जिवघेणा वैशाखवणवा 

पंकज झरेकर  
सोमवार, 11 मार्च 2019

ट्रेक कथा
 

होळीचा चूड आणि रानातले पळस अगदी हातात हात घालूनच केशरी होतात. रानातले जंगलाचे माथे पळसाने पेटले आणि होळीला चूड लागला, की सह्याद्रीच्या डोंगरवाटांची उन्हातली भटकंती थांबवावी आणि जरा घरी लक्ष देण्याचा वर्षभराचा कोटा पूर्ण करून घ्यावा असे प्रस्थापित संकेत सांगतात. पण प्रस्थापित संकेतांना उधळून लावायचीच आमची जुनी बंडखोर सवय; मग त्या संकेताचीच उन्हातली भटकंती थांबवावी, पण रात्रीच्या आणि सकाळी लवकर केलेल्या भटकंतीला का नाराज करायचे? असा सोईस्कर अर्थ लावून आम्ही बेत आखलाच. सह्याद्रीच्या अवघड वाटांशी तर आमची जुनीच मैत्री! त्याच मैत्रीला स्मरून अशीच एखादी बिकट वाट निवडून ती पायाखाली तुडवायची आणि पुन्हा एकवार आपला दमसासाचा कस लावायचा, भव्य अशा कोकणात उतरणाऱ्या कड्याशी एकरूप व्हायचे असा विचार करूनच बाहेर पडायचे ठरले. शनिवारी दुपारी निघून तेलबैलाच्या पठारावर चांदण्या रात्री हवा खात कॅंप लावायचा आणि चंद्र मावळला, की चांदण्या मोजत गप्पा थाटायच्या. पहाटेच उठून खाली कड्याच्या बगलेत लपलेल्या ठाणाळ्याच्या प्राचीन लेण्यांकडे जरा वाकडी वाट करायची. उन्हे चढण्याच्या आतच पुन्हा तेलबैला पठारावर येऊन दुपारच्या आधी घरी पोचून घरच्यांना एक सुखद ‘भॉ’ करायचे डोक्‍यात पक्के केले होते. शिलेदार मागल्या रतनगड ट्रेकचेच होते. अजय, स्वानंद आणि त्याची बायको नभा; सोबत सागरही आला. फोनाफोनी करून दुपारी दोन वाजता जमण्याची वेळ ठरवली. 

दुपारी तिथे पोचलो तेव्हा स्वानंदने सुखद धक्का दिला. छान मॅरिनेशन करून बटाटे, पनीर वगैरे आणले होते. सोबत बार्बेक्‍यूच्या सळ्या. व्वा..! कॅंपिंगला अधिकच मज्जा येणार. सगळे पॅकिंग करून निघालो आणि चांदणी चौकाच्या पुढे रस्ता अगदी तोंडपाठ. पिरंगुट, पौड, माले, मुळशी, गोनवडी, वारक, चाचवली, निवे मार्गे खिंडीतल्या भैरवनाथाचे दर्शन घेऊन लोणावळ्याच्या रस्त्याला लागलो. उन्हाचा दाह चांगलाच जाणवत होता. रस्ता तसा पिंपरीपर्यंत बरा होता, पण तिथून पुढे त्याने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पिंपरीच्या तलावाच्या बाजूने कैलासगडाकडे पाहात डावीकडे वळण घेत तेलबैलाकडे निघालो. आतापर्यंत पाव फूट खोल असलेले खड्डे अर्धा फूट झाले, पुढे एक फूट आणि लुथ्रावनाच्या पुढे रस्ताच नाहीसा झाला. आम्हाला लवकरात लवकर तेलबैला गाठायचे होते. कारण गावात पोचल्यावर ठाणाळ्याच्या वाटेची माहिती काढून सुरक्षित जागी मुक्काम टाकायचा होता. नवरा-नवरी-भटजीच्या (सुळके) वऱ्हाडातून पुढे निघालो आणि भांबर्डे गावातून घनगड सामोरा आला. त्याच्याकडे पाहात पाहात एकोल्याकडे जातानाच मुंगुसाने वाट कापली. उजव्या बाजूने येऊन रस्त्याच्या मधोमध क्षणभर थबकले आणि आमच्याकडे तोंड करून पाहिले. पाचच मिनिटांत एकोल्याच्या पुढे उजवीकडच्या रानातून पिवळाधमक नाग सळसळत रस्ता ओलांडून डावीकडे चालला होता. त्याला पाहाताच मी कचकावून ब्रेक मारला आणि मागच्यांना थांबायचा इशारा केला. उतरत्या उन्हात काय सुवर्णकांती चमकावी. जणू फक्त आम्हीच बघावे म्हणूनच त्याने अर्धवट फणा वर उचलला आणि यू-टर्न मारून पुन्हा उजवीकडच्या रानात शिरला. रस्त्याच्या बाजूच्या चारीतून आमच्याकडे पाहात अंदाज घेत होता. आम्ही जागेवरच पाहून तो आतमध्ये शेतात सळसळत गेला आणि एका बिळात बसून फक्त डोकेवर काढून चाहूल घेत राहिला. नभाचे गेल्या कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. तिने असा रानात कधीच साप पाहिला नव्हता... आणि चक्क आज नाग दिसला होता. त्याला अधिक त्रास व्हायला नको म्हणून आम्ही तिथून काढता पाय घेतला. 

