लिंगाणावर मशालींचा जागर! 

प्रांजल वाघ 
सोमवार, 25 मार्च 2019

ट्रेक कथा
 

ही  गोष्ट आहे, २०१३ सालच्या धनात्रयोदशीची! थोड्या वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने लिंगाणावर मशालींच्या प्रकाशात धनत्रयोदशी साजरी करून रायगडावरील महामानवास दिलेल्या मानवंदनेची! 

लिंगाणा! शिवछत्रपतींच्या लाडक्‍या रायगडाचा अंगरक्षक, बोराट्याच्या नाळेचा पहारेकरी, सह्याद्रीचा मूर्तिमंत रौद्ररूप धारण केलेला असा हा सुळकावजा किल्ला! जवळजवळ ६५० फुटी शिवलिंगच जणू! समुद्रसपाटीपासून २९६९ फूट असलेला, गगनास भिडलेला, बुलंद, बेलाग, दुर्गम असा हा गड! मित्रांना मित्र आणि शत्रूला भयावह शत्रू वाटणारा, प्रथमदर्शनी धडकी भरवणारा आणि माझा आवडता असा हा लिंगाणा किल्ला! म्हणूनच अरुण सरांनी विचारल्यावर, मी विनाविलंब उत्तर दिले, ‘होय सर! मी नक्की येणार!’ 

मुंबईच्या शिवराज्याभिषेक सोहळा समिती (तिथीनुसार) यांनी अरुण सावंत यांना एक विनंती केली होती. दरवर्षी ही समिती रायगडावर मोठ्या धुमधडाक्‍याने शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा साजरा करते. गेली कित्येक वर्षे त्यांचे हे कार्य अविरत चालू आहे. तसेच दर धनत्रयोदशीला रायगड मशालींच्या उजेडात रात्री उजळून निघतो, तोही यांच्याच प्रयत्नांनी! गडावर ३०० हून अधिक मशाली पेटविल्या जातात. पण या २०१३ची धनत्रयोदशी जराशी वेगळी असणार होती. रायगडाच्या जगदीश्वर मंदिर व समाधीस्थळ येथून समोर उभा असलेला लिंगाणा दिसतो. लिंगाणाच्या मागे नजर फेकली, तर दिसतात ते राजांचे अत्यंत आवडते किल्ले! तोरणा आणि राजगड! यावर्षी एक नोव्हेंबरला, धनत्रयोदशीला लिंगाणाच्या माथ्यावर मशालींचा जागर करायचा होता! 

लिंगाणा चढून त्यावर मशाली पेटवणे हे आमचे ध्येय जरी असले, तरी आमचा आणखी एक छुपा हेतू होता, अन् तो म्हणजे लिंगाणाच्या माथ्यावर मुक्काम करणे! आजपर्यंत कुणीच हे केले नव्हते! पेशवाईच्या अस्तानंतर जवळजवळ २०० वर्षांनी लिंगाणाच्या माथ्यावर मुक्काम करणारे आम्ही कदाचित पहिलेच असू!  
या मोहिमेसाठी निवड झालेले आम्ही १९ जण होतो. मुंबईतून अनेक ठिकाणांहून मंडळी जमा होणार होती. इतकेच नव्हे तर खुद्द महाडहून १४ वर्षांचा मिहीर बुटाला हा उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता! माझ्यासोबत माझे मित्र श्रीनिवास, सागर व सुदेश होते. त्यांची लिंगाणा चढण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे ते भलतेच उत्सुक होते! 

३० ऑक्‍टोबर २०१३च्या रात्री आम्ही मुंबईहून महाडकडे निघालो. सोबत प्रस्तरारोहणाचे साहित्य, दोर, तंबू आणि जेवणाचे जिन्नस! माथ्यावर लावण्यात येणाऱ्या मशाली महाडहून बसमध्ये चढवल्या जाणार होत्या. मिहीरचे वडील, राजेश बुटाला येऊ शकणार नव्हते, पण मशाली तयार करण्याची जबाबदारी त्यांनी आपणहून स्वीकारून ती लीलया पार पाडली होती. ३१ तारखेला सकाळी चार वाजता आम्ही जेव्हा महाडला पोहोचलो, तेव्हा नेहमीचे स्मितहास्य करीत राजेशदादा, त्यांनी मेहनतीने तयार केलेल्या मशाली आणि वाफाळता गरमा-गरम चहा आमच्या स्वागतास सज्ज होता! काही काळ विश्रांती घेऊन आम्ही महाडहून लिंगाणाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाने’ गावाकडे निघालो. कोकणातले अवघड, वळणदार रस्ते कापत जेव्हा आमची बस पाने गावात पोहोचली तेव्हा सकाळचे १० वाजले होते.  

