के दिल अभी भरा नहीं...

ओंकार ओक
सोमवार, 3 मे 2021

ट्रेककथा

गच्च बहरलेल्या काजूच्या बागांमधून जाणारी रखरखीत पायवाट काही केल्या  संपायला तयारच नव्हती. एखाद दुसरा पिकलेला काजूगर काढून आमच्या हातात ठेवत सखाराममामा तेवढ्यापुरतं का होईना, पण आम्हाला प्रोत्साहित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. कारण त्यानंतर आमच्यासमोर काय वाढून ठेवलंय हे फक्त त्यांना माहीत होतं. खडपडे गावाला बांद्यावरून येणारा डांबरी रस्ता सामोरा आला तेव्हा ‘इथून माझी सासुरवाडी अजून अडीच किलोमीटरवर आहे’ हा बॉम्ब टाकून भर दुपारी दीडच्या टळटळीत उन्हात आमची असलेली नसलेली हवा अजूनच  टाईट करण्याचं काम मामांनी केलं आणि स्वतः  निर्विकारपणे सासरच्या ओढीनं रस्ता तुडवू लागले.....

सह्याद्रीतला सर्वात दक्षिणेकडचा गिरिदुर्ग म्हणून किल्ले पारगडाला सह्याद्रीप्रेमींमध्ये आदराचं स्थान आहे. पारगड आहेच तितका देखणा आणि सर्वगुणसंपन्न! कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही बेशिस्त पर्यटकांची  गर्दी आणि अंगावर येणारा गजबजाट इथं  नावालाही नाही. किल्ल्याचं लोकेशन आणि आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर आहे की  गडावरून पाय हलत नाहीत. पण त्यादिवशी गडावरच्या देविदास गडकरींच्या घरगुती हॉटेलमध्ये बसल्या बसल्या आमचा मात्र नाईलाज झाला होता; कारण आजचं लक्ष्य होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातला किल्ले हनुमंतगड.... आडवाटेच्या वाटेला जाणारी एक सर्वांगसुंदर डोंगरयात्रा! 

पारगडच्या मारुती मंदिरापासून समोरच्या डोंगरावरच्या भेकुर्ली गावातली घरं अगदी स्पष्ट दिसत होती. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोटेखानी वस्तीपासून एक ठसठशीत मळलेली पाऊलवाट भेकुर्लीकडे उतरली आहे. भेकुर्ली ना देशावर आहे ना अगदी कोकणात. पारगड आणि हनुमंतगड यांच्या मधोमध असणाऱ्या एका डोंगरावर भेकुर्ली गाव वसलं आहे. आम्ही सोबत घेतलेल्या पारगडाच्या सत्तरीच्या राजाराम कांबळेमामांचा उत्साह मात्र दांडगाच होता. पारगडाच्या वस्तीपासून गच्च झाडीतून एक वाट सरळ खाली उतरत होती. ‘ही दरी उतरून समोरचं टेपाड चढलं की  आलंच भेकुर्ली,’ या मामांच्या वाक्यानं हा प्रवास आमचे तीन तास खाणार याची खात्रीच पटली! पायाखाली चुरचुरत असलेल्या दाट पानगळीतून  वाट उताराला लागली आणि एक ओढा पार करून सुरू झाली ती भेकुर्लीच्या डोंगराची चढाई. कांबळेमामांनी  कित्येक वर्षात या  भागात पाऊल ठेवलं नसल्यानं सुरुवातीला झालेली चुकामुक नंतर अनुभवाच्या पोतड्यामुळे आपोआप समेवर आली. पूर्वेकडे पारगड  दिसत होता. दक्षिणेकडच्या धूसर भागात कुठे तरी  अंगुलीनिर्देश करून  मामांनी तिलारी घाटाची जागा दाखवली आणि  पुढच्या  पंधराव्या मिनिटाला आम्ही  भेकुर्ली गाठलं. 

