ट्विट युद्धांचा अतिरेक होतोय...?

इरावती बारसोडे
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

ट्रेंडिंग

ट्विटरवर अनेकवेळा कोणाच्या तरी विरोधात आणि सपोर्टमध्ये ट्विट युद्ध सुरू असते. सध्या अभिनेत्री कंगना राणावत लेटेस्ट ट्विट युद्धाला निमित्त ठरली आहे. सोमवारी (ता. २४ ऑगस्ट) #झांसी_की_रानी_कंगना आणि #Boycott_Kangana हे दोन्ही हॅशटॅग अनुक्रमे एक आणि तीन क्रमांकावर ट्रेंडिंग होते. कंगना काय किंवा तिची बहीण रंगोली काय, दोघीही त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. 

कंगना सध्या सातत्याने मुव्ही माफिया आणि त्यांनी कशाप्रकारे तिचे आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक नुकसान केले याबाबत बोलत आहे. त्याच आशयाचे एक ट्विट तिने आठवडाभरापूर्वी केले होते. ती म्हणाली, ‘मी फक्त मुव्ही माफिया, त्यांचे अँटिनॅशनल आणि हिंदुफोबिक रॅकेट याविषयीच बोलते आहे, असे वाटेल. पण मला माहितीये इथे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, ते माझे अकाउंट सस्पेंड करू शकतात. माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखे खूप आहे आणि मी हा वेळ त्यांना एक्पोज करण्यासाठी वापरणार आहे.’ कंगनाची बहीण रंगोली हिचे ट्विटर अकाउंट वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल सस्पेंड करण्यात आले आहे. 

कंगनाच्या या ट्विटनंतर तिच्यावर भयंकर टीका झाली. तिला बॉयकॉट का करताय? ती तशीही बॉलिवूडमधून आपोआपच बॉयकॉट झालेली आहे. तिचे सलग सात सिनेमे फ्लॉप झाले आहेत, अशा आशयाचे ट्विट्सही अनेकांनी केले होते. #Boycott_Kangana हा हॅशटॅग ट्रेंड झाल्यावर, त्यावरही कंगनाने ट्विट केले होते. ती म्हणाली, ‘Wonderful #Boycott_Kangana trending, चूहे बिलों से बाहर आ रहे हैं, चलो थोड़ा हाथ पैर तो माफ़िया भी मारेगी।’ 

कंगनाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही कमी नाही. बॉयकॉट ट्रेंडनंतर अल्पावधीतच #झांसी_की_रानी_कंगना हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. I Support Kangana म्हणत अनेकांनी तिचे मनकर्णिका चित्रपटातील फोटो शेअर केले. तिला भारत की बेटीही म्हटले जाऊ लागले आहे. स्वतः कंगनाने टॉप ट्रेंड्सचा फोटो शेअर केला आणि हा हॅशटॅग ट्रेंडिंग करणाऱ्यांचे आभारही मानले आहेत. एका ट्विटमध्ये ती असेही म्हणाली आहे, की या ट्रेंडमुळे बाकीचे सगळे ‘फेक पेड’ ट्रेंड्स मागे पडले. प्रेम हे मिळवावे लागते, विकत घेता येत नाही याचाच हा दाखला आहे. मुव्ही माफियाला हे कळेल अशी आशा आहे. मला बॉयकॉट ट्रेंडची भीती वाटत नाही, जा काहीतरी दुसरे करा, असेही ती एका ट्विटमध्ये म्हणाली आहे. 

हा असा ट्रेंड हल्ली वारंवार दिसतो आहे. सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर खानमंडळींना बॉयकॉट करण्यात आले होते; अर्थातच फक्त ट्विटरवर! ट्विटरवर कोणीतरी सेलिब्रिटी काहीतरी मत व्यक्त करतो. मग कोणाला तरी ते आवडत नाही, मग ती व्यक्ती संबंधित सेलिब्रिटीच्या विरोधात #बॉयकॉटचा ट्रेंड सुरू करते. त्या सेलिब्रिटीवर टीका सुरू होते, मीम्स तयार केले जातात, त्या व्यक्तीला अक्कल शिकवली जाते (स्वतःची अक्कल आणि लायकी इथे बघायची नसते). मग हा बॉयकॉटचा ट्रेंड त्या सेलिब्रिटीच्या फॅन्समंडळींना आवडत नाही आणि ते #सपोर्टचा ट्रेंड सुरू करतात. तो सेलिब्रिटी कसा बरोबर आहे आणि आम्ही त्याला काहीही झाले तरी कसे सपोर्ट करतो, या आशयाचे ट्विट्स सुरू होतात. अतिरेक दोन्ही बाजूंकडून होतो हे विसरता कामा नये. एक-दोन दिवस हे ट्विट युद्ध सुरू राहते आणि मग विरून जाते. 

संबंधित बातम्या