पाने गावात आम्हाला बबन कडू भेटले. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात लिंगाणा म्हटलं, की बबनदादांचे नाव आपसूकच येते. अगणितवेळा लिंगाणा सर करणारा हा अनुभवी रांगडा वीर आम्हाला वाटाड्या म्हणून मिळाला हे आमचे महत्‌ भाग्यच. सर्व साधन-सामग्रीचे वाटप करून आम्ही १९ जण बबनदादांच्या मागे निघालो. गावामागे लिंगाणा किल्ला दिमाखात उभा आहे. ही चढाई तीन टप्प्यांत होणार होती. पाने गावातून सुमारे तासभर चढाई केल्यावर लिंगाणा माचीवरील कडसरी गाव लागते. येथून परत दोन तासांची चढाई करत लिंगाणा किल्ल्याला वळसा घालायचा, की मग शेवटचा प्रस्तरारोहणाचा तप सुरू होतो. पण गरमी, वाढते ऊन, आदल्या रात्री पडलेला पाऊस आणि त्यामुळे दमट झालेली हवा! यामुळे पहिल्याच चढाईला आमची दमछाक झाली. दीड तास चढून आम्ही लिंगाणा माचीवर कडसरी येथे पोहोचलो. गाव ओस पडले होते. गावात दगडी बांधकामाची, ऐसपैस ओसरी असलेली आणि एकेकाळी माणसांनी गजबजलेली घरे आज रिकामी होती. कारण, पावसाळ्यात येथे दरड कोसळते, तो धोका लक्षात घेऊन सरकारने काही वर्षांपूर्वी हे गाव इथून हलवले. तेव्हापासून हे गाव ओस पडले आहे! 

सन १७१८ मध्ये कडू कुटुंबाने स्थापन केलेल्या जननी देवी मंदिरात काहीवेळ आम्ही विश्रांती घेतली व फिरून चढाई सुरू केली. आता चढ वाढला होता. इथून चढून आम्हाला लिंगाणाच्या कड्यांमध्ये खोदलेल्या गुहेत पोहोचायचे होते. तिथे भोजन करून आम्ही पुढच्या कामगिरीला लागणार होतो. पण एरवी सोपा असलेला रस्ता आता कठीण झाला होता. पावसाळ्यात माजलेले गवत व त्यात लुप्त झालेल्या वाटा शोधणे कठीण होते. पण, इथे बबनदादांची खूप मदत आम्हाला झाली. एव्हाना सूर्य डोक्‍यावर येऊन आग ओकीत होता, घामाच्या धारा शरीरातून वाहत होत्या आणि पोटात कावळे भुकेचा टाहो फोडत होते. सगळ्यांचे डबे उघडताच आम्ही जेवणावर तुटून पडलो. या गुहेजवळ पाण्याचे सुरेख टाके आहे. पाणी पिण्याजोगे व थंडगार आहे. तिथेच आम्ही पोटभर पाणी पिऊन मग आमच्या बाटल्या भरून घेतल्या. आता लिंगाणाच्या मधल्या गुहेपर्यंत कुठेही पाणी अथवा निवारा नव्हता. ताजेतवाने झालेलो आम्ही परत निघालो. आता किल्ल्याला वळसा घालून, एका अरुंद वाटेवरून पुढे जायचे होते. उजव्या बाजूला खोल दरी, डाव्या बाजूला उभा कडा आणि मधे अरुंद नागमोडी वाट! समोर दिसणारा नजरा विलोभनीय होता. हिरवीगार चादर पांघरलेला रांगडा सह्याद्री सभोवताली पसरला होता. दूर पाण्याच्या दोन धारा खाली डोहात कोसळत होत्या. पण आम्ही या दृश्‍याच्या सौंदर्यास बळी न पडता, पायाखाली नीट लक्ष ठेवून चाललो होतो. नाहीतर, ‘चुका ध्यान, गई जान' ही महामार्गांवरील म्हण इथे चुकून खरी ठरायची! 

