‘बिनोद’ ट्रेंड

इरावती बारसोडे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

ट्रेंडिंग

सोशल मीडियावर काय वाट्टेल ते ट्रेंडिग असू शकते, याचा प्रत्यय वारंवार येत असतो. एखादा फोटो, जोक, मीम्स व्हायरल होणे या आता कॉमन गोष्टी झाल्या! आता तर व्यक्तीचे नावही व्हायरल होऊ लागले आहे. सध्या सोशल मीडियावर बिनोद नाव फारच ट्रेंडिंग आहे. हे एका व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती कोण, कुठली कोणालाच माहीत नाही, पण तरीही हे नाव फेमस झाले आहे आणि त्या नावावर आधारीत असंख्य मीम्स व्हायरल झाले आहेत. 

यूट्युबवर ‘स्ले पॉइंट’ नावाचे एक चॅनल आहे. अभ्युदय आणि गौतमी यांचे हे चॅनल आहे. ‘बिनोद ट्रेंड’ सुरू होण्यामागे स्ले पॉइंटचा एक व्हिडिओ निमित्त ठरला. ‘Why Indian Comments Section is Garbage’ असे या व्हिडिओचे नाव आहे. या व्हिडिओमध्ये अभ्युदय आणि गौतमी, यूट्युब व्हिडिओजवर केल्या जाणाऱ्या अतिशय निरर्थक कॉमेंट्स संदर्भात बोलतात. लोक कशा प्रकारे काहीही कॉमेंट करतात, जसे की कॉमेंटमध्ये स्वतःचा फोन नंबर देणे किंवा स्वतःच्या कुटुंबाची नावे देणे, कविता पोस्ट करणे, अजिबात अर्थ लागणार नाही अशी रँडम अक्षरे, निरर्थक सल्ले इत्यादी इत्यादी... लोक कॉमेंटमध्ये स्वतःचेच नावही लिहितात. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच अशा कॉमेंटचा उल्लेख आहे; बिनोद थरू या व्यक्तीने ‘Binod’ एवढीच कॉमेंट केली आणि गंमत म्हणजे याला सात महाभागांनी लाइकही केले. नेटिझन्सचे याच ‘बिनोद’कडे चांगलेच लक्ष वेधले गेले आहे आणि त्यावरून भन्नाट मीम्स तयार झाले. 

बिनोद यूट्युबपुरता मर्यादित न राहता, सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्म्सवरही पसरला. एवढेच नव्हे, तर #Binod, #Binodmemes हे हॅशटॅगही टॉप ट्रेंडमध्ये होते. पेटीएमनेदेखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलचे नाव बदलून बिनोद केले आहे. एका ट्विटर युजरने पेटीएमला टॅग करत, ‘Can you change your name to Binod? Be a sport. C''mon.’ असे आव्हानच दिले आणि पेटीएमनेही ‘Done’ म्हणत खरेच आपले नाव बदलले. 

तर, मुंबई पोलीसही, ‘प्रिय बिनोद, तुमचे नाव हा तुमचा ऑनलाइन पासवर्ड नाही अशी आम्ही आशा करतो. ते व्हायरल झाले आहे. ताबडतोब बदला! #Onlinesafty,’ असे ट्विट करून या ट्रेंडमध्ये सहभागी झाले. तर नागपूर पोलिसांनी, ‘Dear #binod, we know you have gone very viral, But your safety is important. corona is more famous than you so stay home, stay safe.’ असे ट्विट केले आहे.

मार्व्हल स्टुडिओजच्या चित्रपटांमध्ये प्रमुख व्यक्तिरेखांचे काही लोकप्रिय संवाद आहेत, जसे की आयर्नमॅनचा ‘I am Iron Man’ किंवा ग्रूटचा ‘I am Groot’. मीमर्सनी या दोन्ही ठिकाणी आयर्नमॅन आणि ग्रूट काढून बिनोद टाकले आहे. सेक्रेड गेम्स या अति लोकप्रिय वेबसीरिजमधल्या गणेश गायतोंडेचा ‘चाँद पै हे अपुन’ असा एक फेमस डायलॉग आहे. बिनोदचे नाव ट्रेंडिंग असल्यामुळे त्यालाही आता असेच वाटत असेल, अशा अर्थाचेही अनेक मीम्स तयार झाले आहेत. हा बिनोद आहे तरी कोण, असा प्रश्‍न विचारणारे मीम्सही बरेच आहेत.

या सगळ्या व्हायरल प्रकारानंतर स्ले पॉइंटच्या यूट्युब अकाउंटवरची माहिती अपडेट करण्यात आली आहे. त्यामध्ये इतर माहितीबरोबर आता लिहिले आहे, ‘Founder of Binod. Hello Binod Army.’ 

संबंधित बातम्या