द हिरो रॅट!

इरावती बारसोडे
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

ट्रेंडिंग

उंदीर म्हटले की बहुतांश वेळा ईSSS असा उद्‍गार निघतो. पण कंबोडियामधल्या एका उंदराचा त्याच्या शौर्याबद्दल खास सन्मान करण्यात आला आहे. होय, उंदराचा सन्मान आणि तेही त्याला सुवर्ण पदक देऊन! पण या उंदराने असे कोणते मोठे शौर्य गाजवले, म्हणून त्याचा सन्मान करावा? तर या उंदराने लँड माइन्स अर्थात भूसुरुंग शोधून काढण्यात मोठी कामगिरी बजावली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे हजारोंचे प्राण वाचले आहेत.

‘मागवा - द हिरो रॅट’ असे या उंदराचे नाव आहे. ‘HeroRAT’ हे त्याचे अधिकृत पद किंवा जॉब टायटल आहे. युनायटेड किंग्डममधील (यूके) पीपल्स डिस्पेन्सरी फॉर सिक ॲनिमल (पीडीएसए) या सेवाभावी संस्थेच्या महासंचालकांतर्फे मागवाला ‘सुवर्ण पदका’चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा अर्थातच ‘व्हर्चुअल’ पार पडला. पीडीएसए ही प्राण्यांसाठी काम करणारी सेवाभावी संस्था १९१७ मध्ये मारिया डिकिन यांनी स्थापन केली होती. ‘पीडीएसए सुवर्ण पदक’ २००२ पासून दिले जाते. प्राण्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आजतागायत ३० प्राण्यांना या पुरस्कार देण्यात आला असून आत्तापर्यंत फक्त कुत्र्यांना हे सुवर्ण पदक मिळाले आहे.

मागवा हा आफ्रिकन जायंट पाउच्ड या प्रजातीमधील उंदीर आहे. ही प्रजाती सर्वसामान्य उंदरापेक्षा मोठी असते. पण त्याचवेळी भूसुरुंगावरून हा उंदीर चालत गेला तरी तो फुटणार नाही, एवढा हलकाही हा उंदीर असतो. याला खास भूसुरुंगे शोधण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. अगदी लहान असल्यापासून टांझानियातील ओपोपो या सेवाभावी संस्थेने मागवाला भूसुरुंग शोधण्यासाठी तयार केले आहे.

कंबोडियामध्ये साधारण १९७० पासून जवळपास ६० लाख, किंबहुना त्याहून अधिक भूसुरुंगे लावण्यात आली आहेत. भूसुरुंग एखादा नसतो, तर ठराविक क्षेत्र अनेक भूसुरुंगांनी व्यापलेले असते आणि म्हणूनच त्यांना लँड माइन्स म्हणतात. त्यातील सुमारे ३० लाख म्हणजेच निम्मे भूसुरुंग अद्यापही सापडलेले नाहीत. भूसुरुंगांमुळे हजारोंच्या संख्येने लोकांनी प्राण गमावले आहेत. पीडीएसएच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, ६४ हजार लोकांचा जीव गेला आहे. तर, ४० हजार लोकांनी अवयव गमावले आहेत. 

मागवाला हेच भूसुरुंग शोधण्यासाठी खास प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून हेच काम करतो आहे. त्याच्या कामाचा वेग अफाट आहे. तो टेनिस कोर्टाएवढी जमीन फक्त ३० मिनिटांमध्ये हुंगतो आणि भूसुरुंग शोधतो. त्याची वास येण्याची क्षमता तीक्ष्ण असते आणि कमी वजनामुळे भूसुरुंग न फोडता तो सहज इकडे-तिकडे फिरू शकतो. याच दोन गुणधर्मांमुळे तो भूसुरुंग शोधण्यात पटाईत आहे. भूसुरुंगातील रसायनांचा वास तो नेमका टिपतो आणि त्याच्या हँडलर्सना सूचना देतो. त्यामुळे भूसुरुंग निकामी करणे सोपे जाते. मागवाने आत्तापर्यंत ३९ लँड माइन्स आणि २८ न फुटलेली आयुधे शोधली आहेत. १,४१,००० चौरस मीटर जमीन सुरक्षित करण्यात मागवाचा मोठा वाटा आहे. 

मागवा आता आठ वर्षांचा होईल. पण निवृत्त होईपर्यंत तो हे काम करतच राहील आणि एकदा निवृत्त झाला की फक्त आरामच आराम...!

संबंधित बातम्या