व्होग, हॅरिस आणि नेटिझन्स

इरावती बारसोडे
सोमवार, 18 जानेवारी 2021

ट्रेंडिंग

‘व्होग’ मॅगझीनच्या फेब्रुवारीच्या अंकाचे मुखपृष्ठ आत्ताच चर्चेत आले आहे. फॅशन मॅगझीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर अमेरिकेच्या नियोजित उपाध्यक्षा कमला हॅरिस झळकणार आहेत. ‘मॅडम व्हाइस प्रेसिडेंट’ असे लिहिलेले कमला हॅरिस यांचे दोन फोटो असलेली दोन मुखपृष्ठे व्होगने ट्विट केली आहेत. पण त्यांना अपेक्षित परिणामांपेक्षा काहीसे उलटच चित्र दिसते आहे. हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर आल्यापासून त्यातील एका फोटोवर फक्त टीकाच होते आहे. 

टायलर मिचल नावाच्या फोटोग्राफरने मुखपृष्ठासाठीचे दोन्ही फोटो काढले आहेत. व्होगने ट्विट केलेल्या एका फोटोमध्ये कमला हॅरिस यांचा काहीसा ‘कॅज्युअल’ लुक पाहायला मिळतो. त्यांनी स्लॅक्स, ब्लेझर घातला आहे. पायामध्ये स्नीकर्स आहेत. मागे हिरव्या बँकग्राउंडवर गुलाबी रंगाचा पडदा आहे. हिरवा आणि गुलाबी रंग हॅरिस यांच्या अल्फा कॅपा अल्फा या कॉलेज सरॉसिटीचे रंग आहेत. म्हणून ते रंग या फोटोसाठी वापरण्यात आले. 

पण आता ‘अमेरिकेच्या नियोजित उपाध्यक्ष’ असलेल्या व्यक्तीचा असा फोटो मॅगझीनने मुखपृष्ठावर का छापला आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. खराब लाइटिंग, खराब पोज, खराब बॅकड्रॉप असा हा फोटो असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच हा फोटो एडिट करताना हॅरिस यांना उगाचच ‘गोरे’ केले असल्याचा आरोप व्होगवर होत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, व्होगने असे काहीही केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण तरीही नेटिझन्सचे समाधान झाले नाही. 

‘हा अतिशय खराब फोटो आहे,’ अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया ट्विटरवर पाहायला मिळाल्या. ‘मी हॅरिस यांचा माझ्या कॅमेऱ्याने माझ्याच बागेत सूर्यप्रकाशात फोटो काढला, तरी तो यापेक्षा चांगला येईल अशी माझी खात्री आहे,’ असे एका युजरने म्हटले आहे. एका युजरने स्वतःच्या फोनमध्ये सेव्ह केलेले चार फोटो पोस्ट करून म्हटले आहे, ‘हे फोटोसुद्धा व्होगच्या कव्हरपेक्षा चांगले आहेत.’ हा फोटो म्हणजे देशाच्या नियोजित उपाध्यक्ष्या असलेला हॅरिस यांचा अनादर करण्यासारखे आहे, असे तर अनेकांचे म्हणणे आहे. 

व्होगने ट्विट केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये हाताची घडी घालून उभ्या असलेल्या हॅरिस आकाशी रंगाच्या पॉवर सूटमध्ये दिसतात. या फोटोमध्ये सोनेरी पिवळसर बॅकड्रॉप आहे. हाच फोटो मुखपृष्ठावर घ्यावा, यावर मॅगझीन आणि हॅरिस यांच्या टीमचे एकमत झाले होते. मात्र हॅरिस यांच्या टीमला न सांगताच व्होगने मुखपृष्ठ बदलले, असे सांगण्यात येत आहे. तसेच गुलाबी पडदा असलेला फोटो आतमध्ये वापरण्यात येणार होता. 

आता मुखपृष्ठावर नेमका कोणता फोटो वापरला जाईल, हे आता मॅगझीन प्रसिद्ध झाले कीच कळेल!

संबंधित बातम्या