#सुशांतसिंग_राजपूत

इरावती बारसोडे
बुधवार, 1 जुलै 2020

ट्रेंडिंग

सुशांत गेला... जाता जाता सगळ्यांनाच हादरवून गेला. 

सोशल मीडियावर रोज नवीन गोष्ट ट्रेंडिंग असते. पण सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या सोशल मीडियावर अजूनही चर्चेचा विषय ठरत आहे. सुशांत गेल्यापासून त्याच्याशी संबंधित नवीन व्हिडिओज, नवीन बातम्या, नवीन आरोप आणि रोज नवीन चर्चा घडत आहे. हा अंक प्रसिद्ध होईल तेव्हा त्याला जाऊन दोन आठवडे झाले असतील, पण तरीही सुशांतला इंडस्ट्रीमध्ये कशी चुकीची वागणूक मिळाली याची चर्चा थांबलेली नसेल.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सुरुवातीला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली, सर्वांनी आपापले स्टेटस बदलले. नंतर चर्चा सुरू झाली, ती मानसिक आरोग्यावर, नैराश्‍यावर. नैराश्‍याने सुशांतचा बळी घेतला, तसा तो तुमचाही घेऊ शकतो. त्यामुळे मन मोकळे करा, अशा आशयाचे फॉरवर्ड्स येऊ लागले. हे सगळे मागे पडून आता चर्चा सुरू झाली, ती सुशांतला बॉलिवूडमध्ये मिळालेल्या दुय्यम वागणुकीची. शाहरुख खान, शाहीद कपूर यांसारख्या कलाकारांनी केलेल्या अपमानाच्या छोट्या छोट्या व्हिडिओज व्हायरल होऊ लागल्या. बॉलिवूडमधील ‘नेपोटिझम’ अर्थात ‘गटबाजी’ किंवा ‘घराणेशाही’ हा शब्द वारंवार ऐकू येऊ लागला, सोशल मीडियावरही त्याचा उल्लेख होऊ लागला. नैराश्‍यामुळे सुशांतने आत्महत्या केली आणि त्याला इंडस्ट्रीमधील बडे कलाकार जबाबदार असल्याचे सूर उमटू लागले. शाहरुख खान, सलमान खान, करण जोहर यांच्यासह अनेकांची नावे घेतली गेली. एवढेच नाही, तर एकता कपूर, करण जोहर, सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आली. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर गायक सोनू निगम यांनीही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना म्हटले, ‘आज सुशांत सिंग राजपूत मेला, एक अभिनेता मेला. उद्या तुम्हाला एखाद्या गायक, संगीतकार, गीतकाराबद्दलही अशीच बातमी ऐकायला मिळेल. कारण म्युझिक इंडस्ट्री ही फिल्म इंडस्ट्रीपेक्षा मोठी माफिया आहे.’ सोनू निगमचा हा व्हिडिओही व्हायरल झाला होता. 

अजूनही नेटिझन्सचा बड्या कलाकारांवरील रोष कमी झालेला नाही. #JusticeForSushantSinghRajput हा हॅशटॅग वापरून सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी ट्विटरवर होत असून यामध्ये अभिनेत्री कंगना राणावतचाही समावेश आहे. सोमवारी (२२ जून) ट्विटरवर #BoycottKhans हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. खानमंडळींबरोबरच महेश भट्ट, करण जोहर, आलिया भट यांनाही बॉयकॉट करा, असे अनेक ट्विटर युजर्सचे म्हणणे आहे. 

फिल्म इंडस्ट्रीमध्ये खानमंडळींचे अनेक वर्षे वर्चस्व राहिले आहे. शाहरुख खान, सलमान खान यांचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. या ट्रेंडनंतर शाहरुखच्या फॅन्सनी त्याला पाठिंबा देणारा नवीन ट्रेंड सुरू केला, #SupportSelfMadeSRK. ‘शाहरुखही स्वबळावर मोठा झाला आहे. राजकुमार राव, सुशांत, आयुष्मान खुराना या अभिनेत्यांनी शाहरुख खानमुळेच त्यांना प्रेरणा मिळाली असल्याचे म्हटले आहे,’ अशा शब्दांमध्ये शाहरुखचे फॅन्स त्याची बाजू घेत आहेत. तर, एका ट्विटर युजरने म्हटले आहे, की नेपोटिझममुळेच शाहरुखला स्वदेस चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. 

सुशांतसंबंधीच्या अनेक अफवाही व्हायरल होऊ लागल्या. सुशांतचा प्रिय कुत्रा फजलाही नेटिझन्सनी सोडले नाही. सुशांत गेल्यापासून फजने काहीही खाल्लेले नाही, असे बोलले जात होते. इथपर्यंत ठीक होते. पण नंतर सुशांतच्या आठवणीत हा कुत्राही मरण पावल्याच्या अफवा उठू लागल्या. सुशांतच्या जवळच्या व्यक्तींना फज आणि इतर कुत्र्यांना काहीही झाले नसून सगळे व्यवस्थित आहेत, असा खुलासा करावा लागला.     

संबंधित बातम्या