान बारीक होईल. आता हे सगळे पीठ एका स्टीलच्या गंजात ओतून झाकून ठेवून द्या. दुपारी ४ वाजेपर्यंत पीठ मस्त फुगून येईल. आता त्यात एक चमचा मीठ घाला व चमच्याने नीट ढवळून घ्या. बाजारात किराण्याच्या दुकानात तयार इडलीपीठ मिळते. ते आणले तरी चालेल. त्यात वेळेवर मीठ घालून घ्या.     गाजर धुऊन घ्या. किसणीवर ते व्यवस्थित किसून घ्या. किसताना घाई करू नका. एक कांदा घ्या. कटिंग बोर्डवर ठेवून त्याची शेंडीकडची बाजू कापून टाका. याच पद्धतीने मुळाकडचा भाग कापून टाका. मग कांद्याचे दोन तुकडे करा. आता कांद्याचे साल पटकन निघेल. साल काढल्यावर कांदा धुऊन घ्या आणि मग त्याचे बारीक काप करून घ्या. चीज आवडत असेल, तर चीजचे क्‍यूब आणून ठेवा (व गाजर आणि कांद्याबरोबर उत्तप्प्यांवर चीज किसून टाका.) 

आता एक नॉनस्टिक तवा/फ्राईंग पॅन घ्या. त्याच्यावर एक चमचा तेल टाका. ते तेल लाकडी सराट्याने तवाभर पसरवा. 

आता सपाट तवा किंवा पॅन गॅसवर ठेवा. गॅस एकदम कमी आचेवर ठेवा. लगेच जरा मोठ्या चमच्याने तव्यावर एक चमचा पीठ घाला. ते चमच्यानेच थोडे पसरवा. असेच चार किंवा पाच उत्तप्पे तव्यावर घाला. प्रत्येक उत्तप्प्यावर थोडा चिरलेला कांदा व थोडे किसलेले गाजर व हवे असल्यास चीज किसून पटपट पसरून घाला. चीजची स्लाइस असेल, तर एका स्लाइसचे चार तुकडे करून एका उत्तप्प्यावर एक स्लाइसचा तुकडा ठेवला तरी चालेल. आता पॅनवर झाकण ठेवा. तीन मिनिटांनी झाकण काढा. हात भाजू देऊ नका. आता प्रत्येक उत्तप्प्याच्या साइडला अर्धा चमचा तेल घाला. पुन्हा झाकण ठेवून एक मिनिटभर शिजू द्या. उत्तप्पे मग सराट्याने उलटा व अर्धा मिनिटभर शिजू द्या. चीज घातल्यास मात्र उत्तप्पे उलटू नका. गॅस बंद करून सगळे उत्तप्पे सराट्याने डिशमध्ये काढून घ्या. असेच सगळे उत्तप्पे करून घ्या आणि सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर देऊन आईबाबांना सरप्राइज द्या.


फ्रूट सॅलड 

साहित्य : एक सफरचंद, १ पेर, १ केळे, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, ४ चमचे साखर, २ वाट्या दूध, २ चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर. चिकू, द्राक्षे, संत्रे, आंबा असल्यास त्यांच्या एक वाटीभरून फोडी. 

कृती : मुलांनो, सगळ्यात आधी सिंकमधे सगळी फळे स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर ती प्यायच्या पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर एका गंजात दोन वाटी कोमट दूध आणि चार चहाचे चमचे भरून साखर व दोन चहाचे चमचे भरून कस्टर्ड पावडर एकत्र करा व दोन मिनिटे ढवळून घ्या. मग तो गंज गॅसवर ठेवा व गॅस पेटवून कमी आचेवर गॅस ठेवा. एक मोठा चमचा घेऊन सतत चमचा तळाला लागेल असे चमच्याने ढवळत राहा. साधारण तीन ते चार मिनिटात दूध उकळायला लागून घट्ट होऊ लागेल. अर्ध्या मिनिटाने गॅस बंद करा व ते कस्टर्ड बाजूला थंड व्हायला ठेवून द्या. 
    कस्टर्ड थंड व्हायला आले, की फळे चिरायला घ्या. केळ्याचे साल काढून त्याचे आधी उभे चार काप करून नंतर आडवे कापून बारीक तुकडे करा. ते लगेच कस्टर्डमधे टाका, नाहीतर काळे होईल. मग सफरचंद व पेर बिया, मधला कडक भाग व देठ बारीक कापून घ्या. तेही लगेच कस्टर्डमधे टाका व चमच्याने मिसळून टाका. नंतर त्यात डाळिंबाचे दाणे टाका. संत्रे, चिकू, द्राक्ष, आंबा यापैकी कुठलीही फळे आवडत असतील तर तीही बारीक कापून टाका. संत्र्याच्या फोडी आणि चिकू मात्र सोलून बिया काढून मग कापा. आपल्याला एकूण ४ -५ वाट्या होतील इतकीच फळे हवी आहेत. 
    एखाद्या छान सर्व्हिंग बोलमध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये एखाद तास गार होऊ द्या. आईबाबा, आजोबाआजी आणि दोन मुले असे एकूण ६ जणांना पुरेल इतके मस्त फ्रुटसॅलड तय्यार!

संबंधित बातम्या