कोरियन बँड आणि ‘चढती जवानी’

इरावती बारसोडे
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

ट्रेंडिंग

बीटीएसबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? ‘के-पॉप सेन्सेशन’ असलेला हा बीटीएस बँड सात कोरियन मुलांचा बँड आहे आणि विश्‍वास बसणार नाही इतके ते लोकप्रिय आहेत. आपल्याकडे कदाचित त्यांचे नाव फारसे ऐकले गेले नसावे. पण भारतातही त्यांच्या वेगळा चाहता वर्ग आहे. मात्र सध्या भारतामध्ये बीटीएस त्यांच्या गाण्यासाठी नाही, तर एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे त्यांचा ‘चढती जवानी’ या हिंदी गाण्यावरचा डान्स!

आता हा कोरियन बॉय बँड आपल्या हिंदीतल्या ‘चढती जवानी’वर का डान्स करायला लागला? तर त्याची गंमत अशी, की त्यांनी प्रत्यक्ष या गाण्यावर डान्स केलेला नाही, तर हा मॅशअप अर्थात एडिटेड व्हिडिओ आहे. म्हणजे त्यांचा डान्स वेगळ्याच गाण्यावर आहे. व्हिडिओ एडिट करताना तो ‘चलती जवानी’ या गाण्यावर एडिट करण्यात आला आहे. पण त्यांची कोरिओग्राफी या गाण्याच्या बिट्सबरोबर एकदम परफेक्ट मॅच झाली आहे, जणू काही त्यांनी या गाण्यासाठीच ही कोरिओग्राफी केलेली आहे. Qualiteaposts या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. याच इन्स्टा हँडलवर मै हूँ ना चित्रपटातील ‘तुमसे मिलके दिलका है जो हाल’ या गाण्याचाही एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे आणि त्या गाण्यावरही बीटीएस थिरकताना दिसते. ज्यांना बीटीएस माहीत नाही किंवा ज्यांनी कधीही त्यांचा ओरिजिनल डान्स, गाणी पाहिलेली नाहीत, त्यांना हे मॅशअपच ओरिजिनल वाटावे, अशा पद्धतीने दोन्ही व्हिडिओजमध्ये गाणे आणि डान्स ‘Sync’ झाले आहे.

खरे या दोन्ही एडिटेड व्हिडिओजमधला डान्स सिक्वेन्स त्यांच्या ‘डायनामाइट’ या गाण्याच्या डान्स प्रॅक्टिसचा आहे. ‘डायनामाइट’ हे बीटीएसचे पहिले पूर्ण इंग्रजी गाणे आहे. हे गाणे मागच्याच महिन्यामध्ये रीलिज झाले आहे. रीलिज झाल्याझाल्याच हे गाणे अमेरिकेच्या ‘बिलबोर्ड हॉट १००’ या टॉप गाण्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकवर होते. #BTS1onHot100 आणि #BTS_Dynamite हे हॅशटॅगही काही मिनिटांमध्ये ट्रेंडिंग होते. अमेरिकाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमामध्येही त्यांनी हे गाणे सादर केले होते.

याही आधी जून महिन्यामध्ये ‘चुनरी चुनरी’ या गाण्यावर बीटीएसचा मॅशअप व्हिडिओ करण्यात आला होता. filmforfare या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तेव्हाही हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

काय आहे बीटीएस?
वर म्हटल्याप्रमाणे, बीटीएस हा दक्षिण कोरियातील सात मुलांचा पॉप बँड आहे. के-पॉप हा दक्षिण कोरियातील लोकप्रिय पॉप म्युझिकचा प्रकार आहे. व्ही, जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन आणि जंगकूक हे या बँडचे सदस्य. कोरियाच्या बाहेरही त्यांची लोकप्रियता अफाट आहे. ट्विटरवर आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे जवळपास तीन कोटीच्या आसपास फॉलोअर्स आहेत. इतर कुठल्याही बँडप्रमाणे त्यांची गाणी ते स्वतः लिहितात, त्यांना संगीत देतात, स्वतःच गातात आणि स्वतःच कोरिओग्राफी करतात. बीटीएसने २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीला संबोधितही केले होते.

संबंधित बातम्या