ही वाट मध्येच तुटलेली आहे. सरळ चालत जाणे शक्‍यच नाही. दोराच्या साहाय्याने हा टप्पा पार करावा लागतो. सगळ्यांनी पटापट आपापल्या हार्नेस चढवून घेतल्या व सज्ज झाले. एकावेळेस एकच माणूस इथून जाऊ शकत होता. इथे बबनदादांनी पुढाकार घेतला. सरळ रस्त्यावर चालावे इतक्‍या सहजतेने तो कातळटप्पा त्यांनी पार करून दुसऱ्या बाजूला दोर बांधला, जेणेकरून बाकीच्या लोकांना दोराच्या साहाय्याने तो टप्पा पार करणे सोपे झाले.  

इथून आणखी २० मिनिटे चालल्यावर, आपण थेट लिंगाणाच्या कातळाला भिडतो. या ठिकाणी पोहोचायला आम्हाला ४ वाजले होते. अरुण सर आणि बबनदादा दोर लावून पुढे गेले होते. नुकताच पाऊस झाल्यामुळे माती भुसभुशीत आणि कातळ गुळगुळीत झाला होता. यामुळे अगोदरच उभा असलेला चढ आणखी कठीण झाला होता. यामुळे आमची गती पण मंदावली होती. 

अरुण सर, मी आणि मागच्या कातळटप्प्यावर देखरेख करणारे स्वप्नील पालव व कुणाल देशमुख, असे आमचे तीन गट वॉकी-टॉकीच्या साहाय्याने एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे, मोहिमेचे व्यवस्थापन सोपे झाले होते. माझ्या गळ्यात लटकलेला वॉकी-टॉकी खरखरला. अरुण सर बोलत होते, ‘प्रांजल, आम्ही गुहेपर्यंत पोहोचलोय. तुमचे स्टेट्‌स काय आहे? ओव्हर.' सर, प्रांजल बोलतोय. ‘स्वप्नील मागे कातळटप्प्यावर आहे. अजून त्यांना यायला अवकाश आहे. मी क्‍लाइंबिंग सुरू करतोय. ओव्हर.' ‘ठीक आहे, तू तुझ्याबरोबरील मुलांना घेऊन लवकरात लवकर चढ. अंधार पडायच्या आत माथा गाठायचाय! ओव्हर.' ‘ओके सर! ओव्हर अँड आउट!’ 

आम्हाला ३१ तारखेलाच लिंगाणा सर करणे गरजेचे होते. कारण, रात्री १२ वाजता मशाली पेटवून रायगडावरील लोकांना इशारत द्यायची होती. आता ४ वाजून गेले होते. उजेड फार फार तर २ तास टिकणार होता. काळोखात प्रस्तर चढणे म्हणजे कठीण कर्म आणि त्यात परत अमावस्या असल्यामुळे अंधारात डोळ्यासमोरचे देखील काहीच दिसणार नव्हते. मग प्रस्तर चढणे तर दूरची बात! 

अचानक हालचालींना वेग आला. मी पटापट सागर, श्रीनिवास आणि सुदेश यांना घेऊन प्रस्तर चढणे सुरू केले. १५-२० मिनिटांत आम्ही लिंगाणाच्या गुहेपाशी पोहोचलो. सागर आणि श्रीनिवास यांना मी पाणी भरण्यास पाठवून दिले. आजचा आमचा मुक्काम माथ्यावर होता...आणि ही गुहा म्हणजे पाणी मिळण्याचे शेवटचे ठिकाण होते.  

