टायटॅनिकचा पर्यायी शेवट

इरावती बारसोडे
सोमवार, 1 मार्च 2021

ट्रेंडिंग

‘टायटॅनिक’ चित्रपट ही एक गाजलेली दुःखद प्रेमकहाणी. मागच्या आठवड्यामध्ये एका ट्विटर युजरने टायटॅनिक चित्रपटाचे ‘अल्टरनेट एंडिग’ अर्थात एक पर्यायी शेवट ट्विट केला आणि पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे, कारण नेटिझन्सना हा पर्यायी शेवट अजिबातच आवडलेला नाही. 

टायटॅनिक सिनेमा १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. जेम्स कॅमरून यांचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती असलेला हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. केट विन्सलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रिओ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भयंकर गाजला. चित्रपटाची गोष्ट सर्वपरिचित आहे. चित्रपटाच्या शेवटी रोज एकटीच जहाजाच्या काठावर येते. जहाजाच्या कठड्यावर उभी राहून ती ‘हार्ट ऑफ द ओशन’चा नेकलेस हळूच पाण्यात सोडून देते आणि नंतर शांत झोपेतच ती जगाचा निरोप घेते, असा या चित्रपटाचा शेवट आहे. पण आता सोशल मीडियावर जो पर्यायी शेवट फिरतो आहे, त्या व्हिडिओमध्ये रोज सर्वांना ‘हार्ट ऑफ द ओशन’चे नेकलेस दाखवते, लव्हेटच्या हातातही देते आणि म्हणते, ‘मि. लव्हेट तुम्ही खजिना चुकीच्या जागी शोधता. आयुष्य बहुमोल आहे आणि प्रत्येक दिवस अमूल्य आहे.’ एवढे म्हणून ती मूळ कथेप्रमाणे नेकलेस समुद्रात सोडून देते. लव्हेटच्या साथीदारांना मोठा धक्का बसतो, पण हे दोघे एकमेकांकडे बघून जोरजोरात हसतात. या व्हिडिओला लाखांमध्ये व्ह्यूज मिळाले असून अजूनही आकडा वाढतो आहे. 

विशेष म्हणजे हा पर्यायी शेवट काही वर्षांपासून इंटरनेटच्या महाजालावर अस्तित्वात आहे. टायटॅनिक अल्टरनेट एंडिंग म्हणून सर्च केला तर लगेच सापडेलही. पण आता पुन्हा एकदा तो ट्विट झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा घडत आहे. ‘हा शेवट किती हास्यास्पद आहे. मूळ चित्रपटाचा शेवट वेगळा आहे, तेच बरे,’ असाच अनेकांचा सूर आहे. ज्याने हा व्हिडिओ ट्विट केला, त्याचे म्हणणे आहे, की हा पर्यायी शेवट फारच हास्यास्पद आहे. चित्रपटाचा असा शेवट असता, तर मला हा चित्रपट आवडला नसता. 

‘हा शेवट टायटॅनिक चित्रपटाला बुडवणारा हिमनग ठरला असता,’ असे एका युजरने म्हटले आहे (टायटॅनिक जहाज हिमनगाला धडकल्यामुळे बुडाले होते). मूळ ट्विटला रिप्लाय करताना एका युजरने म्हटले आहे, की हे नेकलेस समुद्राच्या तळापर्यंत जाऊन जॅकच्या हाडांच्या सापळ्याच्या गळ्यात पडले नाही, हे नशीब समजा! आणखी एका युजरने म्हटले आहे, ‘एका व्हेल माशाने नेकलेस गिळला असे दाखवायला हवे होते. म्हणजे सिक्वेलमध्ये त्यांना व्हेल माशाच्या शोध दाखवता आला असता.’ 

चित्रपटाचा शेवट जर असा झाला असता, तर एवढे ऑस्कर पुरस्कार मिळाले असते का? अशीही काहींना शंका आली आहे (चित्रपटाला ११ ऑस्कर मिळाले आहेत).  मुद्दा काय, तर नेटिझन्सच्या मते चित्रपटाचा मूळ शेवटच योग्य होता!

संबंधित बातम्या