कशासाठी? प्रेमासाठी! 

इरावती बारसोडे
सोमवार, 7 डिसेंबर 2020

ट्रेंडिंग

कोरोना व्हायरसमुळे सगळ्यांनाच विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे; सध्याच्या काळात तुम्हाला तुमच्या माणसांची काळजी असेल तर त्यांच्यापासून लांब राहावे लागते आहे. अशा परिस्थिती आपल्या प्रिय पत्नीसाठी ‘सेरनेडिंग’ करणाऱ्या एक इटालियन आजोबांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकून घेतली. सेरनेडिंग म्हणजे आपल्या घरातील प्रेयसीसाठी बाहेरून एखाद्या वाद्यावर प्रेमगीत वाजवणे किंवा म्हणणे! दुर्दैवाने या ‘ज्येष्ठ’ प्रियकराची प्रेयसी त्याला आता सोडून गेली आहे. 

स्टेफानो बेझोनी, वय ८१ वर्षे. यांच्या पत्नी कार्ला साची, वय ७४ या इटलीमधील एका रुग्णालयामध्ये ॲडमिट होत्या. त्यांना ॲडमिट करण्यात आलेले रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करित नाही. परंतु, रुग्णालयात बाहेरून कोरोना व्हायरस येऊ नये यासाठी बाहेरच्या लोकांना आत येण्यास मनाई आहे. रुग्णालयाच्या या नियमांमुळे बेझोनी यांना आपल्या बायकोला भेटता येईना. तिला एकटे वाटू नये, म्हणून मग त्यांनी रुग्णालयाची परवानगी घेऊन खिडकीखाली रस्त्यावर बैठक मारली ॲकॉर्डियनवर प्रेमगीते वाजवायला सुरुवात केली. कार्लाचे सगळ्यात आवडते गाणे असलेल्या ‘स्पॅनिश आइज’ या गाण्याने त्यांनी सुरुवात केली आणि कार्लाच्या आवडीचीच गाणी वाजवत राहिले. 

त्यांचा मुलगा मउरिझिओ याने वडिलांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. अल्पावधितच हा व्हिडिओ व्हायरल झाला. एका स्टुलावर बसलेले, लाल स्वेटर, डोक्यावर पिस असलेली टोपी आणि तोंडावर मास्क घातलेले बेझोनी ॲकॉर्डियनबरोबर पायाने ताल धरताना व्हिडिओमध्ये दिसतात. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून त्यांची पत्नी आणि आणखी दोन रुग्ण खाली पाहताना दिसतात. व्हिडिओच्या शेवटी बेझोनी आपल्या पत्नीकडे पाहून हात हलवताना दिसतात. 

बोझोनी यांनी द गार्डियनबरोबर बोलताना सांगितले, ‘मी जे काही केले ते कार्लासाठी केले. मला तिला रुग्णालयामध्ये जाऊन भेटता येत नव्हते. म्हणून मी माझे ॲकॉर्डियन घेतले आणि कोर्टयार्डमध्ये गेलो. माझ्या मनाने मला असे करण्यास सांगितले. तिने गाणे ऐकले आणि खिडकीतून बाहेर पाहिले, त्यामुळे मला तिला बघता तरी आले. 

रुग्णालयाने कार्ला यांना घरी सोडले, पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्या दहा दिवस रुग्णालयामध्ये कर्करोगाशी लढत होत्या. एएनएसए या इटालियन न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, १९७३ मध्ये दोघांचे लग्न झाले. बेझोनी हे इटालियन आर्मीच्या अल्पिनी माउंटन इन्फर्टीचे सदस्य होते. विशीमध्ये असताना या दोघांची भेट झाली होती. त्यांनी तीन मुलांना जन्म दिला, परंतु त्यांचा सर्वात तरुण मुलगा मार्को वयाच्या २५व्या वर्षी कर्करोगामुळे या जगातून निघून गेला. बेझोनी त्यांच्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी, पार्ट्यांमध्ये ॲकॉर्डियन वाजवत असत. त्यांच्या स्वतःच्या लग्नामध्येही त्यांना ॲकॉर्डियन वाजवण्याचा आग्रह करण्यात आला होता. पण त्यांना फक्त कार्लाबरोबर नृत्य करायचे होते, म्हणून त्यांनी हाताला दुखापत झाल्याचे नाटक केले होते, अशी आठवण ते सांगतात. 

संबंधित बातम्या