भटकंतीत भेटलेला अवलिया

सतीश सुर्वे 
सोमवार, 20 एप्रिल 2020

ट्रेककथा
 

काही महिन्यांपूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थातच आपल्या राजांच्या स्वराज्याला बांधलं गेलेलं तोरण म्हणजेच स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणावर भटकंती करण्याचा योग आला! या किल्ल्याला ''गरुडाचं घरटं'' असं म्हणतात. यावरूनच किल्ल्याची भव्यता लक्षात येते. या भटकंतीत माझ्यासोबत निलेश लाळगे, संचित देशमुख, सागर लाळगे आणि सुरज पाटील या ट्रेकवेड्या मित्रांचा समावेश होता. ही माझ्या आयुष्यात मला वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेली भिडू मंडळी आहेत. यांनाही सह्याद्रीची भुरळ पडलेली आहे. त्यामुळं आम्ही मिळून एक प्लॅन आखला. रोजच्या, नित्याच्या आयुष्याला कंटाळलेलो आम्ही सह्याद्रीच्या जंगलात ''पीस''  का काय म्हणतात ते शोधायला निघालो. पण खरं तर आम्ही आपला इतिहास जगायला निघालो होतो. 

भल्या पहाटं आम्ही घर सोडलं. दिवसभर मुंबईवरून पुणे-स्वारगेट-वेल्हे असा लांबचा प्रवास आणि त्यानंतर तीन तासांची दमछाक करवणारी पायपीट करून आम्ही एकदाचं गडावर दाखल झालो. जसंजसं वर चढत जात होतो, तसंतसे बरेच लोक खाली उतरताना दिसत होते. यावरून कल्पना आली, की गडावर वास्तव्याला शक्यतो जास्त गर्दी नसावी. आम्ही पोचल्यावर पाहिलं, तर खरंच गर्दी नव्हती. वर पोचल्यावर दोन गोष्टींनी मन भारावून गेलं. एक म्हणजे अस्ताला निघालेल्या सूर्य किरणांनी आपल्या पिवळ्या गुलाबी छटांनी आसमंत असा काय रंगवला होता! त्यात भराभर वाहणारी ढगांची लाट, हा अगदीच मनमोहक नजरा दिसत होता. ही दृश्ये बघून आमचा तर सगळा थकवाच निघून गेला होता. तत्परतेनं लगेच पाठीवरची ओझी बाजूला काढून या स्वर्गीय सुखाला जगत बसलो. तेव्हा असं वाटलं जणू पाठीबरोबरच मनाचंही ओझं हलकं झालंय. हे सर्व अनुभवताना आणखी एका गोष्टीनं नजर खिळवली, ते म्हणजे एक सहासष्ठ वर्षं वयाचा तरुण आणि त्यांचा १२-१३ वर्षांचा नातू यांनी. हो सहासष्ठ वर्षं वयाचा तरुणच म्हणावं लागंल त्यांना, कारण तोरणा किल्ल्याची खडी आणि दमछाक करणारी चढाई याही वयात कोणाला करताना पाहिलं, की आमच्यासारख्या तरुणांना नक्कीच ऊर्जा मिळते आणि तसंही कोणी तरी म्हटलंय ''एज इज जस्ट अ नंबर''. आम्हाला यावेळी याचाच प्रत्यय आला. न राहून बाबांशी बोलणं झालं. त्यांचं नाव होतं जीवन इंगळे. ते सातारा जिल्ह्यातल्या खटाव गावाचे रहिवासी होते. आपल्या नातवाला महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक वारसा तसंच आपल्या महाराजांचे गडकिल्ले दाखवावे इतकाच काय तो बाबांचा अट्टाहास होता आणि म्हणूनच ते नातवाला दिवाळीच्या सुटीत गडकिल्ल्यांची सैर करायला घेऊन आले होते. मुख्य आणि आम्हाला अचंबित करणारी बाब म्हणजे बाबा राहणारे साताऱ्याचे आणि तिथून ते सायकलवर हा प्रवास करत आले होते. हे ऐकताच आम्ही तर आश्चर्यानं तोंडातच बोटं घातली, आम्हाला तरी मुंबईहून यायला फास्ट ट्रेन होती आणि तिथून पुढं यायला आरामशीर एसटी बस होती. तरीही आमच्या किती तरी तक्रारी होत्या.

जसजसा सूर्य मावळायला लागला आणि अंधार पडायला सुरुवात झाली, तशी बाबांनी आपली पावलं गड उतरण्यासाठी वळवली. अंधारात हा सहासष्ठ वर्षीय तरुण आता किल्ला उतरून पायथ्याशी मुक्कामी राहून सकाळी उजाडताच सायकलला टांग मारून राजगडाकडं रवाना होणार होता. कसली ती अफाट ऊर्जा, कसली ती इच्छाशक्ती, नाही तर एका ट्रेकनंतर दुसऱ्या दिवशी सुटी घेणारे आम्ही या बाबांसमोर शून्यातच जमा. ही अशी माणसं आयुष्यात येतात आणि जीवन जगण्याचा उत्तम मार्ग शिकवून, दाखवून जातात. या आजोबा-नातवाच्या चेहऱ्यांवर आम्हाला अजिबात थकवा जाणवत नव्हता. त्या १२-१३ वर्षं वयाच्या पोराच्या डोळ्यांत मात्र इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा दिसत होती. आम्ही मात्र या वयात मामाच्या गावाला गोट्या खेळण्यात व्यस्त असायचो आणि इतिहास फक्त पेपरपुरता वाचायचो. अशा बऱ्याच गप्पानंतर आम्ही दोघांना निरोप दिला. 

