शिक्षा करणारा सिग्नल

इरावती बारसोडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

ट्रेंडिंग
 

मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये वाहनांची भयाण गर्दी आहे. या गर्दीतही सिग्नल लाल असताना विनाकारण हॉर्न वाजवून पुढच्याचे डोके उठवणे काहींना फार छान जमते. या लोकांना वाटत असते, फक्त आपल्यालाच घाई आहे. यांना आवरणार तरी कसे? यावर मुंबई पोलिसांनी एक भारीच शक्कल लढवली आहे... ती म्हणजे ‘द पनिशिंग सिग्नल!’ हॉर्न जास्त वाजवला, तर हा सिग्नल तुम्हाला शिक्षा करणार आहे.

पोलिसांनी मुंबईच्या काही चौकांमध्ये सिग्नलजवळ डेसिबल मीटर बसवले आहे. चौकातला आवाज ८५ डेसिबलच्या वर गेला, की सिग्नल पुन्हा रिसेट होतो. म्हणजे सिग्नल सुटायला काही सेकंद शिल्लक असले, की हॉर्न वाजवण्याचे प्रमाण वाढते. मग आवाज वाढतो... आणि आवाज वाढला की सिग्नल रिसेट होऊन पुन्हा पहिल्यापासून आकडे दिसायला लागतात. त्यामुळे पोलिसांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर ‘हाँक मोअर, वेट मोअर.’ त्यांनी बोर्डच लावलाय तसा तिथे.   

पोलिसांनी ‘द पनिशिंग सिग्नल’चा दोन मिनिटांचा व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ३१ जानेवारी रोजी  पोस्ट केला आहे. हॉर्न नॉट ओके, प्लीज... असे म्हणत आम्ही मुंबईच्या बेपर्वा ‘हाँकर्स’चे म्युट बटण कसे दाबले ते बघाच, असे पोलिस म्हणतायत. व्हिडिओची सुरुवातच ‘वेलकम टू द हाँकिंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड...’ अशी होते. पुढे ते म्हणतात, ‘इथे लोक सिग्नल लाल असतानाही हॉर्न वाजवतात. कदाचित त्यांना वाटते की हॉर्न वाजवल्यामुळे सिग्नल लवकर हिरवा होईल. त्यांना समजत नाही. आम्हा मुंबई पोलिसांना याबद्दल काहीतरी करायचेच होते.’ या पनिशिंग सिग्नलमुळे विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांची कशी पंचाईत झाली आणि जास्त वेळ थांबावे लागले ते व्हिडिओमध्ये कैद केले आहे. व्हिडिओच्या शेवटी वाहतूक पोलिस एकमेकांना टाळ्या देतानाही दिसतात. व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला कम टू बॉम्बे हे गाणे वाजत राहते. शेवटी व्हिडिओमध्ये पोलिस म्हणतात, ‘Feel free to honk, if you don't mind waiting. #honkresponsibly’ 

या व्हिडिओचे चांगले स्वागत झाले. व्हिडिओला दोन दिवसांत १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सुमारे ५५ हजार कॉमेंट्स आलेल्या आहेत आणि २२ हजारांहून अधिक वेळा रीट्विट करण्यात आला आहे. खूपजणांनी पोलिसाच्या या युनिक आयडियाला दाद दिली. पूर्ण मुंबईमध्ये हे सुरू करा असेही अनेकांनी म्हटले. कोलकतामधल्या ट्विटर युजरने कोलकता पोलिसांना टॅग करून तिथेही हे राबवता येईल का याबाबत विचार करावा, असे सुचवले आहे. 

पोलिस यंत्रणा ट्विटरवर अतिशय सक्रिय असते. नागरिकांना सर्वतोपरी मदत करणे, जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश असला, तरीही या हँडल्सवरून पोस्ट केले जाणारे काही ट्विट्स असा काही भाव खाऊन जातात, की त्यांची चर्चा माध्यमांवरही सुरू होते. पोलिसांच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’ला भरभरून दाद दिली जाते. 

आता हेच उदाहरण बघा ना. महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हँडलवरील एक ट्विटही असेच गाजले. निमित्त होते, रस्ता सुरक्षा सप्ताहाचे. थ्री इडियट्स सिनेमामध्ये तीन मित्र दुचाकीवरून ट्रिपल सीट चालले आहेत, असा सीन आहे. पोलिसांनी त्या फोटोवर ‘ट्रिपल सीट जाने नही देंगे तुझे’ असे ठसठशीत लिहिले असून फोटोला कॅप्शनही दिले आहे, ‘दिल जो तेरा बात बात पे घबराये, ड्रायव्हर इडियट है, प्यार से उसको समझा ले।’ 

विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला होता, तो दिवस आठवतो का? नागपूर पोलिसांनी थेट विक्रमला उद्देशूनच ट्विट केले होते, ‘प्रिय विक्रम, कृपया उत्तर दे. सिग्नल्स तोडल्याबद्दल आम्ही तुला दंड आकारणार नाही.’  

नेटिझन्सनी नागपूर पोलिसांच्या विनोदबुद्धीला सलाम करत ते ट्विट उचलून धरले. या पोस्टला सुमारे १० हजार रीट्विट्स आणि ३५ हजार लाइक्स मिळाले होते. 

पोलिसांचे ट्विटरवरचे असे अनेक मजेदार किस्से नेहमीच व्हायरल होत असतात. पोलिसांच्या ट्विटरवरील सक्रियतेमुळे लोकांना मदतही होते आणि थोडे मनोरंजनही!   

संबंधित बातम्या