क्वाडेन, फक्त तुझ्यासाठी...!

इरावती बारसोडे
सोमवार, 2 मार्च 2020

ट्रेंडिंग
 

क्वाडेन बायल्स... वय वर्ष नऊ! ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँडमध्ये राहणाऱ्या या नऊ वर्षाच्या मुलाने असे कितीसे जग पाहिले असणार, पण तरीही शाळेमध्ये वारंवार होणाऱ्या दादागिरीमुळे तो त्याच्या आईला म्हणतो, की मला जगायचे नाही! त्या माउलीने तरी अशा वेळी काय करावे? त्याच्या आईने सोशल मीडियाची मदत घेतली आणि ही सारी घटना जगासमोर उघड केली... आणि नंतर सारे चित्रच पालटले.
 
क्वाडेन हा जन्मजात खुजा आहे, त्यामुळे शाळेमध्ये त्याच्यावर प्रचंड दादागिरी (bullying) होते, त्याला सतत त्याच्या उंचीवरून चिडवले जाते, नावे ठेवली जातात. या रोजच्या त्रासाला कंटाळून त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १८ फेब्रुवारी रोजी शाळेमध्ये क्वाडेनवर पुन्हा दादागिरी झाल्यानंतर त्याची आई याराका बायल्स हिने फेसबुक लाइव्ह व्हिडिओ तयार करून ही सर्व परिस्थिती लोकांसमोर मांडली. अशा प्रकारच्या दादागिरीमुळे किती विपरीत परिणाम होऊ शकतात, हेच तिला दाखवून द्यायचे होते; जागरूकता निर्माण करायची होती. साधारण सहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये क्वाडेन हमसाहमशी रडताना दिसतो आहे आणि म्हणतो आहे, ‘मला चाकू दे, मला मरायचे आहे.’ याराकाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे, ‘मी आत्ताच माझ्या मुलाला शाळेतून घेतले, पुन्हा एकदा त्याच्यावर झालेली दादागिरी पाहिली. मुख्याध्यापकांनाही कळवले आहे. मला पालक, शिक्षकांना हे सांगायचे आहे, की दादागिरीचे हे असे परिणाम होतात. त्यामुळे तुमची मुले, नातेवाईक, मित्रांमध्ये वेळीच जागरूकता निर्माण करा. टोमणे मारणे, चिडवणे असे रोज काहीना काही घडतेच आहे.’ याराका बायल्स वकील आहे. क्वाडेन ब्रिस्बेनच्या कारिना स्टेट स्कूलमध्ये शिकतो. 

क्वाडेनचा हा व्हिडिओ काही काळातच व्हायरल झाला. हा व्हिडिओ एक कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. #WeStandWithQuaden हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये होता. खूप जणांनी क्वाडेनला आपला पाठिंबा दर्शवत व्हिडिओ शेअर केला. #StopBullying या हॅशटॅगसह अनेक मुला-मुलींनी आपलेही अनुभव शेअर करत, क्वाडेन काळजी करू नकोस, आम्ही तुझे मित्र आहोत, बी स्ट्राँग; असा संदेश क्वाडेनला दिला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनीही हा व्हिडिओ शेअर करत आपला पाठिंबा दर्शविला आहे. ह्युग जॅकमन या हॉलिवूड अभिनेत्याने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे, ‘मित्रा, तुला वाटते त्यापेक्षा तू शूर आहेस.’ तसेच त्याने इतरांनाही ‘आयुष्य खडतर आहे. एकमेकांशी दयेने वागायला शिका,’ असे आवाहन केले आहे. बास्केटबॉल स्टार इनिस कॅन्टर याने, ‘जग तुमच्या पाठीशी आहे,’ असे ट्विट करत क्वाडेनच्या कुटुंबाला एनबीए गेम बघायला बोलावले. ऑस्ट्रेलियामधील वेगवेगळे क्रीडा संघही क्वाडेनला प्रोत्साहन देत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्प यानेही हा व्हिडिओ अतिशय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.

 अमेरिकेतला कॉमेडियन ब्रॅड विल्यम्स हादेखील खुजा आहे. त्याने क्वाडेनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला डिस्नेलँडला पाठवण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी एक पेज सुरू केले. दहा हजार अमेरिकन डॉलर्स निधी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण आता तब्बल तीन लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ४ लाख ५२ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा निधी जमा झाला आहे. विल्यम्स याने आपल्या पेजवर लिहिले आहे, ‘हे फक्त क्वाडेनसाठी नसून त्या सर्वांसाठी आहे, ज्यांना आयुष्यामध्ये दादागिरी सहन करावी लागली आहे. क्वाडेन आणि इतरांनाही हे दाखवून देऊ, की जगात चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या त्यांच्यासाठीही आहेत.’

जगभरातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे नंतर क्वाडेनचाही मूड छान झाला. शाळेतल्या घटनेमुळे जो दिवस त्याचा वैरी ठरला होता, नंतर तोच दिवस त्याच्या आयुष्यामध्ये प्रोत्साहन आणि आशा घेऊन आला. हे सगळे शक्य झाले ते फक्त सोशल मीडियामुळे! 

संबंधित बातम्या