पब्जी... कहीं गम, कहीं खुशी!
ट्रेंडिंग
केंद्र सरकारने आणखी ११८ चिनी ॲप्सवर बंदी आणली, त्यात पब्जी गेमचाही समावेश आहे. ‘प्लेयर्स अननोन बॅटल ग्राउंड’ अर्थात पब्जी हा गेम एकाच वेळी बदनामही आहे आणि लोकप्रियही. या खेळाचे व्यसन लागून आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याच वेळी पब्जी खेळणाऱ्यांचे प्रमाणही भरपूर आहे. अर्थात आता गेमच बॅन झाल्यामुळे ते शून्यावर येईलच. तर, या पब्जीवर भारतामध्ये बंदी आली आणि त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले नसते तरच नवल.
बंदीनंतर फेसबुक, ट्विटरवर विनोदी मीम्स व्हायरल होऊ लागले. ट्विटरवर तर #PUBG हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये होता. बहुतांश मीम्सचा विषय दुःखी प्लेयर्स आणि आनंदी पालक हाच होता. ‘आखिर वो दिन आ ही गयाँ’, ‘हम जित गयें’, ‘हे भगवान तेरी लीला अपरंपार है’, असे म्हणणारे पालक... आणि पब्जी बॅनची बातमी आल्यानंतर ‘अरे मुझे चक्कर आनें लगा है’, ‘मेरा लाइफ तो खराब हो गया’ म्हणणारे प्लेयर्स असे कितीतरी मीम्स पाहायला मिळत होते. पुस्तके प्लेयर्सना ‘ये बाळा, ये’ म्हणत अभ्यासाला घेऊन जात असल्याचे मीमही एका युजरने ट्विट केले होते.
काही ब्रँड्सनीसुद्धा आपापले मीम्स तयार केले होते. प्रत्येक मोठ्या घटनेवर आपल्या जाहिरातीमधून भाष्य करणाऱ्या अमूलचाही यामध्ये समावेश होता. ‘सब्जी? हाँ जी। पब्जी? ना जी!’ म्हणत अमूलने नवीन जाहिरात प्रसिद्ध केली. स्विगी, केएफसी, डाइनआउट, गो आय बिबो, पार्ले-जी, बिंगो स्नॅक्स अशा अनेकांनी पब्जी बॅनचा संदर्भ देत आपापली जाहिरात करून घेतली. टिंडर इंडियाने तर ‘आता तरी तो गेम्स खेळणं थांबवेल’ आणि ‘ठिके, आता आपण आपल्या डेटवर ल्युडो खेळू’ असे ट्विट्स करून जाहिरात केली आहे.
आता बॅन झाल्यानंतर पब्जी कसा प्रतिक्रिया देईल, असे मीम्स व्हायरल झाले होते. त्यामध्ये रणबिर कपूरचे ‘अच्छा चलता हूँ दुवाओं मे याद रखना,’ हे गाणे आता पब्जी म्हणतोय असेही एक मीम बघायला मिळाले.
पब्जी गेममध्ये बक्षीस जिंकण्यासाठी रॉयल पास खरेदी करता येतो, याला पैसे मोजावे लागत. त्यावरूनही मीम्स तयार करण्यात आले होते. रॉयल पास विकत घेण्यासाठी ज्यांनी पैसे खर्च केले, त्यांचा आता कसा पचका झाला आहे, अशा आशयाचे हे मीम्स होते. रॉयल पास विकत घेतलेल्यांना खूपच ‘पीडा’ होत असणार, त्यांच्या जखमेवर मी सध्या मीठ चोळतोय, असेही मीम्स होते.
गुरुवारी (४ सप्टेंबर) नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. ते लगेचच पुर्ववत करण्यात आले आणि या प्रकरणाची चौकशीही करण्यात येत आहे. मात्र मीमर्सनी ही संधी साधून मोदींचे अकाउंट हॅक झाल्यानंतर पब्जी प्लेयर्सना झालेला आनंद दाखविणारे मीम्स तयार केले.