राजगडावरून तोरण्याकडे...

वैभव कुलकर्णी
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

ट्रेककथा

एक ट्रेक करायची इच्छा बऱ्याच वर्षांपासून मनात रेंगाळत होती, पण काही केल्या योग येत नव्हता, तो म्हणजे राजगड ते तोरणा ट्रेक. स्वराज्याच्या जुन्या राजधानीपासून स्वराज्याचे तोरण जिथे बांधले  गेले तिथे. म्हणजे सर्वोच्च शिखरापासून पुन्हा पायथ्यापर्यंत. ते म्हणतात  ना, अगदी Back to Basics, तसे!

सुशीलची आणि माझी ओळख चंद्रगडच्या ट्रेकला झाली. मी आणि सुशीलने  चावंड, शिवनेरी आणि कुकडेश्वर असा ट्रेक प्लॅन केला होता. नियोजन सगळे त्याचेच. सर्व गोष्टी जुळून येत असतील तर काही तरी मोठे प्लॅन केले पाहिजेत, असे मनात असतानाच राजगड ते तोरणाची मोहीम ठरली. व्हॉट्सॲपवर ग्रुप तयार झाला. विजय गव्हाणे, अवधूत  अत्रे, शिवेंद्र, निलेंद्र, हर्षद, तृणाल  देशमुख, राजन  असे सगळे पट्टीचे ट्रेकर्स जमले. विनय देशमुखकडून काही टिप्स मिळाल्या. सुशीलकडून वेळापत्रक आणि प्रोजेक्ट प्लॅन तयार झाला. उन्हाळा वाढत असल्यामुळे फार उशीर करून जमणार नव्हते. ९ मार्च २०१९ हा दिवस ठरला. 

दोन अजस्र किल्ले चढून  अंदाजे मधली २० किमीची  घाटवाट पार करून जावे लागणार होते. नसरापूर वेल्हे रस्त्यावर सहा किमी अंतरावर दिसणाऱ्या या दोन्ही किल्ल्यांचे मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. सगळ्यांनी एका मार्गाने जाऊन जमणार नव्हते, कारण ट्रेक संपल्यावर तिथून पुढे घरी येण्यासाठी बसच्या भरवशावर विसंबून राहता येणार नव्हते. कदाचित उशीर झाला असता, तर पंचाईत झाली असती. आम्ही दोन ग्रुप करायचे ठरवले. एक ग्रुप राजगड ते तोरणा करणार होता आणि दुसरा ग्रुप तोरणा ते राजगड करणार होता. प्रत्येक ग्रुप आपापली गाडी गडाच्या पायथ्यापाशी लावणार होता आणि दुसरा ग्रुप ट्रेक संपवून ती गाडी घेऊन घरी येणार होता. ऑफलाइन  गुगल मॅप डाऊनलोड करून घेतले होते. सगळी जय्यत तयारी झाली होती.

शुक्रवारी ट्रॅफिकमुळे ऑफिसमधून घरी पोचायला उशीर झाला. पटापट  बॅग भरायला घेतली आणि लवकर जेवून झोपलो. जाग येईल का नाही या भीतीने झोप आलीच नाही. शेवटी चार वाजता उठलो आणि आवरायला घेतले. पाच वाजता आम्ही सगळे धायरी फाट्याला भेटणार होतो. गाडीच्या जास्तीच्या चाव्या एकमेकांना देणार होतो. जर ट्रेकच्या वाटेवर दोन्ही ग्रुप्सची चुकामुक झालीच, तर बॅकअप किल्ल्या दोन्ही ग्रुपकडे असाव्यात. मोबाइलला रेंज मिळेलच याची खात्री नव्हती, तेव्हा दोन्ही ग्रुप्सचे  कोऑरडिनेशन हे एक मोठे  आव्हानच होते. सकाळी पाषाणवरून यायला अवधूतला थोडा उशीर झाला. शेवटी सुशील एक ग्रुप घेऊन पुढे मार्गस्थ झाला. अवधूत येताच आम्हीसुद्धा निघालो. अर्धा तास उशीर झाला होता. 

