आडवाटेवरचा स्वातंत्र्य दिन!

ओंकार ओक 
गुरुवार, 3 जानेवारी 2019

ट्रेक कथा
कधी जंगल वाटेवर लागलेला चकवा असो किंवा एखादी गूढ मंतरलेली मुक्कामाची जागा! ट्रेकर्सच्या अनुभव विश्‍वातले हे असे काही भन्नाट, काही थरारक तर काही मजेशीर किस्से सांगणारे नवे सदर... ‘ट्रेक-कथा’...

दिनांक १५ ऑगस्ट २०१५ सकाळचे सहा वाजत आले होते. कन्नड घाटाच्या मागे दूरवर कुठेतरी अंतुर किल्ल्याची पुसटशी झलक दिसत होती आणि त्यामागून तेजोभास्कराची सोनेरी किरणे सारा आसमंत चेतवून टाकत होती. पाटणादेवीच्या भल्यामोठ्या बंद दरवाजासमोर सुमारे पस्तीस मिनिटे आतल्या फॉरेस्ट कर्मचाऱ्याची निद्रिस्त तपश्‍चर्या भंग करण्याचे अनेक प्रयत्न असफलच ठरत होते. या सगळ्या रहाटगाडग्यात ग्रुपमधल्या काही अनुभवी मंडळींनी आपल्या स्लिपिंग बॅग्ज बाहेर काढून गाडीमध्ये अर्धवट झालेल्या झोपेची थकबाकी पूर्ण करून घेतली. आज कण्हेरगड व पेडका करून कळंकी गावात मुक्काम करायचा होता. अखेर सरकारी नियमाला जागून आपली झोप पूर्ण झाल्यावरच साठीच्या आसपासचा वनविभागाचा एक कर्मचारी डोळे चोळत चोळत बाहेर आला!!

काय पायजे? हा प्रश्न अपेक्षित होताच!

आम्ही पुण्याहून आलोय. कण्हेरगड किल्ला बघायला. जोशीकाकांशी (पाटणादेवीचे अध्यक्ष) आठ  दिवसांपूर्वीच बोलणं झालंय.

हा...ते पुण्याचे ओंकार ओक तुम्हीच का???

हो मीच

हा. या आत. येन्ट्री करा फक्त. तुमचे गाइड १५ मिनिटात येतील.

सगळी फिल्डिंग व्यवस्थित लागल्याची ही पावती होती. अखेर पाटणादेवीच्या गर्द झाडीने भरलेल्या सुरेख रस्त्यावरून आमची गाडी धावू लागली आणि ट्रेकला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली होती.

दरवर्षीच्या शिरस्त्याला जागून १५ ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व जपत सह्याद्रीमध्येच आपले स्वातंत्र्य उपभोगायचे आणि एखाद्या आडवाटेच्या आणि भन्नाट घाटवाटेवर किंवा किल्ल्यावर मनसोक्त भटकायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून माणिकपुंज-राजदेहेर ऊर्फ धेरी किल्ला-कण्हेरगड (पाटणादेवी) आणि पेडका या चार भन्नाट आणि अतिशय अनवट अशा किल्ल्यांच्या भटकंतीचा बेत ज्यावेळी शिजला त्याचवेळी गाडी फुल्ल होण्याची चिन्ह दिसू लागली आणि अखेर सतरा जणांच्या टोळक्‍याने १४ ला रात्रीच पुणे सोडलं आणि औरंगाबाद-कन्नड-शिवापूरमार्गे कण्हेरगड पायथ्याच्या पाटणादेवी गावात आम्ही दाखल झालो. पाटणादेवी या स्थळाला तिथल्या देवीमुळे प्रचंड महत्त्व आहे आणि बाराही महिने भक्तांची रीघ पाटणादेवी गावात लागलेली असते. गावाच्या डोईवर वसलेला कण्हेरगड आणि आजूबाजूचे घनदाट जंगल मात्र गौताळा अभयारण्याच्या प्रदेशात येत असल्याने अतिशय सुरक्षित ठेवले गेलं आहे. पाटणादेवीच्या अध्यक्षांशी आधीच बोलून ठेवल्याने सगळी व्यवस्था चोख लागलेली होती. एक सामान्य समाज हा आहे, की हा कण्हेरगड आणि नाशिक जिल्ह्यातला कण्हेरा किल्ला एकच. पण ते तसे नसून नाशिक जिल्ह्यातला कण्हेरगड हा सातमाळा रांगेत असून पाटणादेवीचा कण्हेरगड जळगाव जिल्ह्यात येतो. त्यामुळे या दोन्ही किल्ल्यांचा नामसाधर्म्य सोडल्यास एकमेकांशी काहीही संबंध नाही.

