तपोवनच्या वाटेवर...

प्रथमेश लखोटे, बदलापूर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

ट्रेककथा

साधारण २० किंवा २१ मेचा दिवस, मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत होतो. काम करून जरा कंटाळा आला म्हणून सहज गुगल उघडून ट्रेक्स इन इंडिया असे टाकून शोधत बसलो. त्यात ‘तारसर मारसर’ हा काश्मीरमधील अत्यंत सुंदर असा ट्रेक दिसला. मग त्याची माहिती काढली. साधारण ‘कमी ते मध्यम’ काठिण्याचा आणि समुद्रसपाटीपासून १३,२०० फूट उंचीचा हा ट्रेक आहे. मला हा ट्रेक खूप आवडला. दोन उंचीवरच्या तलावांशेजारी ‘कॅम्पिंग’ करणे हे दृश्यच खूप स्वप्नातल्या जागेसारखे होते. मी तो ट्रेक लगेच जुलै महिन्यासाठी बुक केला आणि पैसेसुद्धा भरले. काही दिवसांतच बातमी आली, कलम ३७० रद्द झाल्याची. काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण पसरले. त्यामुळे पुढचे काही महिने जम्मू आणि काश्मीरमध्ये सगळी पर्यटनस्थळे बंद करण्यात आली. मला त्या गोष्टीचे वाईट वाटले, कारण मी गेली १-२ वर्षे कुठेच असा फिरायला गेलो नव्हतो. काही दिवसानंतर मला ज्या संस्थेबरोबर ट्रेकला जाणार होतो, त्यांचा मेल आला. ते म्हणत होते, की एकतर पैसे परत घ्या किंवा दुसरा ट्रेक बुक करा. मला ट्रेकच करायचा होता.  

मी परत शोधाशोध करायला लागलो आणि एका ट्रेकने माझे लक्ष वेधून घेतले. तो म्हणजे ‘गोमुख-तपोवन’! असे म्हणतात, की गंगा नदीचा उगम बघायचा असेल तर गंगोत्री, उत्तराखंडला जावे. ‘गोमुख’ म्हणजे गाईचे मुख, गाईच्या मुखातून या नदीचा उगम आहे, काय सुंदर उपमा आहे! भारतात सियाचीननंतर गोमुखच सर्वात मोठी हिमनदी आहे, अशी माहितीही मिळते. भागीरथी नदीचा उगमही इथलाच. हीच भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम होऊन पुढे गंगा नदी निर्माण होते. तसेच अलकनंदा नदीचा उगम सतोपंथ हिमनदीतून होतो असे म्हणतात (दोन्ही जागा उत्तराखंड राज्यातच आहेत) आणि होय त्याचासुद्धा ट्रेक आहे. 

भागीरथी नदीच्या कथेमध्ये सांगितले जाते, की भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांना आणि त्यांच्या पापांना मोक्ष मिळावा म्हणून ब्रह्मदेवाकडे मागणी केली आणि ब्रह्मदेवाने गंगेला पृथ्वीवर जायला सांगितले. पण गंगा म्हणाली की तिच्या पाण्याचा जोर इतका आहे, की पृथ्वीवर पूर येईल. त्यावर भगीरथ राजाने शंकराकडे प्रार्थना केली. शंकराने आपल्या जटा मोकळ्या केल्या आणि त्यातून गंगेला जायला सांगितले. अशाप्रकारे गंगा नदी पृथ्वीवर आली. म्हणूनच हिंदू धर्मात गंगेत अंघोळ केली, की सारी पापे धुतली जातात असे म्हणतात. 

आता आपण वर्तमानात येऊ. तसा ‘गोमुख-तपोवन’ हा ट्रेक थोडा कठीण आहे. साधारण १४,२०२ फूट उंची आणि ४४-४५ किमी असा चालत येऊन-जाऊन केलेला ट्रेक आहे. या ट्रेकची सुरुवात १०,०५५ फुटांवर असलेल्या गंगोत्री या छोट्या गावापासून आहे. चारधाम यात्रेमधले दुसरे ठिकाण ते हेच. गंगोत्रीला पोचण्यासाठी तुम्हाला हरिद्वार, ऋषिकेश आणि देहरादूनपासून बस सहज मिळते किंवा टॅक्सीपण उपलब्ध आहेत. मी देहरादूनपासून शेअर टॅक्सी बुक केली होती. सकाळी सातला प्रवास सुरू केला. भटवाडी या जागी जेवलो आणि साधारण चारपर्यंत गंगोत्रीला पोचलो. तिकडे एक गेस्ट हाऊस आधीच बुक केले होते. तिथे पटकन फ्रेश झालो, थोडा वेळ झोपलो आणि संध्याकाळी गंगा मातेच्या मंदिरात गेलो. मंदिरात संध्याकाळची आरती खूप सुंदर आणि आल्हाददायक असते. मंदिराच्या बाजूला भागीरथी नदी सदैव झुळझुळ वाहत असते. आरतीनंतर मी परत झोपायला गेलो. सकाळी सहाला उठून आवरले, खांद्यावर ट्रेकिंग सॅक आणि कॅमेरा घेऊन निघालो. तुम्ही कुठल्या संस्थेबरोबर येत नसाल आणि तुम्हाला गाइड हवा असेल, तर तो गंगोत्रीला मिळू शकतो. फक्त थोडी इकडे तिकडे चौकशी करावी लागेल, इतकेच. गंगोत्री ते गोमुख हा १८ किमीचा ट्रेक आहे आणि गोमुख ते तपोवन साधारण चार किमी. हा ट्रेक मी सहा दिवसांत आणि तीन ठिकाणी कॅम्पिंग करून पूर्ण केला.

