हॅपिली ‘ऑटरली’ आफ्टर...

इरावती बारसोडे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

ट्रेंडिंग

दीर्घकाळाचा जोडीदार जेव्हा सोडून जातो, तेव्हा मागे राहिलेल्याला एकटेपणा जाणवणे स्वाभाविकच आहे. मग तो माणूस असो वा ऑटर (पाणमांजर)! हो, ऑटरलाही जाणवतो एकटेपणा... आणि जोडीदार मिळाला की एकटेपणा संपतोही! याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंडमधले हॅरिस नावाचा नर आणि पम्पकिन नावाची मादी हे जोडपे. विशेष म्हणजे हे दोघे लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन डेटिंगच्या माध्यमातून एकमेकांना भेटले.

दहा वर्षांचा हॅरिस ऑटर इंग्लंडमधल्या कॉर्नवेल येथील कॉर्निश सील सँक्च्युअरी येथे राहत होता. हॅरिस २०१६ मध्ये कॉर्निश सील सँक्च्युअरीमध्ये आला. त्याची जोडीदार, १६ वर्षांची ॲप्रिकॉट नुकतीच गेली. त्यानंतर हॅरिसला एकटे वाटू लागले. अॅप्रिकॉट चार वर्षे त्याची जोडीदार होती. अॅप्रिकॉटसाठी तो अगदी योग्य जोडीदार होता, असे अभयारण्याच्या प्रमुख टमारा कूपर सांगतात. ऑटर्स नेहमी जोडीने राहतात. त्यामुळे ती गेल्यानंतर तो एकटा पडला. 

त्यासाठीच हॅरिससाठी जोडीदार म्हणून, त्याच्यासारखीच एकटी पडलेली मादी शोधण्यासाठी अभयारण्यातील टीमने ‘फिशिंग फॉर लव्ह’ ही खास डेटिंग साइट तयार केली. त्याच्यासाठी डेटिंग प्रोफाइलही तयार केली. छानसा फोटो पोस्ट केला आणि त्यात म्हटले होते, ‘I am very attentive, I love a cuddle, and I am a very good listener, I will love you like no otter.’ 

सुदैवाने अभयारण्याच्या या प्रयत्नांना यश आले आणि हॅरिससाठी जोडीदार मिळाली. पम्पकिन असे तिचे नाव. पम्पकिन सी लाइफ स्कारबरो अभयारण्यामध्ये राहते. तिनेही तिच्या एरिक नावाच्या जोडीदाराला नुकतेच गमवले होते. एरिक वयाने मोठा होता. तो गेल्यानंतर तिलाही एकटे वाटत होते. त्यामुळे अभयारण्यातील लोक तिच्यासाठी जोडीदार शोधतच होते. तेव्हा त्यांना फिशिंग फॉर लव्ह वेबसाइटवर हॅरिसची प्रोफाइल सापडली आणि त्यांना तो तिच्यासाठी ‘Significant otter’ वाटला. काही व्हॉट्सअॅप मेसेजेस आणि फोटो शेअरिंगनंतर हॅरिस आणि पम्पकिन ‘ऑटरली अमेझिंग मॅच’ आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आणि दोघांना एकत्र आणण्यावर दोन्ही अभयारण्यांचे एकमत झाले.  

दोन्ही ऑटर्सना एकत्र आणणे तसे आव्हानात्मक होते. नराला मादीच्या अधिवासामध्ये सोडले, तर तो पटकन तिला शरण जातो. त्यामुळे दोन्ही अभयारण्यांनी हॅरिसला पम्पकिनच्या अधिवासामध्ये आणण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोघांना एकांत देण्यात आला. त्यांच्यासाठी काही डेट्सही प्लॅन केल्या होत्या. अखेर आता हॅरिस त्याच्या नवीन घरात आणि नवीन जोडीदाराबरोबर रुळला आहे. पण अजूनही तो कॉर्निश सील सँक्च्युअरीमधल्या आपल्या कुटुंबाशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्कात असतो. 

संबंधित बातम्या