पाटणादेवी मंदिराचा परिसर मात्र नितांत सुंदर आणि चारही बाजूंनी डोंगराने वेढलेला. मंदिराच्या समोर कण्हेरगडाचा खडा पहाड आणि मंदिराची पाठराखण करत उभं आहे पितळखोरे लेणं. पाटणादेवीचं कोरीव कामाने सजलेलं प्राचीन मंदिर पाहून बाहेर पडतानाच आमचे गाइड विजूमामा यांच्या येण्याची आणि मंदिराच्या बाहेरील टपरीवर सांगितलेल्या चहावाल्याकडची साखर संपल्याची खबर एकाच वेळी आली!! 
आता चूल मांडून चहा करायला वेळच नव्हता. पाटणादेवीचा परिसर एव्हाना कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाला होता. पाटणादेवी मंदिराच्या साधारणपणे एक किलोमीटर अलीकडे महादेव मंदिराकडे जाणारा फाटा आहे. पंधरा मिनिटात गर्द झाडीने नटलेली पायवाट आम्हाला मंदिरासमोर घेऊन गेली आणि क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना! हेमाडपंथी शैलीतलं भव्य आणि कमालीच्या सुंदर कोरीवकामाने सालंकृत असे भव्य महादेव मंदिर समोर उभे होते. पण वेळापत्रकानुसार उन्हं चढायच्या आत कण्हेरगड गाठायचा असल्याने मंदिर येताना बघण्याचा निर्णय झाला आणि ठसठशीत मळलेली पायवाट कण्हेरगडाचा चढ चढू लागली.