गाड्या आपटीत तेलबैला फाट्याला येऊन पोचलो. तिथून पुढे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली होती. थोडा बरा रस्ता होता, तो संपला आणि अक्षरशः खाचखळगे म्हणायलाही लाज वाटेल, एवढा वाईट रस्ता आला. त्यात खडे चढ-उतार, रस्त्यात मोठमोठाले दगडगोटे, म्हणजे कार घेऊन जायची तर स्पेअर ॲक्‍सल, ऑइल टॅंक आणि ऑइल कॅन घेऊन जायला लागेल, असाच रस्ता. उताराला काही वेळा बाईकही सिंगलशीट घेऊन जावी लागली. कसेबसे गावात पोचलो. समोर दिसलेल्या एका घरात ‘चहा मिळेल का?’ म्हणून चौकशी केली आणि गाड्या तिथेच लावल्या. हेल्मेट त्याच काकांच्या घरात टाकून चहा सांगितला. पण चहा होता तो बिनदुधाचा. माझ्या घशाच्या खाली उतरण्याच्या पलीकडला! म्हणून मग बॅगमधली रतनगडाची उरलेली मिल्क पावडर त्यात टाकली आणि काडीच्या स्टररने ढवळले. मग त्यातून तरंगणाऱ्या मुंग्या बोटाने बाजूला करून चहा प्यायलो. 