तसे बघायला गेले तर या ट्रेकवर झाडे, फुले, प्राणी तसे कमीच दिसतात. पण, तुम्हाला चीडची झाडे मात्र दिसतात आणि बाकी रंगीबेरंगी फुलेही अधेमधे आढळतात. प्राण्यांमध्ये ‘हिमालयन ब्ल्यू शीप’ किंवा ‘भरल’ या जातीची बकरी दिसेल. दुर्दैवाने मी गेलो तेव्हा मला दिसली नाही, पण तिकडच्या पाट्यांवरून आणि वाटाड्यांकडून या भरल बकऱ्यांबाबत माहिती मिळाली. या व्यतिरिक्त पक्ष्यांमध्ये ‘Alpine Chough’ या नावाचा पक्षी दिसेल किंवा सोप्या भाषेत हिमालयातला कावळा. हा पक्षी पूर्ण काळा तर त्याची चोच पिवळी असते.

दुसऱ्या दिवशीचा आमचा पहिला टप्पा होता ‘चिडवासा’. ११,७६१  फुटांवर असलेले, गंगोत्रीहून साधारण नऊ किमी अंतर असलेले. चालायला सुरुवात केल्यानंतर साधारण दोन किमीनंतर फॉरेस्ट चेक पोस्ट येते. इथे तुमची माहिती घेतली जाते आणि परवाना पाहिला जातो. तुम्ही संस्थेकडून जाणार असाल, तर ही जबाबदारी संस्था घेतातच; नाहीतर euttranchal.com या संकेतस्थळावरून ऑनलाइन परवाना काढता येतो. परवान्याशिवाय ते पुढे जाऊ देत नाहीत. चेक पोस्ट ओलांडून मी पुढे चालू लागलो. काही वेळातच सुदर्शन पर्वत दिसू लागला. २१,३४५ फूट उंचीचा हा पर्वत उन्हाच्या किरणांमुळे खूप सुंदर दिसत होते. माझ्या उजव्या बाजूला खाली भागीरथी नदी मस्त जोरात वाहत होती, डाव्या बाजूला डोंगर होते आणि समोर गंगोत्रीची दरी. मधे रस्त्यात छोटे झरे असायचे, त्यातले पाणी बाटलीत भरायचो आणि प्यायचो. तुम्हाला सांगतो, त्या झऱ्यातले पाणी अत्यंत स्वच्छ असायचे. दोनच्या दरम्यान चिडवासा या पहिल्या कँपसाइटवर पोचलो. चिडवासा म्हणजे चीड या प्रकारची झाडे किंवा इंग्रजीत ‘Pine tree’ म्हणतात आणि त्या झाडांचा इकडे वास आहे किंवा इकडे ती उगवतात म्हणून चिडवासा असे नाव. इकडे पोचल्यावर आम्ही तंबू उभारले, मस्त गरम चहा प्यायलो आणि नदीच्या काठाशी जाऊन शांतपणे बसलो. डोळे मिटून पर्यावरणाचा मनमुराद आनंद घेतला. साडेसातला जेवलो आणि नऊला झोपी गेलो.

