मुख्यमंत्र्यांपासून विराटपर्यंत...

इरावती बारसोडे
सोमवार, 1 जून 2020

ट्रेंडिंग
सगळीकडे सतत कोरोनाचा जप सुरू असल्यामुळे जगात इतर काही घडतच नाहीये असे वाटत असले, तरी सोशल मीडियावर मात्र रोज नवनवीन गोष्टी व्हायरल होतात... अगदी मुख्यमंत्र्यांपासून मलेशियातल्या फॅमिली डान्सपर्यंत!

...सोबतीची तयारी आहे का? 
आता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच बघा ना! लोकांशी लाइव्ह संवाद साधताना ते एक वाक्य म्हणाले आणि ते पकडून महाराष्ट्रातील तमाम नेटिझन्सनी भन्नाट मीम्स तयार केले. हे वाक्य होते, ‘आमची तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची.. पण कोरोनाची तयारी आहे का, आम्हाला त्याच्यासोबत जगू द्यायची?’ 
या वाक्याचा आधार घेऊन राजकारणापासून गणितापर्यंत अनेक विषयांवर मीम्स तयार झाले. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील ७० रुपयांचा फेमस डायलॉग लक्षात असेलच. तो वारंवार मीमच्या रूपाने बाहेर काढला जातो. ही वेळही त्याला अपवाद नव्हती. धनंजय माने आपल्या घरमालक सरपोतदारांना विचारतात, ‘माझी तयारी आहे तुम्हाला सत्तर रुपये देण्याची.. पण सत्तर रुपयांची तयारी आहे का, तुमच्याकडे येण्याची?’ 
ही आणखी काही उदाहरणे पाहा - 
आमची तयारी आहे भेंड्या खेळायची.. पण भेंडीची तयारी आहे का, आमच्याबरोबर खेळायची? 
माझी तयारी आहे, सूर्योदयापूर्वी उठायची.. पण सूर्याची तयारी आहे का, मी उठल्यानंतर उगवण्याची? 
माझी इच्छा आहे, मला गणित यावे.. पण गणिताची इच्छा आहे का, मला ते यावे? 
हे किंवा यांसारखे फॉर्वडेड आणि स्वरचित मीम्स तुम्हालाही व्हॉट्सॲपवर आलेच असतील की! 

विराटचा डायनोसॉर वॉक 
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघे स्वतःचे आणि त्यांच्या फॅन्सचे मनोरंजन करत असतात. काही दिवसांपूर्वी अनुष्काने एक मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता आणि खाली लिहिले होते, ‘I spotted.. A dinosaur on loose.’ हा डायनोसॉर दुसरा-तिसरा कोणी नसून स्वतः विराट आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. एवढेच नव्हे तर विराटचा ‘डायनोसॉर वॉक’ नव्या मीम्ससाठी खाद्य देऊन गेला. ‘कोई मिल गया’ चित्रपटातील ‘इट्स मॅजिक, इट्स मॅजिग’ गाण्यातील ऋतिक रोशनची स्टेपही सेम अशीच आहे. त्यामुळे विराटलाही या गाण्यात बसवले आहे. ‘टॉय स्टोरी’ या ॲनिमेटेड हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टरमध्येही इतर खेळण्यांबरोबर ‘विराटोसॉरस रेक्स’ला बसवले आहे. ‘ज्युरासिक वर्ल्ड’ चित्रपटाचा टीझर पाहा, असे म्हणून तेथेही विराटचा डायनोसॉर दिसतो आहे. 
विराटचा हा ‘डायनोसॉर वॉक’ बघून नागपूर पोलिसांनाही रहावले नाही. त्यांनी अनुष्काला रिप्लाय करताना विचारले आहे, ‘महाराष्ट्र वनविभागाला रेस्क्यू टीम पाठवायला सांगू का?’ अनुष्काच्या भावानेही गमतीदार रिप्लाय करताना म्हटले आहे, ‘या लॉकडाउनमुळे सगळ्या प्रकारचे प्राणी बाहेर फिरू लागले आहेत.’

डान्सिंग फॅमिली 
सोमवारी सर्वत्र लॉकडाउनमधली ईद साजरी झाली. ईदनिमित्त एका मलेशियन कुटुंबाने केलेला डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ अदाम इमानुल्ला याने पोस्ट केला आहे आणि बरोबरच त्याने ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये तो, त्याची बहीण आणि आई-वडील हे सर्व ‘थिंक अबाऊट थिंग्ज’ या गाण्यावर तालबद्ध नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही पोस्ट करण्यात आला आहे. 
या व्हिडिओला साधारण २४ तासांत ७० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा रीट्विट करण्यात आला आहे. ‘थिंक अबाऊट थिंग्ज’ हा डान्स चॅलेंज टिकटॉकवर अतिशय लोकप्रिय असून या गाण्यावर सुमारे ५५ हजार व्हिडिओज तयार केल्या गेल्या आहेत. 

संबंधित बातम्या