आता सूर्यास्ताला दहा-पंधरा मिनिटेच शिल्लक होती. रस्ता विचारून घेतला आणि लाल-केशरी पश्‍चिम रंग पाहात मावळत्या सूर्याच्या दिशेने धुळाटीत पायपीट सुरू केली. समोर अस्तावणारा सूर्य आणि त्याच्या पार्श्‍वभूमीवर गावाबाहेर लागलेल्या गवताच्या गंजी, गावाकडे परतणाऱ्या गाई, स्वप्नात पाहिला तसाच रस्ता आणि घाटाच्या कडेवरचा वायरलेस टॉवर ठळकपणे उठून दिसत होता. वाटेत सवाष्णीचा घाट चढून आलेले पाच्छापूरचे फासेपारधी दिसले. त्यांच्या हातात गावठी रायफली होत्या. त्यांना वाट विचारण्यासाठी आवाज दिला, पण त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, जुजबी बोलून त्यांनी काढता पाय घेतला. खाली ठाणाळ्याला उतरणारी वाट शोधणे आता शक्‍य नव्हते. म्हणून मुक्काम टाकायला जागा शोधली. सगळीकडे गवत माजले होते. अशा जागी मुक्काम पडणे जिकिरीचे असते. कारण गवतात असणारे जीव आणि आजूबाजूचे रान आपल्या आगीने पेटण्याची भीती. अगदी अंधार पडण्याच्या वेळेला एक जागा निश्‍चित केली. तिथले गवत आधीच जळून गेले होते. अगदी कड्याच्या टोकाची जागा. पाच-पन्नास पावलांवर कडा. कोकणातला खारा वारा अंगावर घेत आकाशाकडे पाहात गप्पा ठोकायच्या. ऐकूनच मज्जा वाटते ना? आम्ही तर प्रत्यक्ष ते अनुभवले. आता पाळी होती ती आग पेटविण्याची. वाळलेला लाकूडफाटा जमा केला आणि काडेपेटी असूनही चाकूने ठिणग्या पाडून आग पेटविण्याचा हट्ट मी आणि स्वानंदने पुरा केलाच. दोन संसार मांडले गेले. एक बार्बेक्‍यू आणि एक सूप-मॅगीसाठी! गरमगरम सूप प्यायल्यानंतर जरा तरतरी आली. जेवण होता होता आमच्या गप्पा उत्तरोत्तर रंगत राहिल्या. खाणे आटोपल्यावर सगळा कचरा जमा करून पिशवीत भरून जरा लांब ठेवला. कारण जवळ ठेवला, तर गवतातून कोणताही प्राणी त्याच्याजवळ येऊ शकतो. अगदी उंदीर आणि त्याच्यामागे सापही. कोल्हे-कुत्रे वेगळेच. स्लिपिंग बॅगमध्ये घुसलो, तर गरम होते आणि बाहेर राहिलो, तर थंड वारा लागतोय, अशी विचित्र स्थिती. पण कसाबसा जरा डोळा लागला, तर खालून कुसळे बॅगमध्ये घुसली. जिथे टोचतील तिथले हाताने काढून टाकत नाही, तर कुणाचे तरी घोरणे सुरू झाले. सागर झोपेत घड्याळाच्या काट्यासारखा गरागरा फिरत होता. पहाटे साडेतीन-चारला उठलो तेव्हा ‘चंद्र नाही साक्षीला’ म्हणून आता ताऱ्यांचे फोटो काढता येतील म्हणून तो उद्योग करत बसलो. गुगल स्काय मॅपच्या कृपेने सगळी नक्षत्रे ओळखता आली. पूर्ण आकाशगंगा तर उघड्या डोळ्यांनी मी प्रथमच पाहिली. तीही कॅमेऱ्यात बंदिस्त केली. अजयने फक्कड चहा जमवला. मंद शीतल पहाटवाऱ्यात मित्रांच्या सोबतीने चहाचे घुटके घेत पुढे दिवसभरात काय काय करणार आहोत त्याची उजळणी केली. खाली ठाणाळ्याच्या लेण्यांत जाऊन टाक्‍याचे पाणी मिळेल, मग नाश्‍ता तयार करून खाऊ; दुपारी घरी पोचून डेझर्ट कूलरच्या थंडगार हवेत मी कसा आराम करणार आहे, हे अगदी रंगवून सांगितले. चहा आटोपून आम्ही वायरलेसच्या टॉवरच्या मागून वाघजाईचा घाट उतरायला सुरुवात केली. एक टप्पा उतरून आलो, तेव्हा एक अगदी छोटे पठार लागले. पुढल्या वेळी मुक्काम इथे करायचा हे नक्की केले. अगदी प्रायव्हेट कॅंपिंगचीच जागा. तिथून खाली काही दगडी पायऱ्या होत्या. त्या उतरून समोर वाघजाईचे ठाणे आले. दगडाच्या भिंती आणि वर पत्रा टाकलेले लहानसे मंदिर. तिथे दर्शन घेऊन पुढे उतरायला लागलो. आनंद पाळंदे यांच्या चढाई-उतराईच्या पुस्तकाच्या पानांचे फोटो काढून आणले होते, ते वाचून अंदाजे वाट ठरवली. खाली कोकणतळात कोंडगावचा वेडावाकडा पाझर तलाव ओळखता आला. त्यावरून बाकीच्या वाटेचा अंदाज बांधला आणि एका पठारावरून कोंडगावकडे जाणारी वाट सोडून डावी घेतली. दोन डोंगरधारा पार करूनही लेणी कुठेच दिसेनात. आता मात्र बाकी मंडळी थकली होती. मग मी आणि अजयने पुढे जाऊन रस्ता मिळतोय का त्याचा अंदाज घेण्याचे ठरवले आणि एक वॉकीटॉकी घेऊन निघालो. अर्धा तास चालल्यावर एका खोबणीत आलो. दोन्हीकडे उंच चढत गेलेले डोंगर आणि मधे कोरडी पडलेली पांदी; तिथे बसून मी पांदीतून कड्याच्या दिशेने वर जाऊन झाडीच्या डोक्‍यावरून काही दिसतेय का त्याचा अंदाज घ्यायला लागलो आणि अजयला समोरच्या नाकाडावर जाऊन पाहायला सांगितले. शेवटी त्याच नाकाडाच्या पल्याड अजयला लेणी दिसली. दोघांनीही मोठा हुश्‍श्‍श केला. हाळी देऊन मागे राहिलेल्यांना यायला सांगितले आणि ते आल्यावर त्या दिशेने कूच केले. डोंगराला वळसा घालून गेल्यावर एक कोरडे टाके लागले. इथेही मुंगुसाने पुन्हा एकवार दर्शन दिले. निसरड्या उतारावरून चालताना सागरची धावपळ होत होती. त्याला कसेबसे हाताला धरून आणले. तोवर मी पोचून फोटो काढून घेतले. एव्हाना आमच्याकडे असलेले सगळेच पाणी जवळपास खल्लास झाले होते. सगळ्यांकडे मिळून एखादा लिटर शिल्लक होते. अजय जाऊन कुठे टाके दिसते का ते पाहून आला. पण कुठेच सापडले नाही. त्यामुळे नाश्‍ता तयार करण्याचा बेत रद्द झाला. दोन-तीन बिस्किटे खाऊन साडेदहाला आम्ही परतीची वाट धरली. ऊन चढले होते. मानेला चटके देत होते. सगळ्या रानात वणवे पेट(व)ल्याने कोळसा आणि राख दिसत होती. त्याची धग त्रास देत होती. तापलेले रान आणि त्यात वणव्याची शिल्लक धग आणि धूर. 