कण्हेरगडाच्या पोटात प्राचीन अशा सीतान्हाणी,नागार्जुन कोठडी आणि शृंगारचौरी अथवा शृंगारचावडी या लेण्यांचा समूह कोरला आहे. सर्वांत पहिली लागते ती नागार्जुन कोठडी लेणी. अतिशय सुंदर शिल्पकाम आणि भगवान महावीर,गोमटेश्वर आणि अंबिकेच्या भव्य मूर्ती या लेण्यात खोदल्या आहेत. लेण्यांच्या प्रवेशद्वारावरची हत्तींची शिल्पही प्रेक्षणीयच. शेजारी पाण्याचं टाकंही आहे. खास वेळ देऊन बघावे असे हे कातळकाम आहे. नागार्जुन कोठडीच्या पुढे लागतात ती सीतान्हाणी लेणी. यात मात्र नुसत्याच रिकाम्या खोल्या असून कोणतेही मूर्तिकाम केलेले नाही. सीतान्हाणीपासून पुढे आलो, की आपण पाटणादेवी गावाच्या बरोब्बर समोरच्या कड्यावर येतो. इथेच अतिशय सोप्या श्रेणीतला सुमारे पन्नास फुटांचा एक कातळटप्पा लागतो. पाटणादेवीचं गर्द जंगल नजरेत भरले. कण्हेरगडाच्या भग्न दरवाजातून माचीवर प्रवेश झाला तेव्हा नऊ वाजत आले होते. उजवीकडे किल्ल्याचा गोलाकार बालेकिल्ला लक्ष वेधून गेला. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाताना मधे एक पाण्याचं कोरड टाकं असून पुढे काही भग्नावशेष आहेत. कण्हेरगडावरची सर्वांत भक्कम आणि कमालीची सुंदर वास्तू म्हणजे त्याचा दरवाजा. बालेकिल्ल्याच्या खाली एका अरुंद ठिकाणी दरवाजा बांधलेला असून, आत प्रशस्त देवड्या आहेत. दरवाजापासून एक कमालीची खडी चढाई कोरड्या टाक्‍यांच्या सोबतीने बालेकिल्ल्यावर घेऊन गेली. माथ्यावर कमरेएवढे गवत माजले होते. उकाड्याने घामटा काढलाच होता, त्यात वर पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होते. त्यामुळे कण्हेरगडावर जाताना कमीत कमी तीन लिटर पाणी अत्यावश्‍यकच आहे. माथ्यावरच्या मारुतीरायाला दंडवत घालून आणि झेंडावंदन आटपून खाली उतरायला सुरुवात केली, तेव्हा बारा वाजत आले होते. वाटेत किल्ल्याच्या घळीतली शृंगारचावडी लेणीसुद्धा बघून झाली. या लेण्यांमध्ये फार काही नसून लेण्यांचा डोलारा पेलणारे खांब मात्र निखालस सुंदर कोरलेले आहेत. ही लेणी सापडायला मात्र स्थानिक माहीतगार सोबत हवाच. खाली उतरलो तेव्हा पायथ्याच्या महादेव मंदिराने मात्र आमचे पाय जड केले. कमालीचे सुंदर लोकेशन आहे मंदिराचे!! मंदिराबाहेर पडलो आणि मुख्य रस्त्यावरच्या गर्द राईत जेवण उरकून गाडी पुन्हा कन्नडचा घाट जेव्हा चढू लागली तेव्हा नजरेसमोर पेडका किल्ला तरळत होता.

पेडका किल्ल्याला जायला चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यावरील कालीमठ फाट्यापासून उपळी-आंबा तांडा- वडनेर व कळंकी असा मार्ग आहे. कळंकीचे सरपंच मात्र अतिशय अगत्यशील. अतिशय प्रेमाने त्यांनी आमची विचारपूस केली आणि वाट दाखवायला गावातली दोन-तीन मुले सोबतीला दिली. खरंतर पेडका किल्ल्याला वाटाड्याची अज्जिबात गरज नाही. पण आम्ही किल्ल्यावरून सूर्यास्त पाहून उतरणार असल्याने वाटेत अंधार पडणार होता आणि त्यासाठी स्थानिक माहीतगार आवश्‍यक होता. कळंकी गावापासून सुमारे दोन-तीन किलोमीटरवर पेडका किल्ल्याचा पायथा आहे आणि तिथपर्यंत मिनीबससारखे वाहन सहज जाऊ शकते. पायथ्याला पोहोचलो तेव्हा ठसठशीत कातळकडा लाभलेला आणि हिरव्यागार कायेवर संध्याकाळची कोवळी किरणे पडून उजळून निघालेला पेडका दुर्ग निर्विवाद सुंदर दिसत होता. एकूणच चढाईसाठी भन्नाट वातावरण होते. पेडका किल्ल्याची चढाई कमालीची सोपी असून मुख्य कातळकड्याच्या खाली जाईपर्यंत अर्धा एक तासाची आडवीच वाट आहे. माथ्यावर पोचलो तेव्हा पाच वाजत आले होते. किल्ल्याचा पसारा प्रचंड असून योग्य पाण्याची भरपूर टाकी किल्ल्यावर आहेत. पेडका किल्ला हा मी आत्तापर्यंत पाहिलेल्या सुमारे २५० किल्ल्यांमधील अनेक जे सर्वोत्कृष्ट किल्ले आहेत आहेत त्यातला एक असावा. योग्य ऋतूत गेल्यास हा किल्ला तुम्हाला जग विसरायला लावेल इतके सौंदर्य पेडका किल्ल्याला आणि मुख्य म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या आसमंताला लाभलेले आहे. पश्‍चिमेकडे असल्याने पेडका किल्ल्याच्या पुढे एकही डोंगर नाही आणि त्यामुळे इथला सूर्यास्त म्हणजे स्वर्गसुख आहे. आत्ताही मला त्याचे वर्णन करायला शब्द कमी पडत आहेत. त्यासाठी तुम्ही तिथेच असायला हवे. गावात परतलो तेव्हा अर्थातच अंधार पडला होता. गावातच रात्रीचं जेवण सांगितल्याने तशी काळजी नव्हती. चुलीवरच्या गरमागरम जेवणावर आडवा हात मारून बाहेर पडलो तेव्हा घरमालकाने सतरा जणांच्या जेवणाचे पैसे घ्यायला सपशेल नकार दिला. मी अवाकच झालो. 