इतक्‍यात माझा वॉकी-टॉकी परत खरखरला आणि त्यातून अरुण सरांचा परिचित आवाज आला, ‘प्रांजल, खूप उशीर झालाय. जे खाली असतील त्यांना गुहेत मुक्काम करू दे. त्यांना वर घेऊन येणे, आज शक्‍य होणार नाही. तुम्ही लोकं वर या! ओव्हर!' ही बातमी खाली असलेल्या मुलांना सांगणे खूप कठीण होते. पण ते तितकेच गरजेचेही होते. गिर्यारोहण मोहिमेत असे कठोर निर्णय घ्यावे लागतातच. मी सरांचा हा निर्णय जेव्हा मागे असलेल्या मुलांना कळवला, तेव्हा त्यांनी मला विनंती करून माझे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. इतक्‍या दूरवर येऊन त्यांना लिंगाणा चढता येणार नव्हता. केवळ वेळेअभावी! ते माझे मित्र जरी असले, तरी मला त्यांच्याशी कठोर वर्तन करावे लागले. याचे कारण, गिर्यारोहण करताना असे निर्णय डावलून जर मी त्यांना सोबत घेतले असते, तर अंधारात चढाई करताना ते कदाचित जिवावरही बेतू शकले असते. म्हणून त्यांना खालच्या गुहेत मुक्काम करायला लावून, आम्ही गुहेच्या मागील ४० फुटी प्रस्तर चढण्यास पुढे सरसावलो. 

एव्हाना अंधार पडायला लागला होता, म्हणून मी सरसर चढत तो प्रस्तर पार केला. वर बोल्टला दोर अडकवला आणि सुदेश, श्रीनिवास आणि सागर यांना वर घेतले. आमचे सामान आता ओढायचे होते. स्वप्नील आणि कुणाल तिथे पोहोचले होते. त्यांनी सामानाला दोर अडकवला आणि आम्ही खेचायला सुरवात केली...आणि इथेच सगळा घात झाला! अंधार पडायला लागल्यामुळे मी डोक्‍याला हेड-लॅंप लावला होता. समान ओढताना मी किंचित जास्त झुकलो आणि तो दिवा डोक्‍यावरून निसटून, प्रस्तरावर आपटत खाली पायथ्याला जाऊन पडला. स्वप्नीलने हेड-लॅंप उचलला तेव्हा तो चालू होता, पण त्याचे ३-४ तुकडे झाले होते. आता मला पुढची चढाई मिट्ट अंधारात करायची होती. सोबत श्रीनिवास होताच. त्याला म्हणालो, ‘श्रीनिवास, आता माझी यशस्वी चढाई तुझ्या दिव्याच्या उजेडावर अवलंबून आहे. ठेचा खात, धडपडत, अमावास्येच्या काळोख्या रात्री एकमेकांचे सहकार्य करत आम्ही चढत होतो. सोबतीला आधार म्हणून हाती दोर आणि डोक्‍यावरील विजेरीचा अंधूक प्रकाश! अजून किती चढाई बाकी आहे, याचा अंदाज लागणे देखील कठीण होते. पण तरीही मी लिंगाणा यापूर्वी सर केल्याने मी अंदाज लावत होतो. अचानक समोरून एक विजेरी चालत आली. डोळ्यावर हात ठेवत मी समोरच्या विजेरीला विचारले, ‘कोण? अरुण सर? अजून किती वेळ लागेल पोहोचायला?' सर हसले आणि म्हणाले, ‘अरे तुम्ही माथ्यावरच आहात! चला! 

अक्षरशः अचानक, नकळत आम्ही लिंगाणा सर केला होता...आणि तेव्हा रात्रीचे बरोब्बर ८ वाजले होते! एकमेकांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आम्ही आमच्या ‘छावणीत' पोहोचलो. सामान खाली ठेवले, जमिनीला पाठ टेकवली आणि आकाशाकडे नजर गेली. एखाद्या खजिन्यातील हिरे-माणके चमकावीत तसे असंख्य तारे आकाशात लुकलुकत होते. आकाशगंगेची धुरकट आकृती नजरेस पडत होती. विश्वाच्या विशाल रूपाची ती एक छोटी झलक होती. माणूस म्हणून आपण किती नगण्य आहोत याची जाणीव अशा वेळी होते.  