या आधी गुंजवणेमार्गे राजगड बऱ्याच वेळा केला होता, पण पाली दरवाजाचा मार्ग माहित  नव्हता. मार्गासनी चिरमोडी गावातून गुंजवणे फाट्याला न वळता आम्ही सरळ पुढे गेलो. तांबडे फुटले होते. सूर्याच्या किरणांनी अंधार भेदून सगळीकडे लख्ख प्रकाश पसरवला होता. गुंजवणी नदीवरच्या  पुलावरून जाताना संथ वाहणाऱ्या पाण्यावर सकाळची किरणे चमकत होती. नानाप्रकारचे पक्षी कूजन करत होते. सकाळची शांतता आणि दूरवर मंदिरात चालणाऱ्या भजन कीर्तनाचे सूर मनाला स्थैर्य देत होते. सकाळपासून चाललेली धावपळ आम्ही क्षणार्धात विसरलो आणि निसर्गाशी समरस झालो. रात्रभर भजन कीर्तन करून  वाजेघरला मॉर्निंग वॉक करत घरी  निघालेले एक आजोबा भेटले. त्यांना आम्ही लिफ्ट दिली आणि त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला. टाळ मृदुंगाचा  आवाज त्या पंचक्रोशीतील वातावरण मंगलमय करत होता. खाटपे वाडीमध्ये एका शाळेच्या आवारात असलेला आऊसाहेबांचा आणि शिवरायांचा पुतळा जणू आम्हाला आशीर्वादच देत होता. त्यांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. पाली गावात पोचल्यावर गाडी लावली आणि सुमारे साडेसातला आम्ही ट्रेक सुरू केला. पुढची वाट कठीण असल्यामुळे राजगड चढण्यासाठी सोपा मार्ग निवडला होता. सुमारे एक तास १५ मिनिटांत आम्ही वर पोचलो. दरवेळी पद्मावती माची, बालेकिल्ला, सुवेळा माची, हत्तीचे नेढे पहिले होते, पण ही बाजू माझ्यासाठी नवीन होती. गडावर बरेच पुनर्बांधणीचे काम झालेले दिसले. जुने बुरूज, तटबंदी, पाली दरवाजा अजूनही सुस्थितीत आहेत. थोडे फोटो सेशन केल्यावर आम्ही वेळ न दवडता संजीवनी माचीकडे कूच केली. वाटेत कातळावर लागलेली मधमाश्‍यांची पोळी दिसली. जणू आजही ती स्वराज्याच्या रक्षणासाठी तत्पर असावीत. तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही निमूटपणे पुढे सरकलो आणि संजीवनी माचीवर पोचलो. तिथे  उंचीवर असलेल्या एकमेव झाडाखाली आम्ही  

नाश्त्यासाठी थांबलो. जवळ असलेली चिक्की, राजगिरा वडी, बिस्कीट असे किरकोळ खाऊन आम्ही लगेच चालायला सुरुवात केली. सळसळणाऱ्या नागिणीप्रमाणे भासणारी संजीवनी माची ही खरोखरच मराठ्यांच्या स्थापत्यकलेचा एक अद्‍भुत आविष्कार. बुरुजांना अनुक्रमे नंबर दिले आहेत. माचीवरून प्रत्येक बुरुजावर  खाली उतरण्यासाठी अरुंद किंवा खुफिया वाटावे असे जिने काढले आहेत. आणीबाणीच्या वेळी गडावर पाणी कमी पडू नये म्हणून माचीच्या मधोमध टाकी (Water cisterns) बांधलेली आहेत. माचीच्या मुख्य तटबंदीला लागून आत अजून एक तटबंदी बांधलेली आहे आणि या दोन्ही संरक्षक भिंतींमध्ये जवळपास १० ते १५ फूट खोल जागा सोडली आहे. याचा नेमका उद्देश काय असावा हा इतिहासकारांच्या अभ्यासाचा भाग. व्याघ्रमुख नावाच्या बुरुजावरून आम्ही आपापले डीपीसाठी लागणारे छायाचित्र टिपले आणि तोरण्याची वाट धरली. 

आमच्या आधी ट्रेक सुरू करणाऱ्या दुसऱ्या ग्रुपची काहीच  खबरबात नव्हती. आम्ही संजीवनी माची उतरून खाली आलो तेवढ्यात देव जाणे कशी, पण मोबाइलला रेंज आली आणि मला सुशीलचा फोन आला. झुंजार माची, मेंगाई देवी मंदिर, रडतोंडी बुरूज, कोकण दरवाजा हे सर्व करून त्यांनी तोरणा उतरायला सुरुवात केली होती. त्यांची तोरण्याची बुधला माची उतरून झाली होती. जवळपास दोन्ही ग्रुप्सचा वेग सारखाच होता. 