साहेब...मी तुमच्या घरी येईन तेव्हा मला जेवणाचे पैसे मागाल का? नाही ना? मग तुम्ही पण द्यायचे नाहीत.

काय बोलणार यावर. त्याच्या पाच वर्षाच्या मुलाच्या हातात खाऊसाठी दिलेले पैसे त्याच्याकडून काढून घेत आणि मला परत करत तो म्हणाला ‘आत्तापासून सवय लावू नका साहेब. खाऊसाठी का असेना...पण याला पैशांची सवय लागली तर आमचे संस्कार वाया जातील’.

आयुष्याच्या डायरीत एका स्पेशल पानावर लिहून ठेवण्यासारखा हा अनुभव! आम्ही गावातल्या मारुती मंदिरात मुक्काम करणार म्हणून सरपंचांनी पाच सहा माणसं पाठवून मंदिर स्वच्छ करून ठेवले होते. या कळंकी गावाने म्हणजे धक्‍क्‍यामागून धक्के द्यायचा सपाटाच लावला होता. मारुती मंदिराच्या प्रशस्त आवारात मुक्काम पडला. आजची दिवसभराची वाटचाल आणि सूर्यास्ताची स्वर्गीय दृश्‍य डोळ्यासमोर तरळत असतानाच अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा उद्याच्या दिवसाचे वेध लागायला सुरुवात झाली होती.

कळंकीमधली पहाट उजाडली तीच मुळी मारुती मंदिरातल्या भजनांनी. पूर्व क्षितिजावर रंगपंचमीची सुरुवात झाली होती. बाहेर येऊन बघतो तर सरपंचांनी एका मावशींना चहा घेऊन मंदिरात पाठवलं होतं. एवढ्या राजेशाही पाहुणचाराची सवय नव्हती हो. सगळं आवरून आणि सरपंचांचे आभार मानून सात वाजता

निघालो. आज राजदेहेर ऊर्फ ढेरीचा किल्ला आणि माणिकपुंज बघून परतीचा प्रवास सुरू करायचा होता. जातेगाव - ढेकू - नायडोंगरीमार्गे राजदेहेर किल्ल्याच्या जवळच्या गंगा आश्रमात पोचलो. गडाच्या वाटाड्याला आधीच फोन करून ठेवल्याने आम्ही यायच्या आधीच स्वारी पायथ्याला वाट बघत थांबली होती. गंगा आश्रमाच्या पुढे गडाच्या अगदी पायथ्याला श्रावणबाळ तळे आहे. याला श्रावणबाळ तळे नाव का पडले ते प्रभू रामचंद्रलाच ठाऊक. पायथ्यापासून पाहिल्यास राजदेहेर किल्ला सुळकेवजा दिसतो. गडाची उंची फार वाटत नव्हती पण दमट हवा घाम काढणार हे आता स्पष्ट जाणवत होते. गडाच्या सुळक्‍याचे फोटो काढण्यात आम्ही मग्न असतानाच आदरणीय गाईडसाहेबांनी ज्ञानामृताचा असा काही जहाल डोस दिला की आम्हाला वेड लागायचीच पाळी आली..

