हेअर ड्रायर अन् भाजीविक्रेता विराट!

इरावती बारसोडे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

ट्रेंडिंग
 

क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाचा अति जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे क्रिकेटविषयीच्या कुठल्याही बाबतीत भारतीयांचा प्रतिसादही तीव्रच असतो. आता भारत आणि श्रीलंकेमधील पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्याचेच उदाहरण घ्या ना! हा सामना गुवाहाटीमध्ये होणार होता आणि पावसाने तो होऊ शकला नाही, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण पावसानंतर घडलेल्या घडामोडी सोशल मीडियावर चांगल्याच हवा करून गेल्या. 

त्याचे झाले असे, हा सामना रविवारी (ता. ५ जानेवारी) गुवाहाटीमधील बारसपरा मैदानामध्ये खेळला जाणार होता. टॉसनंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला, तेव्हा पिच भिजू नये म्हणून त्यावर अच्छादनेही टाकण्यात आली. पण, त्यांचा काही उपयोगच झाला नाही. पावसाचे पाणी गळून मैदान भिजले. कोरड्या मैदानावर सामना खेळता यावा म्हणून मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खूप खूप प्रयत्न केले. मैदान वाळवण्यासाठी काय काय नाही करून पाहिले. अगदी होम अप्लायन्सेससुद्धा वापरून पाहिली. होय, होम अप्लायन्सेस! हेअर ड्रायर्स, इस्त्री आणि व्हॅक्युम क्लीनर, तेही क्रिकेटचे मैदान वाळवण्यासाठी! आता याला काय म्हणावे बरे? पावसाळ्यात ओले कपडे वाळवण्यासाठी आपण घरी इस्त्री, हेअर ड्रायर वापरतो ते ठीक आहे, पण मैदान वाळवण्यासाठी या वस्तूंचा वापर म्हणजे हद्दच झाली. या कृतीमुळे नेटिझन्सना आयते साधन मिळाले. यानंतर ट्विटरवर भावनांचा उद्रेकच झाला. अनेकांनी बीसीसीआयवर झाडून टीका केली. कर्मचारी हेअर ड्रायरने जमीन वाळवण्याचा प्रयत्न करतानाचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून कोणी म्हणाले, हे बघा इंडियन जुगाड; कोणी म्हणाले, या सामन्याचा सामनावीर तर हेअर ड्रायर आहे; तर कोणी म्हणाले, बीसीसीआय व्हॉट अ शेम! अनेक पाकिस्तानी ट्विटर युजर्सनीदेखील भारताला कमी लेखण्याची ही संधी सोडली नाही आणि मैदान वाळवायला हेलिकॉप्टर पाठवू का, असे ट्विट केले. 

या ‘जुगाड’चा अर्थातच काही फायदा झाला नाही. सामना रद्दच झाला. पण तत्पूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही खेळपट्टीची पाहणी केली. खाली वाकून, गुडघे टेकवून, हात लावून अगदी व्यवस्थित पाहणी केली... आणि नेटिझन्सना आणखी एक निमित्त मिळाले. विराटचा हा फोटो घेऊन त्याचे भन्नाट मीम्स तयार केले आणि त्यात त्याची बायको आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिलाही ओढले. नेटिझन्सचा काही नेम नसतो; मीम्सच्या माध्यमातून ते फोटोतल्या व्यक्तीकडून काहीही करून घेऊ शकतात. फोटोमधल्या विराटचेही तेच झाले. त्याच्या हातावर हँडग्लोव्ह घालून हातात थापी देऊन त्याला सिमेंट सारवायला लावले. रांगोळीसुद्धा काढायला लावली. हातात भोवरा देऊन तो खेळायला लावला. केक कापायला लावला. त्याच्या हातात बाटली देऊन ग्लास भरायला लावले. माती खणून झाड लावायला लावले आणि म्हटले, ‘पाऊस पडलाच आहे, मॅच होणार नाहीये, तर एक झाडच लावून टाकू.’ थ्री इडियट्स चित्रपटामधील राजूच्या घरी गेलेल्या राजू, रॅंचो आणि फरहानला राजूच्या आईऐवजी विराटच्या हातून जेवण वाढले. एवढेच नाही, तर अनुष्काच्या ''सुई धागा'' चित्रपटातील एक फोटो घेऊन तो या फोटोबरोबर जोडला आणि दोघांना भाजी विकायला लावली. 

सामना झाला नाही म्हणून नाराज होण्याऐवजी नेटिझन्सनी स्वतःची ही अशी करमणूक करून घेतली.

संबंधित बातम्या