वाजले होते १०.२६ आणि आता मात्र ऊन जाणवू लागले होते. अजून सूर्य माथ्यावर यायच्या आत आम्हाला जास्तीत जास्त अंतर कापायचे होते. थोडीशी पोटात भर गेल्यामुळे आणि सुरुवातीला बऱ्यापैकी झाडी असल्यामुळे आम्ही वेग कायम ठेवू शकलो. थोडेसे सपाट अंतर चालल्यावर चढाई करताना जिवावर येत होते, पण थोडे उंचावर गेले की गार वाऱ्याची झुळूक येई आणि सारा थकवा निघून जाई. ऊन वाऱ्याच्या या खेळामध्ये मजा येत होती. घार, गरुड असे  उंचीवर उडणारे पक्षी जणू वरूनच आमची टेहळणी करत होते, कारण आम्ही त्यांच्या इलाख्यामध्ये प्रवेश करत होतो. पण आजूबाजूला उडणारे नानाविध प्रकारचे बुलबुल, खंड्या, वेडा राघू व त्यांच्यासारखे अनेक छोटे पक्षी  त्यांच्या आवाजाने आमचे आदरातिथ्य करत होते. काळ्या जांभळ्या रंगाचे पंख घेऊन गुणगुण करणाऱ्या भुंग्यांना मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ते आपले  त्यांच्या सकाळच्या कामात व्यग्र होते. मजल दरमजल करत आम्ही भुतोंडे खिंडीत उतरलो, जिथे आम्हाला डांबरी रस्ता लागला व आम्ही वेल्ह्याच्या वेशीपाशी पोचलो. काही स्थानिक लोकांकडून रस्ता बरोबर असल्याची खात्री करून आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला. क्षणभर विश्रांती ही पुढील  मैलभर अंतर कापण्यासाठी लागणारी ऊर्जा आम्हाला देत होती. वाटेत एक मंदिरासारखे दिसणारे घर लागले. पण तिथे कोणीच नव्हते, त्यामुळे थंडगार पाणी मिळायच्या आमच्या आशा धुळीस मिळाल्या. पण सुदैवाने झाडी भरपूर घनदाट होती. त्या शीतल छायेत आम्ही बरेच अंतर कापले. वाटेत काही म्हसोबासारखे शेंदूर लावलेले दगड दिसले. कडेला साडीसारखे कापड असल्यामुळे देवी होती का म्हसोबा हे सांगणे जरा अवघडच आहे. पण विश्रांतीसाठी आम्ही मात्र ती जागा निवडली होती. तिथून थोडेच पुढे गेल्यावर एक गावकरी कुटुंब भेटले, त्यांनी आम्हाला तोरण्याकडे जायचा मार्ग सांगितला. वाटेत पाण्याचे एक टाके होते, पण त्यातील पाणी पूर्णपणे आटले होते. 

इतक्यात आम्हाला सुशील आणि इतरांचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाज दिल्यावर आणि आवाजांचा कानोसा घेत गेल्यावर शेवटी आम्हा दोन्ही ग्रुप्सची गाठभेट झाली. गाडीच्या चाव्या एकमेकांना देऊन आणि एकदोन छायाचित्रे काढून आम्ही आपापल्या पुढच्या गडांकडे मार्गस्थ झालो. दुपारचे रणरणते ऊन आता भाजून काढत होते. सकाळसारखा वेग कायम ठेवणे आता जड जात होते. एक दीड तासावर बुधला माची दिसत होती. तोरणा आता आवाक्यात आला होता, पण सकाळपासून चालून चालून पाय थकले होते. वाटेत लागणारी झाडी संपली होती. बोडके डोंगर आणि वाळलेली गवते या व्यतिरिक्त दूरदूरपर्यंत काहीच दिसत नव्हते. सकाळसारख्या अधूनमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळुकासुद्धा आता येत नव्हत्या. कोणीतरी अग्नीने मंतरलेले बाण आम्हाला मारतेय असे वाटत होते. उन्हाच्या झळांमुळे भोवळ आल्यासारखे होत होते, पण सावलीसाठी एकही झाड तिथे नव्हते. आजचा सकाळचा नाश्तापण यथातथाच होता आणि आता मात्र भुकेने पोटात कावळे ओरडायला लागले होते. पोटात काहीही नसल्यामुळे ॲसिडिटी झाली होती. 