‘साहेब...तुम्हाला माहितेय का...अफझलखानाला मारल्यावर शिवाजीमहाराजांनी या कड्यावरून आपला घोडा ढेरी किल्ल्यावर चढवला होता आणि औरंगजेब त्यांना शोधत आला होता.’

तो नक्की शुद्धीतच आहे ना हे मी सर्वांत आधी पाहून घेतले. पण या ठिकाणी एक लक्षात ठेवावे, हे स्थानिक लोक ना गिर्यारोहक असतात ना इतिहाससंशोधक. आपल्या गावात एक किल्ला आहे आणि त्यावर महाराज येऊन गेले या त्यांच्या भाबड्या भावनेचे खुल्या दिलाने कौतुक करावं...भले ते सांगत असलेली घटना कितीही अतार्किक का असेना. त्यामुळे त्यांच्या भावनेचा आदर करावा.

राजदेहेर किल्ल्याला उजवीकडे ठेवत वाट आडवी जात होती. पाऊण तासात गडासमोरच्या पठारावर येऊन पोहोचलो. इथून गडाच्या विरुद्ध दिशेला जाणा-या वाटेला ‘अढाई शिडीचा घाट’ म्हणतात आणि तो तिथल्या जवळच्या जातेगाव महादेवाच्या डोंगरावर जातो. इथून पुढे गडाचा एक अतिशय सोपा कातळटप्पा पार करून फुटक्‍या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. राजदेहेरचा विस्तार बऱ्यापैकी असून गडावर पाण्याची भरपूर टाकी,उध्वस्त अवशेष, तटबंदी, दरवाजाचे अवशेष इत्यादी वास्तू आहेत. माथ्यावरून दिसणारे नजारा मात्र अप्रतिमच आहे. विस्तारभयामुळे इथे सर्व अवशेषांचे वर्णन करता येणार नाही. गडावरून उतरताना गर्द झाडीने भरलेली एक नाळ थेट श्रावणबाळ तळ्यापाशी उतरते. वाटाड्याच्या कृपेने आम्ही तासाभरात खाली आलो आणि या भटकंतीमधला शेवटचा किल्ला असलेल्या माणिकपुंज किल्ल्याकडे आता प्रवास चालू झाला. राजदेहेरहून नायडोंगरी-जळगाव खुर्द- कासारी फाटामार्गे माणिकपुंज किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या माणिकपुंज गावात जाता येतं. गडाच्या पायथ्याला सुरेख कोरीवकाम असलेलं मंदिर असून त्याच्या आवारात काही निखालस सुंदर मूर्ती ठेवल्या आहेत. माणिकपुंज किल्ला चढायला वीस मिनिटे पुरे. गडाच्या वरपर्यंत स्थानिक गावक-यांनी पायऱ्या बांधलेल्या असून गडाच्या वाटेवर एक गुहा व पाण्याचे खांबटाके असून गडमाथ्यावरसुद्धा तुरळक तटबंदीचे अवशेष असून एक खांबटाके व भैरोबाचे ठाणे आहे. पण माणिकपुंजच्या माथ्यावरून दिसणारी अंकाई रांग म्हणजे जन्नत! जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. माणिकपुंज किल्ल्याचा परिसर मात्र अविस्मरणीय आहे. माथा सोडला तेव्हा पाच वाजत आले होते. 

मावळतीची किरणं आसमंतावर पसरायला सुरुवात झाली तेव्हा आम्ही मात्र पुढच्या भटकंतीचे बेत आखत गडमाथा उतरत होतो!!

संबंधित बातम्या