आमचा रात्रीचा मुक्काम आम्ही मेंगाई देवीच्या मंदिरात केला. बऱ्याच दिवसांनी आम्ही मित्रमंडळी भेटल्यानं रात्रीच्या गप्पांना काही पूर्णविराम मिळेना, पण सकाळी सर्योदयाच्या आधी उठून किल्ला फिरायचा होता, म्हणून सगळ्यांनी पडी मारली. थंडीनं मला झोप लागत नव्हती, पण अंधारात बाहेर जाणार तरी कुठं? म्हणून मंदिरातल्या दिव्याला सोबत म्हणून की काय मी ही उजाडायची वाट पाहत बसलो. रात्रभर जागाच असल्यानं बाकीच्यांना उठवायला अलार्मची गरज पडली नाही. ठरल्याप्रमाणं सूर्योदय पाहून, नशीब जोमातच की काय म्हणून यावेळी इंद्रावज्रही पाहायला मिळालं. झुंजार माची, बुधला माची, कोकण दरवाजा, मुख्य दरवाजा हे सर्व फिरून आम्ही गडउतारस निघालो. खाली पोचेपर्यंत आमची ठरलेली बस निघून गेली होती. पण भटकंतीत असं काही झालं नाही, तर ती भटकंती कसली? 

पुढच्या बसला बराच वेळ लागणार होता आणि सर्वांच्या पोटात कावळ्यांनी ओरडून थैमान घातलं होतं. म्हणून आम्ही जवळच्या हॉटेलात जाऊन पोटपूजा उरकवली आणि पुन्हा बस स्टँडला येऊन झाडाच्या सावलीत निवांत बसची वाट बघत पडलो. त्यापुढचा आमचा प्रवास ठरल्याप्रमाणं सुखकर होऊन घरी पोचलो. भटकंतीतून शरीर घरी आलं, पण मन मात्र तिथंच होतं. तो सूर्यास्ताचा नजरा, सह्याद्रीची अनोखी भेट इंद्रवज्र आणि यात भर म्हणजे ते बाबा आणि त्यांचा नातू. हे सर्वच डोळ्यांसमोर उभं राहतं होतं.  

एकेदिवशी सहज युट्यूबवर झी २४ तासच्या चॅनेलवर याच बाबांचा व्हिडीओ पाहायला मिळाला आणि पुन्हा आश्चर्यनं बोटं तोंडात गेली. व्हिडीओ पाहिल्यावर कळालं, की हे जीवन बाबा फक्त आपल्या नातवालाच महाराष्ट्र दाखवण्यासाठी फिरत नाहीत, तर पर्यावरण संवर्धन आणि साहित्य वाचन यासाठी त्यांनी आपलं आख्खं आयुष्य वाहून घेतलंय. त्यांच्या तालुक्यात, जिल्हात आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात ते लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ''फिरते वाचनालय'' घेऊन फिरत आहेत. त्यांच्याकडं दोन हजारांहून अधिक पुस्तकांचा संचय आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये म्हणून ते गावोगावी सायकलवर फिरतात आणि वाचनाचा प्रचार प्रसार करतात.

सायकलवर प्रवास केल्यानं शरीर तर सुदृढ राहतं, शिवाय कोणताही रोग जडत नाही असं बाबा आवर्जून सांगतात. बाबांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. पण जेव्हा लोकं भेटून पुस्तकं मागतात, तेव्हा मला खरा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतं, असं ते म्हणतात. एक सुसंगत समाज निर्माण करण्यासाठी लोकांनी वाचण्याची गरज आहे. त्यासाठीच खेडेगावातल्या या सर्वसामान्य व्यक्तीनं ध्यास घेतलाय. खरंच बाबांनी राबवलेला हा उपक्रम समाजाला लाभलेली देण आहे. बाबांचा हा तेरा वर्षांपासूनचा चाललेला प्रवास असाच सुरू रहावा आणि समाजाला पुन्हा शिवबा, सावरकर, आंबेडकर मिळावेत. खरंच बाबांनी त्यांच्या नावाप्रमाणंच मला जीवन जगण्याची कला शिकवलीये. त्या दिवसापासून या सह्याद्रीनं आणखी एक आदर्श माझ्या पदरात पाडला. काय मिळतं डोंगर हिंडून? या प्रश्नाच्या अनेक उत्तरांपैकी हे एक उत्तर आहे. पुन्हा एकदा लवकरच बाबांची भेट होईल या आशेसह मी जास्तीतजास्त पुस्तकं वाचेन असा मी मनाशी निर्धार करतो.

संबंधित बातम्या