#फेसमास्क

इरावती बारसोडे
मंगळवार, 21 जुलै 2020

ट्रेंडिंग

पुण्याच्या मुली पूर्ण चेहरा झाकणारा स्कार्फ बांधतात म्हणून त्यांच्यावर खूप जोक झाले, थट्टा झाली. पण आता सगळ्यांनाच मास्कमध्ये तोंड झाकून घ्यावे लागत आहे. सध्या बाहेर पडताना मोबाइल, पाकीट आणि किल्ल्या घेतल्या का, याबरोबरच मास्क घातलाय ना हेही बघावे लागते. इतका तो आपल्या जीवनाचा आविभाज्य भाग झाला आहे. 

मास्कची अनिवार्यता एवढी वाढली आहे, की ज्वेलर्सही हिरेजडीत मास्क तयार करायला लागले आहेत. बातमी पाहिली असेलच तुम्ही. सुरत मधल्या दीपक चोस्की ज्वेलरने तब्बल चार लाख रुपयांचा हिरेजडीत मास्क तयार केला आहे. त्यासाठी एन-९५ मास्क वापरण्यात आला असून तो धुताही येतो. मास्क वापरून झाल्यानंतर त्या हिऱ्यांचा वापर दुसरा कोणतातारी दागिना तयार करण्यासाठी करता येईल, असे चोस्की यांचे म्हणणे आहे. हा पहिलाच एवढा महागडा मास्क नाही. पिंपरी-चिंचवडमधल्या शंकर कुराडे यांनीही जवळपास तीन लाखांचा सोन्याचा मास्क स्वतःसाठी करून घेतला होता. त्या मास्कला श्वास घेण्यासाठी बारीक छिद्रे असली, तरी त्याचा कितपत उपयोग होईल याबद्दल शंकाच आहे. 

तिकडे बिहारमध्ये हँड प्रिंटेड मास्क व्हायरल होत आहेत. रेमंत कुमार मिश्रा हे मधुबनी चित्रकार आहेत. त्यांनी रंगवलेले मास्क ट्विटरवर प्रचंड व्हायरल झाले असून त्यांना मास्कच्या भरपूर ऑर्डर्स मिळाल्या आहेत. अद्वैता काला यांनी ट्विटरवर मिश्रा यांनी तयार केलेल्या मास्कचे फोटो पोस्ट करून त्यांचा फोन नंबरही दिला आहे. लोकांना हे मास्क खूपच आवडले आणि त्यांनी मास्कच्या ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. त्यामुळे मिश्रा एवढे बिझी झाले की प्रत्येकाचा फोन उचलणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ट्विटरचाच आधार घेऊन मला थोडा वेळ द्या, मी फोन करेन असे सांगितले. रविना टंडणलाही मिश्रांचे मास्क आवडले असल्याचे ट्विट केले आहे. तुमच्यामुळे मला आणि माझ्या गावाला रोजगार मिळाला, असे ट्विट करत मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 

भारताप्रमाणेच बाहेरच्या देशातही मास्कमुळे देशाचे अध्यक्ष चर्चेचा विषय ठरत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प हे पहिल्यांदाच मास्क घालताना दिसले. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा लाखांच्या वर आहे. तिथे पॉझिटिव्ह रुग्ण खूप मोठ्या संख्येने आहेत आणि तरीही आत्तापर्यंत डोनाल्ड ट्रम्प मास्क वापरत नव्हते. ट्रम्प मिलिटरी मेडिकल सेंटरमधील कोरोना बाधितांना भेट देताना हा मास्क घातला होता. त्यामुळे त्यांना मास्क घातलेले बघून ट्विटरवर प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. अनेकांनी तुम्हाला जरा उशीरच झाला आहे, अशा आशयाचे ट्विट केले होते. तर, काहींच्या मते ट्रम्प यांनी मास्क घातला याची बातमी होते, हेच आश्चर्यकारक आहे. 

साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. टीव्हीवर लाइव्ह भाषण करताना त्यांनी मास्क घालण्याचा प्रयत्न केला पण तो काही केल्या त्यांना पटकन नीट घालता येईना. व्हिडिओमध्ये त्यांचा मास्क आधी डोळ्यांवर बसतो. नंतर एका कानावरून सुटतो. त्यांचा हा ‘मास्क मिसहॅप’ नवीन मीम्ससाठी निमित्त ठरला आणि #Ramaphosa या हॅशटॅगखाली अनेक मीम्स व्हायरल झाले. मी खूप दिवस हसलो नव्हतो, Thank you Mr. President, असे ट्विट एका युजरने केले. एवढेच नव्हे तर #CyrilMaskChallenge ही सुरू झाला, ज्यामध्ये आपला चुकीचा मास्क घातलेला फोटो शेअर करायचा होता. 

कोरोना सोशल मीडियावरही पसरलेला आहेच. त्यामुळे सोशल मीडियावरही #facemask #facemaskhomemade #protectivemask #homemademask #facemaskselfie #reusablemask #masksforsale #cottonmasks #cottonmask #fashionfacemask #facemasksforsale यांसारखे अनेक हॅशटॅग्ज वापरून पोस्ट्स शेअर केल्या जात आहेत.  

संबंधित बातम्या