दिवस तिसरा; सकाळी सहाला उठलो, तासाभरात आवरले आणि १२,४५० फुटांवर असलेल्या भोजवासासाठी निघालो. भोजवासा हे चिडवासा पासून पाच किमीच्या अंतरावर आहे. ही वाट तशी सोपी आहे, पण या भागात भूस्खलन होत असल्यामुळे जरा सांभाळून पाय टाकावे लागतात आणि सतत वर बघावे लागते, की कुठला दगड तर पडत नाहीये ना! थोड्या वेळाने भागीरथीचे पर्वत दिसू लागले. बर्फाने झाकलेले तीन मोठे भागीरथी पर्वत सकाळच्या उन्हात खुलून दिसत होते. या वाटेवर पाण्याचे झरे कमी आहेत. त्यामुळे चिडवासालाच आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेणे. साधारण चार तासांनंतर भोजवासाला पोचलो. भोजवासा तशी राहण्याकरिता आणि विश्रांतीकरता महत्त्वाची जागा आहे. इथे GMVN ची गेस्ट हाऊसेस आहेत. छोटे आश्रम आणि पोलिसांची गेस्ट हाऊसेस आहेत. साधारण बारा-एकच्या सुमारास आम्ही तिथे पोचलो. आमचे तंबू ठोकले, त्यानंतर जेवलो आणि दुपारी थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी तिथेच एका छोट्या ग्राउंडवर आम्ही मित्र आणि तिथे राहणारे पोलीस व्हॉलिबॉल खेळलो.

चौथ्या दिवशी सकाळी साडेपाचलाच उठलो. सूर्य उगवायला सुरुवात झाली होती. त्याच्या किरणांमुळे भागीरथी पर्वतावर पिवळसर सोनेरी रंग आला होता. ते दृश्य इतके मनोवेधक होते, की आम्ही सगळे विसरून त्या पर्वताकडे बघत होतो. आज आम्ही ठरवले होते, की गोमुख ग्लेशियरला जाऊन परत यायचे. म्हणून त्याप्रमाणे आम्ही नाश्ता केला आणि पाण्याच्या बाटल्या भरून ग्लेशियरकडे रवाना झालो. वाट साधारण सोपी आहे. तीन किलोमीटरचा रस्ता हळूहळू चालत आम्ही दोन तासांत पार केला. हिमनदी काही अंतरावरच असतानाही आम्ही थांबलो, कारण पुढे रस्ता नव्हता. तिथेच आम्ही शांतपणे बसलो. बाजूला नदी खळखळून वाहत होती, त्याचा मनमुराद आनंद घेतला. आमच्याबरोबर एक काकू होत्या, त्यांनी आमच्याकडून प्राणायाम करून घेतले. त्या थंड हवेत, शांततेत, पाण्याच्या आवाजात प्राणायाम करताना मनाला इतके हलके वाटत होते, की असे वाटले इकडेच राहावे. तिथून परत येऊन जेवलो व थोडा आराम केला. संध्याकाळी आम्ही ठरवले, की आजही व्हॉलिबॉल खेळावा. तिकडे पोलीस तर होतेच, पण आज काही सैनिकही आले होते. त्यांच्याबरोबर खेळलो आणि गप्पाही मारल्या. सैनिकांनी त्यांचे पराक्रमी किस्से सांगितले, ते ऐकून आम्हाला त्यांचा अभिमान वाटला आणि आपण भारताचे नागरिक आहोत याचा गर्व वाटू लागला. 

आजचा पाचवा सर्वात महत्त्वाचा दिवस, कारण आज आम्ही तपोवनला जायला निघणार होतो. तपोवनला चढणे बरेच कठीण आहे, कारण त्याला रेखीव अशी वाट नाहीये. लहान-मोठ्या दगडांनी भरलेला रस्ता आहे. एक चुकीचे पाऊल आणि पूर्ण ट्रेकचा खेळखंडोबा! त्यातच पहिल्यांदा भोजवासावरून तुम्हाला नदी पार करावी लागते. आता तिथे अशी सोय उपलब्ध केली आहे, एका बास्केटमध्ये तुम्हाला बसवतात आणि दुसऱ्या बाजूने खेचतात. पण तिथे बरेच ट्रेक करणारे लोक येतात आणि त्यामुळे नदी पलीकडे जायला बरीच रांग असते. आम्ही ते वापरणार नव्हतो. मी ज्या संस्थेकडून गेलो होतो, त्यांनी वेगळीच सोय केली होती, ती म्हणजे ‘tyrolean traverse’. सोप्या शब्दांत सांगायचे, तर दोरीवर स्वतःला उलटे टांगून नदी क्रॉस करायची. यानंतरचा प्रवास बऱ्यापैकी कठीण होता. भोजवासा ते तपोवन तसा पाचच किमीचा रस्ता, पण तो चढायला आम्हाला जवळजवळ सहा तास लागले. सकाळी आठला निघालो आणि दुपारी दोनला पोचलो. तपोवन हे १४,२०२ फुटांवरचे एक कुरणक्षेत्र (medow) आहे.

