सोशल मीडियावरचे प्राणिजगत!

इरावती बारसोडे
बुधवार, 6 मे 2020

ट्रेंडिंग
 

सध्याच्या कोरोना लॉकडाऊनमुळे आपण घरात बसलो आहोत आणि अनेक वन्यजीव रस्त्यावर दिसत आहेत... नुसते दिसत नाहीयेत तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सध्या असाच एक सोशल मीडियावर व्हायरल झालेला वन्यजीव म्हणजे, गंगेतला रीव्हर डॉल्फिन मासा. वनविभागाचे अधिकारी आकाश दीप बाधवान यांनी ट्विटरवर सात सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये डॉल्फिन पोहत जाताना दिसतो. मीरतमध्ये गंगा नदीत हा डॉल्फिन आढळला. ‘खरे तर ही प्रजाती पूर्वी गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना नद्यांमध्ये आढळत असे, पण आता हे मासे संकटात आहेत. ते गोड्या पाण्यात राहतात आणि जवळजवळ आंधळेच असतात,’ अशी माहिती बाधवान यांनी व्हिडिओबरोबर शेअर केली आहे. सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये ही सकारात्मक बातमी बघून खूप छान वाटले, अशा आशयाचे ट्विट्स अनेक युजर्सनी केले आहेत. काहींनी असे व्हिडिओज वारंवार पोस्ट करत राहा, अशी विनंती केली आहे.

निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी मंडळींमध्ये प्राण्यांचे, विशेषतः गोंडस प्राण्यांचे आणि प्राण्यांनी केलेल्या करामतींचे मजेशीर व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ चित्रपटामधला छोटासा सिंबा आठवतोय का? हा छोटासा सिंबा भलताच क्युट होता. असाच एक अति क्युट बछडा सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. वेलकम टू नेचर या ट्विटर अकाउंटवर एका सिंहाच्या बछड्याचा जेमतेम १५ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. टांझानियामधल्या सेरेंगेटी नॅशनल पार्कमधला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून या व्हिडिओला १० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत, तर ही पोस्ट दोन हजारांहून अधिक वेळा रीट्विट झाली आहे. कारण, हा व्हिडिओ आहेच तसा! 

या व्हिडिओमधला बछडा डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण त्याला काही ते जमत नाही, त्यामुळे त्याच्या तोंडातून फक्त छोटे आवाजच निघतात. पण त्याचे हे गोंडस प्रयत्न बघून अनेकांची ‘Awwwww, how cute...’ अशीच रिअक्शन आली आहे. विशेष म्हणजे हा बछडा लायन किंगमधल्या छोट्या सिंबाची आठवण करून देतो. अडोरेबल, स्वीट, अमेझिंग कब अशा शब्दांत त्याचे कौतुक होते आहे. 

या छोट्या सिंबाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचवेळी हत्तींचेही एक-दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. भारतीय वनविभागाचे अधिकारी परवीन कासवान यांनी हे व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यांनी पहिला व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शन लिहिले होते, ‘खाली उतरण्याच्या दोन पद्धती आहेत..’ त्या कोणत्या हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट होते. व्हिडिओमध्ये काही हत्ती नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पहिला हत्ती व्यवस्थित सावकाश चालत खाली उतरतो. तर, त्याच्या मागचा हत्ती क्षणभर थांबतो नंतर चक्क खाली बसतो आणि उतारावरून स्वतःला खाली झोकून देतो व गडगडत खाली येतो. हे बघून आपल्याला नक्कीच हसायला येते. आता हा हत्तीचा आळशीपणा म्हणायचा की त्याची हुशारी, हे ज्याचे त्याने ठरवावे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कासवान यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी म्हटले आहे, ‘मी उतरण्याच्या दोन पद्धती सांगितल्या. कोणीतरी मला आणखी एक पद्धत पाठवली. हा व्हिडिओ कोणी काढला हे मात्र माहीत नाही.’ या व्हिडिओमध्ये आपण एका हत्तीकडे मागून बघतो. हा हत्ती दोन पावले चालतो. मग मागचे पाय वाकवतो, ते खाली टेकवतो आणि गवत, मातीमधून चक्क स्लाइड करत जातो. कदाचित त्याला चालायचा कंटाळा आला असावा किंवा तो गमतीच्या मूडमध्ये असावा. 

वनविभागाचे आणखी एक अधिकारी, सुसांता नंदा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओजही खूप व्हायरल होतात. त्यांनीही शिस्तबद्ध हत्तींचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये हत्तींचा एक कळप पाण्याच्या दिशेने निघाला आहे. मूळ ॲनिमेटेड जंगल बुक सिनेमामधला सैन्यातल्या शिस्तीप्रमाणे चालणारा हत्तींचा कळप आठवतोय का? नंदा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमधला कळपही तसाच आहे, कारण व्हिडिओमध्ये सर्व हत्ती एका ओळीत चालताना दिसतात. आपल्याला जी रांग दिसते तिच्या मागेही एक रांग असावी, कारण मागेही अधूनमधून हत्ती दिसतात. हा कळप खूपच मोठा असावा. व्हिडिओ संपेपर्यंत हत्ती येतच राहतात. हा व्हिडिओ आफ्रिकेमधला आहे. कळपामध्ये किती हत्ती असावेत याचा अंदाज बांधा, असे आवाहन नंदा यांनी केले होते. मी मोजण्याचा प्रयत्न केला.. तुम्हीही करून बघू शकता. ट्विटर युजर्सनी हा व्हिडिओसुद्धा उचलून धरला. 

सध्याच्या काळात असे हलके-फुलके व्हिडिओज मनाला उभारी देऊन जातात, हे नक्की! 

संबंधित बातम्या