भेकुर्लीतल्या  स्वच्छ सारवलेल्या आणि छोटेखानी बागेमुळे शोभा आलेल्या  अंगणात विसावलो त्यावेळी गावच्या मंदिरात काही कामासाठी गेलेले सखाराम देसाईमामा प्रसन्न मुद्रेनं समोर आले. चाळिशीच्या आसपास वय, अत्यंत काटक अंगकाठी आणि मुख्य म्हणजे कमालीचा प्रसन्न चेहेरा आणि अत्यंत सकारात्मक देहबोली यामुळे पहिल्या दहा मिनिटांतच सखाराममामांनी आमच्या मनात कायमचं घर केलं होतं. भेकुर्ली गाव तिलारीतून अनेकदा वाट चुकून गावांमध्ये घुसणाऱ्या हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी सकाळी नेहमी प्रमाणे  शेतावर गेलेल्या सखाराममामांना अशाच एका पूर्ण वाढ झालेल्या हत्तिणीनं असा काय इंगा दाखवला होता, की  मामा आणि त्यांच्या बरोबर असलेल्या गावकऱ्याची पळताभुई थोडी झाली होती.  ‘काय सांगायचं सर तुम्हाला. आम्ही जीव खाऊन पळत होतो आणि ती आमच्या मागून नॉर्मल स्पीडनं आपली चालत होती तरी आमच्यामधलं अंतर काही कमी व्हायला तयार नव्हतं. वाट निमुळती त्यामुळे इकडं-तिकडं पळता येईना. अखेरीस तिनंच आमचा नाद सोडला नाहीतर आज आपण भेटलो नसतो!’  कॉलेजमधला व्हॅलेंटाईन डेचा  एखादा किस्सा सांगावा तितक्या सहजपणे  चेहऱ्यावर कमालीचं गोड हास्य ठेवून मामा हे सगळं सांगत होते. 

भेकुर्लीतुन फुकेरीला जाताना वाटेत भेकुर्लीचा ‘दुर्ग’ नावाचा डोंगर आडवा येतो. सखाराममामांच्या म्हणण्यानुसार पारगड ते हनुमंतगड यामधील चौकीची ही जागा असावी. भेकुर्लीपासून खडपडे या गावात एक कच्ची पायवाट गेली आहे. साधारणपणे दोन तासात आपण शेवटच्या टप्प्यातील गर्द जंगल पार करून कुकुडजा  नदीवरच्या एका लोखंडी पुलावर येतो आणि इथंच सुरू होते ती खडपड्यापर्यंतची अत्यंत रटाळ वाटचाल! दुपारचा एक-दीड वाजायला आलेला. काजूच्या बागांमधून एकसंध जाणारी पायवाट वीट आणत होती आणि यावर कडी केली ती त्या अडीच किलोमीटरच्या डांबरी रस्त्यानं. वळणावळणाचा सलग चढत जाणारा रसरशीत तापलेला रस्ता अंत बघत होता. खडपडे गावाचं नामोनिशाणही दिसायला तयार नव्हतं. कधी एकदा हा वनवास संपतोय असं वाटत असताना गावाच्या अलीकडे एका वळणावर एक बंगला समोर आला आणि ‘हीच माझी सासुरवाडी’ हे अत्यंत उत्साहानं सांगत मामांनी त्या घरात प्रवेश करत आमचीही त्या रटाळ चालीपासून सुटका केली!   

‘ए उठा रे... अडीच वाजलेत. इथून बरंच अंतर कापायचंय अजून. झोपले आपले तंगड्या वर करून!’ दुपारच्या निवांत जेवणानंतर  फुल्ल पंख्याच्या खाली अंगावर येत असलेल्या  दुपारच्या साखरझोपेची अशा पद्धतीनं सांगता झाल्यानंतरची मनस्वी चिडचिड काय असते हे पुणेकरांशिवाय जगातल्या कोणालाही कळू शकत नाही!  ‘जायलाच हवं का? जाऊदे ना निघू ना तासाभरानं,’ हे असुरी विचार मनात आपल्या नियोजनाविरुद्धचं कारस्थान रचत असताना त्यांच्यावर मात करणं यासारखी मोठी लढाई नाही! डोळे उघडून समोर पाहिलं तेव्हा कमरेला कोयता अडकवलेली  आणि रापलेल्या चेहेऱ्यावर डोळ्यांमधली जरब घेऊन आमच्याकडे एकटक बघत असलेली सत्तरीची एक आकृती उभी होती! 

