नॅशनल क्रश...

रोशन मोरे
शुक्रवार, 16 मार्च 2018

ट्रेंडिंग
प्रियाच्या व्हिडिओला लोकांनी अशरक्षः डोक्यावर घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाना तिच्या मुलाखती झळकल्या. या मुलाखतीमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करतानाच्या अनेक गमतीजमती तिने सांगितल्या.

वर्गातले दृश्‍य असावे.. विशीतला एक मुलगा साधारण त्याच वयाच्या मुलीकडे पाहून एक भुवई उडवतो.. प्रतिसाद म्हणून ती त्याला दोन भुवया उडवून दाखवते. तोही तसेच करतो.. आणि मिश्‍कीलपणे तिच्याकडे पाहू लागतो. ती एक भुवई उडवते आणि डावा डोळा मिचकावते.. घायाळ झाल्यासारखा तो मित्राच्या खांद्यावर रेलतो.. वातावरणात एकदम उल्हास, खट्याळपणा येतो... 

एवढाच व्हिडिओ पण एका रात्रीत त्याने अक्षरशः गोंधळ उडवला. त्यातील मुलगी प्रिया प्रकाश वॉरियर इंटरनेटवरची नंबर एक पर्सनॅलिटी झाली. तिच्याबरोबरचा मुलगाही अनेकांच्या पसंतीला उतरला. पण प्रियाने नेट अक्षरशः काबीज केले.. 

त्यानंतर ती आणि राहुल गांधी, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली अशा अनेक मिम्स येऊ लागल्या. त्यानंतर तिचा गनशॉटचाही व्हिडिओ आला, पण पहिल्याची सर त्याला येऊ शकली नाही.. नेटवर गाजणाऱ्या अशा व्हिडिओ किंवा चित्रफितींचे आयुष्य फार नसते. पण काही सेकंदांच्या या व्हिडिओने प्रियाचे आयुष्य बदलून टाकले हे नक्की, अनेक इन्स्टाग्राम स्टार्संना मागे टाकत प्रियाच्या फॉलोअर्रसची संख्या तब्बल २८ लाखांपेक्षा जास्त झाली. विशेष म्हणजे एकाच दिवसात तिला सहा लाख लोकांनी फॉलो केले. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आधी एकच दिवस हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मिडीयावर प्रेमाची नव्हे तर केवळ प्रियाच्याच नावाची आणि या व्हायरल व्हिडिओची चर्चा रंगली होती. अनेकांनी ट्विटर, फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर ’आई तुझी सुन मिळाली’ ’नॅशनल क्रश प्रिया’ अशा मजेशीर पोस्ट अपडेट करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. 

प्रियाला प्रसिद्धी मिळवून देणारे हे दृश्‍य म्हणजे ‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटाचा टिझर आहे. प्रिया प्रकाश वॉरियर ही या चित्रपटाची नायिका आहे. केवळ १८ वर्षाची असलेली प्रिया बी कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात तिची निवड सुरवातीला सहअभिनेत्री म्हणून करण्यात आली होती. मात्र नंतर प्रियाला मुख्य अभिनेत्रीची भूमिका  मिळाला.

सोशल मिडीयावर या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना मात्र प्रियाच्या विरोधात हैद्राबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. प्रियाचा जो व्हिडिओ वायरल झाला आहे त्यातल्या काही शब्दांमुळे आपल्या धार्मिक भावना दुखवल्याची तक्रार काही तरुणांनी केली आहे. यानंतर चारच दिवसात प्रियाचा याच चित्रपटातील दुसरा व्हिडिओदेखील इंटरनेटवर आला पण त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. पूर्वीच्या व्हिडीओत प्रियाने आपल्या डोळ्यांनी इशारा केल्या नंतर आता आपल्या बोटांनी बंदूक चालवताना ती दिसते आहे. शिक्षिका वर्गात शिकवत असतानाच आपल्याकडे पाहणाऱ्या मुलाला गोड हसून प्रतिसाद देते, आपल्या दोन बोटांची बंदूक करुन त्याचे चुंबन घेऊन त्या मुलावर गोळी चालवते आणि क्षणार्धातच हा मुलगा गोड हसत आपल्या हृदयावर हात ठेवून मित्राचा अंगावर कोसळतो. हा मुलगा आहे प्रिया सोबतचा तिचा सहअभिनेता, तिच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार मोहम्मद रोशन.

प्रियाच्या व्हिडिओला लोकांनी अशरक्षः डोक्यावर घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाना तिच्या मुलाखती झळकल्या. या मुलाखतीमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करतानाच्या अनेक गमतीजमती तिने सांगितल्या. तसेच आपल्या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळाल्याचे आश्‍चर्य वाटत असल्याचे तिने सांगितले, हा सीन शुट करताना डोळा मिचकवण्याचे ठरले नव्हते केवळ भुवया उडवण्याचा सीन होता. आपण डोळा मारणे, गोड हसणे, लाजणे हे उत्स्फूर्तपणे केले आणि एका टेकमध्येच हा सीन ओके झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे प्रियाने कबूल केले. या चित्रपटास हा सीन चांगला होण्याचे श्रेय प्रिया या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देते. हा व्हिडिओ प्रियाच्या करिअरसाठी चांगलाच फायदेशीर ठरतोय. सिनेसृष्टीत पदार्पणाच्या तयारीत असलेल्या प्रियाने आगामी सिनेमांसाठी आपला ’भाव’ वाढवला असल्याचीही चर्चा आहे. ’पिंक’ सिनेमाच्या दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरीनेही तिला आगामी सिनेमासाठी विचारणा केली होती, मात्र आपल्या पदार्पणातील चित्रपटावर लक्ष्य केंद्रित करायचे असल्याचे कारण देत तिने हा सिनेमा करण्यास चक्क नकार दिला. मोठ मोठे दिग्दर्शक प्रियाला आपल्या सिनेमात घेण्यास उत्सुक असून यामध्ये मल्याळम सिने सृष्टिबरोबरच बॉलिवुडमधील दिग्दर्शकांचा समावेश आहे. एका मल्याळम वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार प्रियानं नवीन सिनेमासाठी मानधानामध्ये वाढ केली आहे. पुढील प्रत्येक सिनेमासाठी ती २ कोटी रुपयाची मागणी करत असल्याचे या मल्याळम वेबसाइटने म्हटले आहे.

संबंधित बातम्या