तपोवनला पोचल्यावर नवीन दोन मोठे पर्वत दिसतात, त्यातील पहिला पर्वत म्हणजे शिवलिंग. साधारण २१,४६६ फुटांचा हा पर्वत त्याच्या पायथ्यापासून टोकापर्यंत दिसतो. सकाळी सूर्याची किरणे त्या पर्वतावर पडतात, तेव्हा ते दृश्य बघण्याची मजाच वेगळी असते. असा भला मोठा पर्वत बघून आपण या जगात किती लहान आहोत, याची जाणीव होते. दुसरा तुम्हाला दिसतो तो मेरू पर्वत. २१,८५० फुटांचा हा पर्वत चढायला खूप कठीण आहे असे म्हणतात; अगदी एव्हरेस्टपेक्षासुद्धा! त्या पर्वताचा एक भाग शार्क माशाच्या ‘फिन’सारखा दिसतो आणि तसे त्याला नावच दिलेले आहे. हा पर्वत २०११ मध्ये जिमी चीन, कॉनरॅड अँकर आणि रेनान ओझटूरकीन यांनी सर्वात पहिल्यांदा सर केला होता.

तपोवन हे बरेच मोठे कुरणक्षेत्र आहे. तुम्ही अनफिट असाल, तर तुम्हाला श्‍वसनाचा त्रास होऊ शकतो आणि तसे असेल तर परत माघारी फिरलेले बरे. तिथे एक अगदी छोटी नदी वाहते आणि तिचे नाव आकाशगंगा! आम्ही तपोवनला पोचलो. हे खूप मोठे मैदानच आहे असे वाटते. तिथे आमच्यासारखे बरेच ट्रेकर्स आले होते, त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या. तिथे आम्हाला एक फ्रेंच गिर्यारोहक भेटला. त्याने त्याचे नाव मायकल आहे असे सांगितले आणि तो मेरू पर्वत चढायला आला होता. त्याने जगातील बरेच असे पर्वत सर केले आहेत, असेही त्याने सांगितले. फिरून आणि गप्पा मारून झाल्यावर आम्ही परत आमच्या तंबूकडे आलो. जेवण तयारच होते, जेवून आम्ही आमचा दिवस संपवला.

दिवस सहावा; आम्ही तपोवनवरून उतरलो आणि हिमनदीच्या दिशेने गेलो, जिकडे नदीचा उगम होतो. मी आजवर असे दृश्य कधीही बघितले नव्हते. मोठाच्या मोठा बर्फाचा तुकडा आणि त्याच्या खालून भागीरथी नदी वाहते. मी एका बाटलीत प्यायला पाणी भरले आणि दुसऱ्या बाटलीत भरले, ते घरी न्यायला. पाणी प्यायलो ते खूप थंड होतेच, पण त्याचबरोबर गोडही लागत होते. गंगेचे पाणी प्यायलो म्हणून की काय मला माहीत नाही, पण एक वेगळीच तरतरी जाणवली. आम्ही सगळ्यांनी तिकडे बरेच फोटो काढले आणि परत भोजवासाकडे यायला निघालो. बराच वेळ चालून आणि परत नदी ओलांडून भोजवासाला पोचलो. तोवर खूपच दमलो होतो, म्हणून खिचडी खाऊन झोपलो. संध्याकाळी थोडा थकवा होता, त्यामुळे सगळे तंबूमध्येच पत्ते खेळलो आणि रात्री जेवून झोपलो.

शेवटचा दिवस, दिवस सातवा. भोजवासाहून सकाळी आठच्या सुमारास निघालो आणि अडीच वाजता गंगोत्रीच्या गेस्ट हाऊसवर पोचलो. गेले ५ दिवस अंघोळ नव्हती केली, म्हणून लोकांनी पहिल्यांदा ते काम आटोपले. दुपारच्या वामकुक्षीनंतर काही मित्रमंडळी गंगोत्री फिरले आणि काही मंदिरात संध्याकाळच्या आरतीसाठी गेले. मीसुद्धा फिरायला गेलो. परत आल्यावर बॅग आवरायला घेतली. 

बॅग आवरत असताना मागच्या काही दिवसांचा विचार करायला लागलो. अचानक केलेला प्लॅन, आयुष्यातली पहिली एकाकी ट्रिप, प्रवासात भेटलेले नवीन लोक, त्यांचे किस्से आणि एक मनमोहक ट्रेक, बरेच काही शिकवून गेला. या ट्रेकमुळे माझ्या आयुष्यात बरेच बदलही घडले आणि ते चांगलेच बदल आहेत, असे मी छातीठोकपणे म्हणेन. स्वतःशीच बोलताना मी हसलो, बॅग भरून बाजूला ठेवली आणि झोपलो... पुढच्या दिवशी घराकडे रवाना झालो!

फोटो फीचर

संबंधित बातम्या