डेव्हिड वॉर्नरचे टॉलिवूड प्रेम

इरावती बारसोडे
सोमवार, 18 मे 2020

ट्रेंडिंग
 

हा  खरे तर आयपीएलचा सीझन. पण लॉकडाऊनमुळे सगळ्या खेळांप्रमाणेच क्रिकेटचे सामनेही होत नाहीयेत, त्यामुळे क्रिकेटपटूही घरीच आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरही सध्या त्याच्या कुटुंबाबरोबर मजेत वेळ घालवतो आहे. एवढेच नव्हे तर सहकुटुंब टिकटॉक व्हिडिओज तयार करून सोशल मीडियावर टाकतो आहे. त्या व्हिडिओजनी सगळ्यांचेच, विशेषतः भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण हे व्हिडिओज बॉलिवूड आणि टॉलिवूडमधल्या गाण्यांवर केलेल्या आहेत. 

काही सेकंदांच्या या व्हिडिओजमध्ये डेव्हिड, त्याची बायको कँडिस वॉर्नर आणि त्यांच्या मुली आयव्ही आणि इंडीही सहभागी झाल्या आहेत. काही व्हिडिओजमध्ये त्यांची मुलगी इंडी जास्त लक्ष वेधून घेते आहे. 
आता अलीकडेच वॉर्नर फॅमिलीने ‘रामुलो राम्मुला’ या गाण्यावर नाचतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. खाली ‘He and she are back again. Thoughts? What’s the song?’ असे कॅप्शनही दिले आहे. हे गाणे लोकप्रिय असून अल्लू अर्जुन यांचे आहे. स्वतः अल्लू अर्जुनने डेव्हिड वॉर्नरच्या पोस्टला रिस्पॉन्स देताना ट्विट केले आहे, ‘One more big surprise. Thank you sooo much once again sir. Killed it.’ या व्हिडिओला २४ तासांत १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

डेव्हिड वॉर्नरच्या या तेलगू टिकटॉक व्हिडिओजमुळे तू सिनेमात काम का नाही करत, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. याचे कारणही तसेच आहे.

मागच्या महिन्यामध्ये सुरुवातीला डेव्हिड आणि त्याची एक मुलगी ‘शिला की जवानी’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओखाली डेव्हिडने कॅप्शनही दिले आहे, ‘Please help us.’ या व्हिडिओनंतर त्याने पुन्हा एकदा याच गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला, फक्त यावेळी त्याची दुसरी मुलगी इंडी त्याच्याबरोबर होती. त्याखाली त्याने कॅप्शन लिहिले होते, की इंडीनेही तुमच्यासाठी एक व्हिडिओ करायला सांगितला आहे. प्लीज मला कोणीतरी मदत करा..

'शिला की जवानी'नंतर डेव्हिड आणि कँडिसने तेलगू गाण्यांवरचे टिकटॉक व्हिडिओज तयार करून पोस्ट केले आहेत. अल्लू अर्जुन यांच्या लोकप्रिय ‘बुट्टा बोम्मा’ या गाण्यावरचा एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये हैदराबाद संघाची जर्सी घातलेला डेव्हिड आणि कँडिस डान्स करत आहेत आणि त्यांच्या मागे इंडीसुद्धा मधेच बागडताना दिसते आहे. या व्हिडिओला ४२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून २७ हजारांहून अधिक कॉमेंट्स आलेल्या आहेत. 

आणखी एका व्हिडिओमध्ये डेव्हिड, कँडिस आणि इंडी दिसत आहेत. टॉलिवूडच्याच एका गाण्याच्या म्युझिकवर हा व्हिडिओ तयार केला आहे. पण या व्हिडिओमध्ये त्यांच्या डान्सच्या आधी डेव्हिडची शॉर्ट्सवर बांधलेली लुंगी (?) लक्ष वेधून घेते. दोघांनी गॉगल्सही घातले आहेत. या व्हिडिओला इन्स्टावर १८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

आपल्या देसी गाण्यांच्या टिकटॉक व्हिडिओज शिवाय काही इतर गमतीशीर व्हिडिओजही डेव्हिड वॉर्नरच्या इन्स्टा अकाऊंटवर पाहायला मिळतील. विशेष म्हणजे बायको आणि मुलींबरोबर तयार केलेले व्हिडिओ जास्त मजेशीर आहेत.

संबंधित बातम्या