हिरवे पान कुठे नजरेस पडेना. त्यात कोकणाचा जीवघेणा दमट उष्मा आमच्या शरीरांतून पाणी खेचून घेत होता. सपाटीची चाल संपल्यावर जशी चढाई लागली, तसा नभाला त्रास सुरू झाला. तिला थोडे पाणी आणि साखर देत असतानाच सगळ्यांचे सारखेच हाल होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. कुणाचेच शरीर साथ देत नव्हते. पाणी पूर्णपणे संपले. आता शिल्लक काहीच नाही. होती ती बिस्किटे आणि साखर. पण ती खाल्ली तरी पाण्याची गरज अधिकच वाढणार. तेव्हा मिळेल ते पाणी प्यायचे ठरवले होते. पण सगळा कोळसा झालेल्या रानात 
फक्त राख आणि ऊनच दिसत होते. वाघजाईच्या ठाण्याशी पोचता आले, तर कदाचित पाणी मिळेल, एखादे टाके असेल, देवीला कुणीतरी अभिषेक करायला कळशी लावली असेल अशी सुरस स्वप्ने नभाला पडत होती. मलाही या रानात ‘कोक’चा धबधबा कोसळतोय असाच भास होत राहिला. या सगळ्यातून एक आशा होती; माझ्या बॅगमध्ये सगळ्यात तळाला लपवून ठेवलेली पाण्याची अर्धा लिटरची बाटली. पण ती फक्त नभाला चक्कर आली तरच तिला द्यायची आणि बाकी लोकांनी जमेल तसे स्वतःला वर पठारावर पोचवायचे असा गुप्त करार मी आणि अजयने केला होता. वाघजाईचे मंदिर आता सलग चाललो तर पंधरा मिनिटांवर होते, पण तीन मिनिटेही कुणी चालू शकत नव्हते. आता मला घाम येणे बंद झाले आणि डोके जड झाले. घाम येणे बंद होणे ही उष्माघाताची पहिली पायरी असते, हे ठाऊक होते. तेव्हा मी अंग टाकले. सागर वर पुढे जाऊन एकेक घोट का होईना पाणी घेऊन येतो म्हणाला. तेव्हा सिक्रेट बाटलीतले दोनशे मिली पाणी त्यांच्याजवळ देऊन उरलेले पुन्हा इमर्जन्सीसाठी ठेवून दिले. अगदी रांगतच मंदिरात कसेबसे पोचलो. सागरही दिलेल्या पाण्यावर मंदिरापासून पंधरा मिनिटांवर असलेल्या पठारावर पोचला आणि वायरलेस टॉवरजवळच्या बाबांना पाण्याची याचना केली. त्यांनी त्याला पाणी पाजले आणि खाली असलेला जिवंत झरा दाखवला. 

पाणी साठून राहिले होते, झरा आटला होता, बेडूक पोहत होता, पण आम्हाला कशाचीच फिकीर नव्हती. जे मिळेल ते पाणी जीवन होते. प्रत्येकजण कमीतकमी लिटरभर पाणी पिऊन मंदिरात कोसळला आणि आम्ही वाघजाईकडे पाहात होतो. तिचे उग्र रूप असूनही किती वात्सल्याने ओतप्रोत भरलेले वाटत होते. जवळपास अर्धा तासभर झोपा काढल्या. जरा हुशारी आल्यावर पंधरा मिनिटांतच वायरलेस टॉवर गाठून तेलबैला गावाची वाट धरली. मागे वळून पाहिले तर तेच दृश्‍य होते. कोकणातले धुकट वातावरण, खाली जंगल, जंगलात कुठेकुठे पेटलेले पळस; समोर तेलबैलाच्या जुळ्या भिंती, द्वैताची साक्ष देणाऱ्या आणि आजवर आमच्याशी अद्वैत असलेला आणि पुन्हा कधी येताय विचारणारा आमचा तोच सह्याद्री!    

संबंधित बातम्या