चूकही व्हायरल होते तेव्हा...

इरावती बारसोडे
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

ट्रेंडिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेटिझन्सना मीम्स तयार करण्याची संधी वारंवार देत असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अर्थातच ते काही हे मुद्दाम करत नाहीत, पण नेटिझन्स काहीतरी शोधून काढतातच... मग ती स्पेलिंग मिस्टेक का असेना! 

सव्वीस जुलैला रविवारी, मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देशातील नागरिकांशी संवाद साधला. त्याआधी एक दिवस म्हणजे २५ जुलैला नेहमीप्रमाणे मोदींच्या ट्विटर हँडलवर त्या कार्यक्रमासंदर्भातील ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते, ‘Do tune in tonorrow, 26th July, 11 Am.’ हे ट्विट तुम्हीही चुकीचे वाचलेले नाहीत आणि मीही चुकीचे लिहिलेले नाही. या ओरिजिनल ट्विटमध्ये Tomorrow चे स्पेलिंग खरेच चुकले होते आणि ‘M’ च्या जागी ‘N’ लिहिला गेला होता. नंतर ही चूक सुधारण्यात आली, पण तोपर्यंत भरपूर मीम्स व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे #tonorrow हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये होता. काही नेत्यांनीही मोदींचे हे ट्विट न बघता कॉपी पेस्ट केल्यामुळे तेही या ‘मीम’करांच्या जाळ्यात अडकले. 

मोदींचे हे नवे ट्विट मीम्सचे माध्यम ठरू पाहत आहे, म्हटल्यावर त्यावरही एक मीम तयार करण्यात आले आहे. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटामध्ये एका दृश्‍यात मुन्ना जमीन साफ करणाऱ्या शिपायाला मिठी मारून म्हणतो, ‘तू बहोत मस्त काम करता है।’ मोदींनी असे काही ट्विट केले, की मीम्सर्स(मीम्स तयार करणारे)नाही असेच काहीसे वाटत असेल, अशा आशयाचे हे मीम होते.  

आपली उगाचच बेज्जती झाल्यामुळे M नाराज झालाय, अशा आशयाचेही अनेक मीम्स ट्विटरवर बघायला मिळत होते. जेम्स बाँडचा Tomorrow Never Dies नावाचा एक चित्रपट आहे. त्यावरूनही मीम तयार करण्यात आले. ‘बाँडचा चित्रपटः Tomorrow Never Dies आणि मोदींचा चित्रपटः Tomorrow Just Died.’  (बाँड पुस्तके आणि चित्रपट मालिकांमध्येही M नावाची व्यक्तिरेखा आहे; हा निव्वळ योगायोग!) 

‘हे ट्विट पाहून पाकिस्तानचे क्रिकेटपटू सर्फराज अहमद आणि उमर अकमल म्हणतायत,‘अरे ये तो अपनीवाली इंग्लिश है।’’ अशा आशयाचे मीम ट्विट करण्यात आले होते. चुकीच्या इंग्रजीबद्दल पाकिस्तानी क्रिकेटपटूंची आपल्याकडे नेहमीच खिल्ली उडवली जाते. मुळात पाकिस्तानशी संबंधित कुठलीच गोष्ट भारतीय ट्विटर युजर्स ‘लाइटली’ घेत नाहीत. गेल्या महिन्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचीही अशीच जबरदस्त खिल्ली उडवण्यात आली होती, कारण त्यांनी स्वतःच्या देशाचे नावच चुकीचे लिहिले होते. हो, देशाच्या नावातच स्पेलिंग मिस्टेक होती! ‘Pakiatan team leave for England,’ असे हे ट्विट होते. या ट्विटनंतर पुढे काय झाले असेल या कल्पना आपण सहज करू शकतो. नंतर एका तासाने ही चूक सुधारण्यात आली आणि एवढीशी चूक सुधारायला एक तास लागावा, यावरही ट्विट्स करण्यात आले होते.

थोडक्यात काय, सामान्यांच्या अशा छोट्या चुका कोणाच्या लक्षात येत नाहीत. पण ‘इन्फ्लुएन्शिएल’ व्यक्ती/संस्था/संघटनांनी ट्विट करायच्या आधी टाइप केलेला मजकूर वाचून बघितला नाही आणि अगदी छोटीशी जरी चूक झाली, तर मीमर्स आहेतच इतरांची करमणूक करायला!

संबंधित बातम्या