छुटकीसाठी न्याय...?

इरावती बारसोडे
सोमवार, 15 जून 2020

ट्रेंडिंग
 

कार्टून हा खरे तर लहानग्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण गेल्या आठवड्यात ‘छोटा भीम’ हे कार्टून आणि त्यातील काही पात्रे ट्विटरवर ट्रेंडिंग होती. याचे कारण? यातल्या हिरो ‘छोटा भीम’ याने त्याची बालमैत्रीण ‘छुटकी’ऐवजी राजकुमारी इंदुमतीशी लग्न केले म्हणून. ट्विटरवर छुटकीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी होत होती. नंतर ही बातमी खोटी असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले. पण तोपर्यंत हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

‘छोटा भीम’ हे अतिशय प्रेमाने बघितले जाणारे कार्टून आहे. छोटा भीम आणि त्याच्या मित्रमंडळींची ढोलकपूर या गावामध्ये घडणारी ही गोष्ट आहे. या कार्टून मालिकेमध्ये छुटकी ही भीमची खूप जवळची मैत्रीण दाखवली आहे. तसेच भीमला आवडणारे लाडूही ती पुरवते, त्याला नेहमी पाठिंबा देते. असे असतानाही भीम तिच्याऐवजी राजकुमारी इंदुमतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतो म्हणजे काय? याच कारणामुळे आपले भारतीय नेटिझन्स या भीमवर फारच चिडले होते. ‘गोल्ड डिगर’, ‘प्ले बॉय’... अशा नावाने त्याला संबोधू लागले (हे एक लहान मुलांसाठीचे कार्टून आहे हे बहुधा लोक विसरले). भीम असे करूच कसे शकतो? छुटकीला न्याय मिळालाच पाहिजे... वगैरे वगैरे तीव्र भावना ट्विटरवर व्यक्त होऊ लागल्या. #JusticeforChutaki हा हॅशटॅगच ट्रेंडमध्ये होता. 

 या घटनेची अनेकांनी ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाशी तुलना केली. या सिनेमातही शहारूख खान काजोलला सोडून राणी मुखर्जीशी लग्न करतो आणि छोटा भीमही तेच करत आहे, असे अनेकांचे म्हणणे होते. अशा आशयाचे अनेक मीम्सही तयार झाले. तर, अनेकांना मुळात #JusticeforChutaki हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये का आहे, हेच कळेना. आज मी ट्विटर उघडले, #JusticeforChutaki ट्रेंडिंग होताना दिसले आणि मला खरेच चक्कर आली, असे ट्विट एका युजरने केले आहे. तसेच हा ट्रेंड बघून कोरोना व्हायरस आणि चक्रीवादळ म्हणतायत, ‘या लोकांचे इथे काहीतरी वेगळेच चालले आहे, मी नोकरी सोडतो,’ अशा आशयाचे मीम्सही अनेकांनी शेअर केले होते.

 हा ट्रेंड इतका व्हायरल झाला, की शेवटी ‘छोटा भीम’च्या निर्मात्यांना याची दखल घ्यावीच लागली. छोटा भीमने इंदुमतीशी लग्न केले, ही अफवा असल्याचे निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून स्पष्ट केले आहे. ग्रीन गोल्ड ॲनिमेशन यांच्यातर्फे ‘छोटा भीम’ची निर्मिती होते. ‘छोटा भीम, छुटकी, इंदुमती यांच्यासह मालिकेतील सर्व पात्रे अजून लहान मुले आहेत. छोटा भीम आणि इंदुमतीने लग्न केले ही व्हायरल बातमी खोटी असून यावर कॉमेंट करू नये असे आम्ही आवाहन करतो. आपल्या लाडक्या मुलांना मुलेच राहू देऊया आणि प्रेम व लग्न यांसारख्या गोष्टी त्यांच्या निरागस आयुष्यात आणायला नकोत,’ या शब्दांत ग्रीन गोल्ड ॲनिमेशनने याबाबत खुलासा केला आहे. 

 निर्मात्यांचे म्हणणे बरोबरच आहे. ही एक लहान मुले असलेली लहान मुलांसाठीचीच कार्टून मालिका आहे. आपल्याकडे सगळ्यांना लगेच ‘रिॲक्ट’ होण्याची फार घाई असते. तसाच काहीसा प्रकार याही बाबतीत घडला. #JusticeforChutaki मागणाऱ्यांपैकी किती जण खरेच हे कार्टून बघतात, याबाबत जरा साशंकताच आहे! 

संबंधित बातम्या