व्हायरल वधू-वर

इरावती बारसोडे
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

ट्रेंडिंग

भारतीय लग्न म्हटले, की डोळ्यासमोर एक ठराविक चित्र उभे राहते; भरगच्च विधी, शेकडो-हजारो पाहुणे, अनेक दिवस चालणारे वेगवेगळे समारंभ, पारंपरिक पेहरावातले वधू-वर! आता त्यात भर पडली आहे, प्री आणि पोस्ट-वेडिंग फोटोशूटची. हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. त्यांच्याशी अजिबातच काहीही संबंध नसतो, तरीही लोक त्या फोटोंवर रिॲक्ट होत राहतात आणि मग ते व्हायरल होतात. असेच व्हायरल झालेले हे वधू-वर...

पँटसूटवाली वधू
सर्वसामान्य भारतीय वधूचा पोषाख ठरलेला असतो; साडी किंवा लेहेंगा, त्यातही भर लाल रंगावर. पण काही दिवसांपूर्वी एका वधूने तिच्या पोषाख निवडीवरून धम्माल उडवून दिली, इतकी की एका आंतरराष्ट्रीय माध्यमाने तिच्यावर एक लेखही लिहिला. 
संजना रिशी असे या वधूचे नाव. तिने तिच्या लग्नामध्ये फिक्कट निळ्या रंगाचा पँटसूट घातला होता. त्यावर साजेसे दागिने आणि डोक्यावर ओढणीही घेतली होती. संजनाने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. बहुतांश जणांनी तिचे कौतुक केले असले, तरी काही जणांनी तिच्यावर भरपूर टीकाही केली. कारण, लग्नामध्ये वधूने साडी किंवा लेहेंगा न घालता पँटसूट घालणे ही कल्पनाच काहींच्या पचनी पडलेली नाही. 
संजना रिशीच्या फोटोवर कॉमेंट करताना एका इन्स्टा युजरने म्हटले आहे, की प्रत्येक ठिकाणी एक ड्रेसकोड ठरलेला असतो. उद्या कोणीही उठून आवडतो म्हणून ऑफिसमध्ये लेहेंगा घालून येईल. असे कसे चालेल? यावर संजनाने रिप्लाय करताना म्हटले आहे, ‘हे माझे लग्न आहे. इथे काय घालायचे काय नाही हे मी ठरवणार.’ बरोबरच आहे! अनेक इन्स्टा युजर्सनी संजनाला पाठिंबा देत त्या युजरची कानउघाडणी केली आहे. 

बोल्ड फोटोशूट
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केरळमधील एक नवविवाहित दाम्पत्य असेच चर्चेच आले होते. त्यांनी केलेल्या पोस्ट-वेडिंग शूटमुळे त्यांना जबरदस्त ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. केरळमधल्या चहाच्या मळ्यामध्ये अंगाभोवती पांढऱ्या चादरी गुंडाळून बोल्ड फोटोशूट करण्यात आले. इतके बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या या दोघांना धाडसीच म्हणावे लागेल. फोटोंना घाणेरडे, अश्लील, लाजिरवाणे म्हणण्यापासून चादरीच्या आतमध्ये कपडे घातले आहेत का, इथपर्यंतचे ट्रोलिंग झाले. नातेवाइकांनीही ही आपली संस्कृती आहे का? असे प्रश्‍न विचारायला सुरुवात केली. या सगळ्यामध्ये मुलापेक्षा त्या मुलीवर जास्त टीका झाली. 
इतके भयानक ट्रोलिंग होऊनसुद्धा दोघांनी अजूनही फोटो सोशल मीडियावरून काढलेले नाहीत. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे फोटो काढणार नाही या मतावर दोघे नवरा-बायको ठाम आहेत. सुरुवातीला ट्रोलिंग करणाऱ्यांची संख्या अधिक होती. नंतर हळूहळू लोक दाम्पत्याच्या बाजूनेही बोलायला लागले. 

स्वतःच्या लग्नात कोणी काय घालावे, हे भलत्यानेच सांगणे बरोबर आहे का? इतके ‘पर्सनल’ किंवा ‘इंटिमेट’ फोटो सोशल मीडियावर पोस्ट करावेत का? आणि केले तरी अख्ख्या जगाला दाखवावेत का? हे सगळेच चर्चेचे मुद्दे होऊ शकतात.   
--------------------------

संबंधित बातम्या