विजय आणि अवधूत उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी पटापट पुढे निसटले आणि मागे राहिलेल्या मला एकट्याला ते थोडे राहिलेले अंतर कापणे एक मोठे दिव्य दिसू लागले. हत्ती गेला होता पण शेपटासाठी माझे घोडे पेंड खात होते. सुदैवाने माझ्याकडे पुरेसे पाणी होते, पण सतत पाणी पिऊनसुद्धा काही उपयोग होत नव्हता कारण पोटात अन्न  नव्हते. उष्माघातामुळे मला सतत उलटी झाल्यासारखे होत  होते. पायात क्रँप्स येत होते. संपूर्ण रस्त्यात कुठेच पाण्याची सोय नसल्यामुळे लोकांना पाणी कमी पडते. पण मी मात्र सढळ मुखाने पित्तयुक्त पाण्याच्या उलट्या करत चाललो होतो. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून परत पाणी प्यायचो. परत पाणी ओकायचो. थोड्यावेळाने बघतो तर विजय आणि अवधूत माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसेनात. मग मात्र मला सगळे अवघड दिसू लागले. एक क्षण थांबलो. गेल्या दोन वर्षांत केलेले सगळे अवघड ट्रेक आठवले आणि एक निश्चय मनाशी घट्ट केला, की काहीही झाले तरी अर्ध्यात सोडता येणार नाही. आपल्याला हळूहळू का होईना पण चालत राहिले पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्याला केलेला नमस्कार आशीर्वाद रूपी धावून आला की काय देव जाणे, पण कसेतरी करून मी अवसान गोळा केले आणि बुधला माचीच्या बुरुजापर्यंत पोचलो. वरून एका माणसाने मला आवाज दिला आणि बुरुजाच्या इथे सावलीला यायला सांगितले. पण उन्हाने तापलेला  कातळ चढून  जाणे फार फार जिकिरीचे होत होते. कसातरी जीव एकवटला आणि  सरतेशेवटी मी वर पोचलो. तिथे विजय आणि अवधूत बसले होते, त्यांना पाहून मला जरा हायसे वाटले. लिंबू सरबत पिऊन थोडी विश्रांती घेतल्यावर मला जरा तरतरी आली. 

पण पुन्हा तेच झाले. बुधला माचीवरून रडतोंडी बुरुजाकडे जाताना पुन्हा मी मागे पडलो आणि थोडीशी वाट भटकलो. एका कातळावर विनाकारण चढलो आणि एका माकडाच्या टोळीने माझे गुरकावून स्वागत केले. खाली पहिले तर रेलींग लावलेली पायवाट होती, पण माकडांच्या घेरावामुळे मला खाली उतरणे कठीण झाले होते. थोडे धारिष्ट्य  करून मी एक दगड हातात घेतला आणि तो भिरकवण्याची  ॲक्शन करून त्यातल्या मोठ्या माकडाला घाबरवले. तसा तो सगळा त्याचा कुटुंबकबिला घेऊन पुढे सरकला... आणि त्यानंतर लोक गुरे हाकतात तसे मी माकडे हाकत हाकत बरेच अंतर कापले. कसातरी मी रडतोंडी बुरुजावर पोचलो आणि पायरीवर स्वतःला झोकून देऊन लोटांगण घातले. रडकुंडीला आलेल्या मी त्या बुरुजाचे नाव सार्थ केले होते.बुरुजाच्या उंचीमुळे तिथे सावली होती आणि थंड वारादेखील येत होता. थोडा आराम  झाल्यावर मेंगाई देवीच्या मंदिरापाशी असलेल्या आजींकडून आम्ही ताक, सरबत प्यायलो. ॲसिडिटी झालेल्या  पोटाला थोडी काकडी खाऊ घातली. घामामुळे चेहऱ्यावर जमलेल्या मिठाचा थर  गार पाण्याने तोंड धुतल्यावर निघून गेला आणि आम्ही ताजेतवाने झालो. वाजले होते दुपारचे ३.२०. माझा आत्मविश्वास  वाढलेला पाहून आम्ही गडउतार  झाल्यावरच  जेवायचे ठरवले. दोन रॉक पॅच आणि सगळा  उतार मी झपाझप उतरलो. काँक्रिटचा रस्ता लागल्यावर मला जो  आनंद झाला, तो शब्दांत वर्णन करता येणार नाही. 

खडतर प्रवास करून, संकटांवर मात करून नंतर मिळणारे यश क्षणभर  जरी असले, तरी त्यातून मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो. सुशीलची गाडी घेऊन आम्ही निघालो. खाली गावात गेल्यावर आम्ही मनसोक्त जेवलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सुशीलचा मेसेज आला होता. शिवेंद्रचा बूट फाटल्यामुळे थोडा उशीर होत आहे. तरीसुद्धा अर्ध्या तासाच्या अंतराने शिवापूरच्या टोलनाक्यावर आम्ही सगळे भेटलो, एकमेकांची विचारपूस केली आणि  पुन्हा गाड्यांची अदलाबदली करून ट्रेकची सांगता केली.    

संबंधित बातम्या