इतक्‍यात स्वप्नील, कुणाल आणि इतर मंडळी पोहोचली. आम्ही एकूण ११ जणांनी लिंगाणा सर केला होता! पण अजून काम अर्धेच झाले होते. रात्री १२ वाजताच्या ठोक्‍याला मशाली पेटायला हव्या होत्या. वाऱ्याचा जोर वाढत होता. या वाऱ्यात मशालींच्या ज्योती तेवत ठेवणे महत्त्वाचे होते. कारण रायगडावरील शिवभक्तांना त्या दिसणे गरजेचे होते. मग कामाची विभागणी करण्यात आली. अरुण सर, मी आणि श्रीनिवास तंबूमध्ये शिरलो आणि आम्ही स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारली. बाहेर स्वप्नील, सागर आणि मंडळी मशालींचे बोळे (तुंबळ) तेलात भिजवून, ते पेटवण्याच्या मागे लागली. 

जसा तंबूमध्ये जेवणाचा अगदी फक्कड बेत जमून येत होता, तसेच बाहेर देखील मशाली पेटवण्याच्या प्रयोगांना यश येत होते. वाऱ्यामुळे काही मशाली विझत होत्या, पण बऱ्याच मशाली वाऱ्याला न जुमानता फुरफुरत होत्या. हे पाहून मशालींच्या उजेडात मुलांच्या चेहऱ्यावर समाधानी भाव उमटत होते. बाहेर थंडीत कुडकुडत बसलेल्या भुकेल्या जिवांना तंबूतील तयार होत असलेल्या जेवणाचा सुगंध अस्वस्थ करीत होता. त्यामुळेच, ‘जेवण तयार आहे!' अशी अरुण सरांनी घोषणा करताच सगळ्यांनी तंबूमध्ये धाव घेतली. टोमॅटो सूप, ठेपले, पिठलं, श्रीखंड आणि बबनदादांच्या घरच्या भाकऱ्या असा गरमा-गरम साग्रसंगीत बेत तयार होताच. काही क्षणातच पोरांनी जेवणाचा समाचार घेतला आणि समाधानाचे ढेकर देतंच तंबूच्या बाहेर पडले. 

तासाभरातच रायगडावर मशालींचा जागर सुरू होणार होता आणि त्याला उत्तर लिंगाणावरून दिले जाणार होते. मग प्रत्येकी दोन-दोन मशाली देण्यात आल्या. त्यातील बोळे तेलात चिंब भिजवण्यात आले. मध्यरात्रीचे ठोके होताच मशाली पेटविल्या गेल्या. वाऱ्यावर मशाली पेटवणे अवघड होतेच, पण त्या पेटत ठेवणे म्हणजे कमालीची कसरत! नाना उद्योग करत आम्ही मशाली पेटत्या ठेवत होतो! पण रायगडावर मशाली दिसत नव्हत्या. दूर नगारखान्याच्या दिशेला, राजदरबारात अंधूक उजेड दिसत होता. आमचा उत्साह वाऱ्यामुळे फडफडनाऱ्या ज्योती सारखा डळमळू लागला... आणि इतक्‍यात सुदेशला जगदीश्वर मंदिराकडे दोन मिणमिणते दिवे दिसले. जगदीश्वर मंदिराकडे दोन मशाली पेटल्या होत्या. रायगडाला जाग आली होती! हे दृश्‍य पाहताच लिंगाणावर एकच जल्लोष झाला. लिंगाणावरून दिलेल्या इशारतीला रायगडाने उत्तर दिले होते. आमचा हेतू सफल झाला होता. आम्ही धनत्रयोदशीला लिंगाणावर मशालींचा जागर केला होता. या जल्लोषात कुणीतरी उत्स्फूर्तपणे गगनभेदी घोषणा दिली, ‘प्रौढप्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज की...आणि एकाच वेळी आमच्या आवाजाने सारा आसमंत दुमदुमला...जय!'

(छायाचित्रे : प्रांजल वाघ, अरुण सावंत, सुदेश रेणुसे)

फोटो फीचर

संबंधित बातम्या