‘हे माझे सासरे. ज्ञानेश्वर शेटे.’ सखाराममामांनी ओळख करून दिली. 

‘फुकेरी (हनुमंतगड पायथ्याचं गाव) किती वेळ लागेल?’ आमच्यातल्या कोणीतरी ज्ञानेश्वरमामांना विचारलं. 

‘आता असे झोपून राहिलात तर उद्या पण पोचायचो नाय. मला गावात लग्न आहे सात वाजता त्याच्या आत परत यायचंय. निघायचं बघा लवकर!’ मामांनी आपल्या करड्या आवाजात आमची काढलेली विकेट आमची रात्रीचीही झोप उडवून गेली. झोपलेल्या पुणेकरांकडे नुसतं बघूनसुद्धा एखाद्या माणसाला  पुणेरीपणाची लागण होऊ  होऊ शकते  याचं हा संवाद म्हणजे सर्वोत्कृष्ट उदाहरण होतं.   दहाव्या मिनिटाला बॅगा आवरून आणि बूट चढवून आठजणांची टोळी खडपड्याची शेतं तुडवत चालू लागली. खडपडे ते फुकेरी ही  साधारणपणे तीन तासांची चाल. गावातून निघाल्यापासून पंधराव्या मिनिटाला आपण गर्द जंगलात शिरतो. ‘वाटेत पाणी कुठं मिळेल?’ या माझ्या ऑब्व्हियस प्रश्नाला ज्ञानेश्वरमामांनी ‘पहिल्या ओढ्यात. नंतर थेट फुकेरी’ अशी पुस्ती जोडली. पण पहिल्या ओढ्यापाशी पोचल्यावर ज्ञानेश्वरमामांच्या चेहेऱ्यावर भीतीयुक्त आश्चर्याची एक लाट उमटली. ओढ्याचं इतर वेळी नितळ असणारं पाणी आज पूर्ण गढूळ झालेलं होतं. 

‘वर गवे आले आहेत आणि ते डुंबलेत यात. लवकर निघूया नाहीतर आपली काही खैर नाही.’  मामांनी ओढ्याच्या उगमाच्या दिशेनं एक भीतीयुक्त कटाक्ष टाकत आम्हाला ऐकवलं आणि आमचा स्पीड दुप्पट झाला हे वेगळं  सांगायलाच नको. खडपाड्यातून साधारण पश्चिमेला एक उंच त्रिकोणी शिखर दिसतं. त्याच्या पलीकडं हनुमंतगड अाहे. ही पायपीट  साधारण अडीच ते तीन तासांची  आहे. खडपड्यातून  डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाणारी मध्यम चढाची वाट नितांत सुरेख रानव्याचा अनुभव देऊन जात होती. पायाखाली चुरचुरणारी वाळलेली पानं, वाऱ्याच्या एखाद्या झुळुकीमुळे डोलणारी झाडं आणि मधूनच शीळ  घालणारा  एखाद दुसरा तांबट पक्षी  यापलीकडे आवाज होता तो नितांत निरव शांततेचा! फुकेरीतून या त्रिकोणी डोंगरावरून सरळ वरती घाटमाथ्याकडे म्हणजेच आंबोलीजवळच्या चौकुळ गावात जाणारी ही  वाट म्हणजे ‘घोडजीनाची वाट’. या व्यतिरिक्त आंबोली नजीकच्या इसापूर - चौकुळ गावात फुकेरी आणि घारपी गावातून अनुक्रमे निसणी व फोण्याची पाज अशा दोन वाटा चढतात, अशी मोलाची माहिती ज्ञानेश्वरमामांनी दिली. त्रिकोणी डोंगराच्या पायथ्याला पोचल्यावर एक सपाटी लागली आणि पलीकडे फुकेरीचं सुरेख झाडीभरलं खोरं नजरेत भरलं. अगदी दोन आठवड्यापूर्वीच मी हनुमंतगडाला येऊन गेलेलो असल्यानं ते दृश्य अगदीच काल परवा पाहिल्यासारखं वाटलं.  

