‘कॅप्टन कूल’ची निवृत्ती

इरावती बारसोडे
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

ट्रेंडिंग 

भारताच्या ‘कॅप्टन कूल’ने शनिवारी म्हणजे १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला निर्णय जाहीर केला. सुरेश रैनानेही त्याच वेळी आपली निवृत्ती जाहीर केली. पण महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या सगळ्यांचाच आवडता कर्णधार आणि क्रिकेटपटू! त्यामुळे साहजिकच धोनीच्या इन्स्टा पोस्टनंतर सोशल मीडियाही ‘माही’मय झाला. रैनाची निवृत्ती दुर्लक्षित राहिली असे नाही, पण माहीच्या निवृत्तीमुळे अनेकांच्या भावना उचंबळून आल्या. 

मै पल दो पल का शायर हूँ म्हणत धोनीने त्याचा क्रिकेटमधील आत्तापर्यंतचा प्रवास इन्स्टावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून मांडला आहे. धोनीने पोस्ट केलेल्या व्हिडिओला आत्तापर्यंत २९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर साडेसात लाखांहून अधिक कॉमेंट्स व्हिडिओवर करण्यात आल्या आहेत आहेत आणि अजूनही काही दिवस होत राहतील. पोस्टमध्ये धोनी त्याच्या चाहत्यांना त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल थँक्यू म्हणायला विसरलेला नाही.

धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर ट्विटरवर त्या दिवशी #Dhoni हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. व्हॉट्सअॅपवरही स्टेटसमध्ये धोनीच दिसत होता... आणि फेसबुकवरही त्याचीच जादू होती. प्रत्येक चाहत्याचे शब्द वेगळे होते, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती. मात्र, प्रत्येकाचे म्हणणे साधारण एकच होते... ‘तुझ्या खेळाने तू आम्हाला भरपूर आनंद दिला आहेस. भारताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेस. आम्हाला तुझा अभिमान आहे. आम्ही तुला कधीही विसरणार नाही. तुझे खूप आभार आणि तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.’

धोनीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआय, आयसीसी, ईएसपीएनक्रिकेट, मुंबई इंडियन्स यांनीही ट्विट केले आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनीही माहीच्या इन्स्टा पोस्टवर कॉमेंट्स केल्या आहेत किंवा धोनीला टॅग करून ट्विट केले आहे. अभिनेता रणवीर सिंग म्हणतो, ‘LOVE YOU MAHI BHAI. THANK YOU FOR MAKING US SO PROUD.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट केले आहे, ‘Well Played!’ असे म्हणून गडकरी पुढे म्हणतात, ‘तुझ्या खेळाने आणि नेतृत्वाने तू देशाचे नाव जागतिक क्रिकेटमध्ये उंचावर नेऊन ठेवलेस. प्रत्येक भारतीयाला तुझ्याबद्दल अभिमान आहे.’ त्याच्या पुढील इनिंग्जसाठी गडकरींनी शुभेच्छाही दिल्या आहेत. रितेश देशमुखने ट्विट केले आहे, ‘आमच्या हृदयातून तुला कधीच निवृत्ती मिळणार नाही.’ जसप्रीत बुमरा यानेही ट्विट केले आहे, ‘मैदानात आणि बाहेरही तू एक उत्तम मित्र आणि मार्गदर्शक होता. नुसते तुझ्याकडे बघून मी अनेक गोष्टी शिकलो आहे. तुझ्या व्यावसायिक प्रवासात मलाही सहभागी होता आले, याचा आनंद वाटतोय. तुझ्या नामांकित करिअरसाठी अभिनंदन आणि आठवणींसाठी धन्यवाद.’ तेजश्री प्रधाननेही, ‘Salute to your work’ अशी कॉमेंट केली आहे. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे, की लेजंड्स नेव्हर रिटायर’. भारताला २८ वर्षांनंतर विश्‍वकरंडक जिंकून देणारा हा ‘कॅप्टन कूल’ नेहमीच भारतीयांच्या आठवणींमध्ये राहील!

संबंधित बातम्या