हिमबिबट्याचा कॅटवॉक

इरावती बारसोडे
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

ट्रेंडिंग
 

मागच्या आठवड्यामध्ये सोशल मीडियावर अनेक घडामोडी व्हायरल झाल्या आणि ट्रेंडिंगमध्येही होत्या. फिल्मफेअर पुरस्कारांवर टीका केली गेली, लव्ह आज कल-२ सिनेमाची खिल्ली उडवली गेली, तर दुसरीकडे उसेन बोल्टपेक्षाही वेगाने धावणाऱ्या श्रीनिवास गौडा याचीही चर्चा होती. त्याच वेळी आणखी एकाने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले... एका राजस हिमबिबट्याने! 

हिमाचल प्रदेशमधल्या स्पिती जिल्ह्यामध्ये दुर्मीळ स्नो लेपर्ड अर्थात हिमबिबट्या आढळला. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे सुसांता नंदा यांनी त्याचा व्हिडिओ ट्विटरवर १७ फेब्रुवारीला पोस्ट केला होता. या साधारण ४० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक गुबगुबीत प्रौढ हिमबिबट्या आरामात फिरताना दिसतो आहे. त्याचा थाटच काही निराळा आहे. व्हिडिओच्या शेवटी तो थांबून उत्सुकतेने आपल्याकडे बघतोही (म्हणजे व्हिडिओ काढणाऱ्या माणसाकडे). हे अतिशय दुर्मीळ ‘सायटिंग’ मानले जात आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

व्हिडिओमधला हिमबिबट्या अतिशय जवळ आल्याने स्पष्ट दिसतो आहे. व्हिडिओ पोस्ट करताना नंदा यांनी स्नो लेपर्डची माहितीही दिली आहे. ते म्हणतात, ‘बिग कॅट्स (वाघ, सिंह यांसारख्यांना बिग कॅट्स असे म्हटले जाते)मधील स्नो लेपर्ड हा अतिशय सुंदर प्राणी आहे. इतर बिग कॅट्सचे डोळे पिवळे असतात, पण याचे मात्र करडे किंवा निळे असतात. त्याची शेपूट शरीराएवढीच लांब असते. केसांची लांबी ५ इंच असते, ज्यामुळे त्यांचे थंडीमध्ये संरक्षण होते. हे प्राणी दुर्मीळ आहेत.’

हा व्हिडिओ जवळपास १९ हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच त्याला जवळपास दीड हजार कॉमेंट्स, दोन हजार लाइक्स मिळाले असून ४५५ वेळा ही पोस्ट रीट्विट केली गेली. ट्विटरवर अनेकांनी मॅजेस्टिक, रेअर सायटिंग, अमेझिंग, ब्यूटिफुल अशी विशेषणे वापरून कॉमेंट्स केल्या आहेत. तर एका ट्विटरने गमतीने ‘दॅट्स सम कॅटवॉक,’ असे ट्विट केले आहे. अनेकांनी या देखण्या हिमबिबट्याचे दर्शन घडवल्याबद्दल नंदा यांना धन्यवाद दिले आहेत. एका युजरने तर हिमबिबट्याने त्या व्हिडिओ काढणाऱ्याला खाल्ले म्हणून व्हिडिओचे रेकॉर्डिंग थांबले का, असा जोकही केला आहे. 

नंदा यांनी हिमबिबट्याचा व्हिडिओ पोस्ट करण्याच्या काहीच दिवस आधी एक वाघीण आणि तिच्या दोन पिल्लांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. तो व्हिडिओदेखील असाच व्हायरल झाला. याचे कारण या व्हिडिओमध्ये ती वाघीण चक्क तिच्या पिल्लांना दरडावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे दोन नर वाघ आता मोठे झाले असल्यामुळे निसर्गनियमानुसार त्यांनी आईचा पदर सोडून स्वतःचे स्वतःच जगायला शिकणे आवश्‍यक होते. पण त्यांना त्यांच्या आईला सोडून जाण्याची इच्छा नव्हती आणि म्हणूनच वाघीण त्यांच्या अंगावर ओरडते आहे. खरे तर वाघ १८ महिन्यांचे झाल्यावर स्वतः शिकार करू शकतात. पण तरीही ते साधारण अडीच वर्षांचे होईपर्यंत आईबरोबर राहू शकतात, असे नंदा यांनी ट्विट केले होते. नंदा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अगदी काही तासांतच ११ हजारांहून अधिक व्ह्यूज व्हिडिओला मिळाले. या व्हिडिओमध्ये वाघांच्या डरकाळ्या अगदी स्पष्ट ऐकू येतात.  

हिमबिबट्याविषयी थोडेसे
आता मुळात हा प्रसंग दुर्मीळ का, हे समजून घ्यायला हवे. ‘किंग किंवा घोस्ट ऑफ द माउंटन’ म्हणून ओळखला जाणारा स्नो लेपर्ड हा प्राणीच आता दुर्मीळ होत चालला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) यांच्या लाल यादीमध्ये हिमबिबट्याची ‘एनडेंजर्ड’ म्हणजेच ‘असुरक्षित’ अशी नोंद आहे. थंड प्रदेश, बर्फाळ डोंगर हा त्याचा नैसर्गिक अधिवास. तोही आता धोक्यात आला आहे. त्याचा आकार साधारण ४ ते ५ फूट एवढा असतो. मध्य आशियातल्या पर्वतांमध्ये हा आढळतो. भारतात जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम, अरुणाचल प्रदेश इथे आढळतो.

संबंधित बातम्या