‘फुकेरी यायला अजून किती वेळ लागेल मामा?’ या प्रशनाचं उत्तर देताना ज्ञानेश्वरमामांच्या चेहेऱ्यावर अनिश्चितीततेचं सावट उमटलेलं स्पष्ट दिसत होतं. 

‘इथपर्यंत मी नेहमी येत असतो पण फुकेरीला खूप वर्षांत जाणं झालं नाहीये. दिशा माहितीये पण बघूया वाट मिळतीये का.’ मामांनी बॉम्ब फोडला! चार वाजत आले होते. कोणत्याही परिस्थितीत अंधाराच्या आत फुकेरी गाठायलाच हवं होतं. मामांनी देवाचं नाव घेऊन एक वाट धरली आणि इथंच होलसेल भावात  आमची वाट लागायला सुरुवात झाली. मामा गच्च काट्याकुट्यातून कोयता मारत मारत पुढे सरकत होते. पायाखाली अनिश्चित घसारा, डोक्यावर, मानेपाशी, गळ्यापाशी, पोटापाशी फक्त आणि फक्त झाडी! ठळक पायवाटेचं नामोनिशाणही दिसत नव्हतं. सूर्य पश्चिमेकडे पळायला सुरुवात झाली होती. फुकेरीचं खोरं कधी दिसत होतं, तर कधी लुप्त होत होतं. वाट खाली खाली तर सरकत होती पण आता आमची अवस्था बिकट व्हायला सुरुवात झली. वारा नावालाही नव्हता, पाणी जपून वापरावं लागत होतं. समोरचा झाडोरा वाढत चालला होता. चिडचिड वाढू लागली आणि अचानक एका वळणावर मी थबकलो... झाडीतून आपला अवाढव्य आणि बलदंड देह धारण केलेला हनुमंतगड मावळतीच्या कोवळ्या किरणात स्वतःला निरखत उभा होता! त्याचं ते अद्वितीय रूप जे काही आंतरिक समाधान देऊन गेलं, त्याची तुलना कशाशीच होणे कठीण! फुकेरी गाव हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव झाली. शेवटचं एक वळण पार केलं आणि डावीकडून आम्ही उतरलेल्या डोंगरावरूनच  आलेली भलीमोठी आणि  व्यवस्थित मळलेली पायवाट आम्हाला प्रचंड वाकुल्या दाखवत फुकेरीच्या दिशेनं पळाली! दहाव्या मिनिटाला गावाबाहेर असलेल्या ओढ्यापाशी आम्ही पोहोचलो आणि त्या अमृतमय थंडगार पाण्याचा स्पर्श जाणवला... अक्षरशः शेजारी स्वर्ग अवतरल्याची जाणीव झाली! हनुमंतगडावर सध्या ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ या दुर्गसंवर्धन करणाऱ्या सेवाभावी संस्थेचं उत्कृष्ट कार्य सुरू आहे. गडाच्या एका दरवाजाला पुनरुज्जीवित करण्याची मोहीम संस्था सध्या राबवत आहे. हनुमंतगडाला वळसा घालत एक मोठी बैलगाडी आत फुकेरीत जात होती. ठरलेली बिदागी घेऊन दोन्ही मामा परत फिरले. पायवाट आता आणखी प्रशस्त झाली. 

समोरचा तेजाचा लालबुंद गोळा हळूहळू दिसेनासा होऊ लागला. फुकेरीच्या क्रिकेट सामन्याच्या तयारीचे आवाज कानी पडू 

लागले, पण  आम्ही मात्र हरवलो होतो जंगलाच्या  निस्तब्धतेत, तांबट पक्ष्याच्या शीळेमध्ये, पायाखाली वाजणाऱ्या पानांच्या पैंजणांमध्ये आणि पारगड ते हनुमंतगडाच्या असीम डोंगरयात्रेमध्ये...  मन एकच सूर आळवत होतं.... के दिल अभी भरा नहीं.....!

संबंधित बातम्या