रतन टाटांचा ‘थ्रोबॅक थर्स्डे’

इरावती बारसोडे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

ट्रेंडिंग

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा... वय ८२ वर्षे... तसे टाटा नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या ते चर्चेत आहेत, ते सोशल मीडियावरच्या त्यांच्या एका फोटोमुळे. 

रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या तरुणपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये टाटा यांनी पांढरा टी शर्ट घातला आहे. त्यांनी खाली लिहिले आहे, ‘मी हा फोटो काल पोस्ट करणार होतो. पण मला ‘थ्रोबॅक्स’विषयी आणि ते कसे ‘थर्स्डे’लाच येतात हे सांगण्यात आले. त्यामुळेच हा एक थ्रोबॅक, मी एलए(लॉस एंजलिस, अमेरिका)मध्ये असतानाचा; यानंतर मी काही दिवसांतच आनंदाने भारतात परतलो होतो.’ त्यांनी पुढे #throwbackthursday हा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे. रतन टाटा १९६२ मध्ये लॉस एंजलिसमधल्या जोन्स अँड एमन्स येथे काम करत होते. 

 ‘थ्रोबॅक थर्स्डे’ म्हणजे आपला जुना कुठला तरी फोटो थर्स्डेला म्हणजेच गुरुवारी पुन्हा नव्याने पोस्ट करायचा आणि आठवणींना उजाळा द्यायचा. #throwbackthursday किंवा #TBT असे सर्च केले, तर अनेकांचे अनेक जुने जुने फोटो सापडतील. अभिनेत्री काजोलनेही नुकताच असा एक फोटो पोस्ट केला होता. पण आता हे जुने फोटो थर्स्डेलाच का पोस्ट करायचे? तर, त्यामागे काही खास कारण नाही; इतर दिवशीही केले तरी चालतात. थ्रोबॅक थर्स्डेचा हा ट्रेंड कसा सुरू झाला यामागेही इतिहास आहे, पण आपण त्याच्या खोलात नको शिरायला. 

 तर, यंग टाटांचा हा थ्रोबॅक फोटो बघून नेटिझन्स फारच खूश झाले, विशेषतः मुली! इन्स्टाग्रामर्सनी, म्हणजे जे इन्स्टाग्राम वापरतात अशांनी (यात पुरुषांचाही समावेश आहे बर का!) हा फोटो उचलून धरला. या फोटोला आत्तापर्यंत चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या पोस्टवर सुमारे आठ हजार कॉमेंट्स आल्या आहेत. कोणी त्यांना हॉलिवूड स्टार म्हटले आहे, तर काहींनी त्यांची तुलना मार्व्हलचा सुपरहिरो ‘कॅप्टन अमेरिका’ याच्याशी करून रतन टाटा म्हणजे ‘कॅप्टन इंडिया’ आहेत असे म्हटले आहे. तुम्ही त्यावेळी बॉलिवूडमध्ये का गेला नाहीत, असा प्रश्‍नही त्यांना विचारला आहे. कोणी म्हटले आहे, तुम्ही सिनेमात असता तर एक नंबरला असता आणि तुम्ही ग्रीक गॉडसारखे दिसता (सध्याचा बॉलिवूडमधील ग्रीक गॉड हृतिक रोशन आहे). कोणाला त्यांच्या डोळ्यात विशेष चमक दिसली. तर, अनेकांनी तुमचे कॅप्शन आवडले अशी स्तुती केली आहे. त्यांच्या टी शर्टवरूनही कॉमेंट करताना लिहिले आहे, ‘त्यांनी कोणताही ब्रँड नसलेला प्लेन पांढरा टी शर्ट घातला आहे, कारण ते स्वतःच एक ब्रँड आहेत.’ तर कोणाचे त्यांच्या कॅप्शनमधील ‘happily returned to India’ याच वाक्याकडे जास्त लक्ष गेले. 

 रतन टाटा सोशल मीडियावर फारसे ॲक्टिव्ह नसतात. त्यांनी त्यांचे हे इन्स्टा अकाउंट गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केले. त्यांचे या घडीला नऊ लाख ३१ हजार फॉलोअर्स आहेत. हा त्यांचा पहिलाच थ्रोबॅक फोटो नाही. याआधीही त्यांनी ते कॉर्नेल विद्यापीठात शिकत असतानाचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला होता. टाटांचे श्‍वानप्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर कुत्र्याचे फोटो नसते, तरच नवल! त्याशिवाय पहिल्या टाटा इंडिकाचे उद्‍घाटन झाले तेव्हाचा फोटो आहे, जेआरडी टाटा यांच्याबरोबरचाही एक फोटो आहे. पण, आत्ताचा लेटेस्ट फोटोच सर्वात हिट ठरला आहे. या पोस्टला नेटिझन्सकडून मिळालेल्या प्रतिक्रियांवरूनच रतन टाटांची लोकप्रियता स्पष्ट होते. 

संबंधित बातम्या