छोट्यांची गाणी आणि सामोसे

इरावती बारसोडे
रविवार, 7 जून 2020

ट्रेंडिंग
गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या कारणांमुळे ऑस्ट्रेलिया संबंधातील घटनांची सोशल मीडियावर चर्चा होती. दोन अतिशय भिन्न घटना, ज्यांचा परस्परांशी खरे तर काहीही संबंध नाही. संबंध एवढाच, की त्या खास भारतीयांना इंटरेस्ट वाटेल अशा होत्या. पहिला ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे छोट्या मंजेश्‍वर ब्रदर्सची देसी गाणी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी तयार केलेले सामोसे.

मंजेश्‍वर ब्रदर्सची धूम
‘हाल कैसा है जनाब का,’ म्हणत ते दोघे सोशल मीडियावर अवतरले आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाले, एवढे की आता त्यांचे स्वतःचे यूट्युब चॅनल आहे. 
ही गोष्ट आहे अर्जुन आणि अर्णव मंजेश्वर या दोघा भावांची. मोठा अर्जून आठ वर्षांचा आणि अर्णव चार वर्षांचा आहे. हे दोघे सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे कारण म्हणजे त्यांनी म्हटलेली गाणी. या दोघा भावांचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न इथला. त्यामुळे त्यांना फारसे मराठी किंवा हिंदी येत नाही. पण लॉकडाउनच्या काळात घरबसल्या त्यांनी मिळून म्हटलेल्या गाण्याचा व्हिडिओ त्यांचे वडील अमेय यांनी फेसबुकवर पोस्ट केला. लॉकडाउनमधील अक्टिव्हिटी म्हणून पोस्ट केलेला हा व्हिडिओ नंतर सोशल मीडिया सेन्सेशन ठरेल असे त्यांना खचितच वाटले नव्हते. 'हाल कैसा है जनाब का' या गाण्यानंतर 'गोरे गोरे ओ बाँके छोरे', 'चला जाता हूँ', 'होले होले साजना' ही हिंदी गाणी आणि 'आकाशी झेप घे रे पाखरा' आणि 'रुपेरी वाळूत माडाच्या बनात' ही मराठी गाणी म्हटली आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये अर्जुन आणि अर्णव दोघेही गाणे म्हणतात आणि मधल्या म्युझिकवर जागच्या जागी थिरकतातही.

रुपेरी वाळूत गाण्याच्या व्हिडिओला सगळ्यात जास्त म्हणजेच जवळपास ९५ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. आता मंजेश्वर ब्रदर्स या नावाचे त्यांचे यूट्युब चॅनेलही आहे. तिथे त्यांनी आत्तापर्यंत म्हटलेली सर्व गाणी पाहायला मिळतील. अर्जुन, अर्णवचे पालक त्यांना इंग्रजी स्क्रीप्टमध्ये ही गाणी देतात. मग हे दोघे प्रॅक्टिस करून गाणी म्हणतात आणि अमेय त्यांच्या फोनवर रेकॉर्ड करतात. अर्जुन संगिताचे प्राथमिक शिक्षण घेतो आहे. अर्णव मात्र आपल्या मोठ्या भावाचे बघूनच गाणे म्हणतो.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे सामोसे
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस यांनी रविवारी त्यांचे पाककौशल्य आजमावले. आपल्या भारतीयांचे आवडते सामोसे त्यांनी तयार केले होते आणि सामोशांबरोबर खाण्यासाठी आंब्याची चटणीसुद्धा केली होती. एवढे करून ते थांबले नाहीत. त्यांनी त्या सामोशांना ‘स्कोमोसाज’ असे खास नाव दिले आहे. मॉरिस यांनी सामोशांनी भरलेल्या प्लेटचा आणि स्वतःचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. मॉरिस यांनी ट्विट करताना म्हटले आहे, की त्यांचे सामोसे आणि चटणी ‘मेड फ्रॉम स्क्रॅच’ आहेत. म्हणजे या दोन्ही पदार्थांसाठी लागणारे सर्व काही त्यांनी स्वतः तयार केले आहे. 
पोस्टमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे. त्यांना टॅग करताना म्हटले आहे, ‘या आठवड्यात माझी नरेंद्र मोदींबरोबर व्हिडिओ लिंकद्वारे मीटिंग झाली, याचे मला वाईट वाटते. ते शाकाहारी आहेत, मला त्यांच्याबरोबर हे सामोसे शेअर करायला आवडले असते.’ 
मोदींनीही मॉरिस यांच्या पोस्टला रिप्लाय केला आहे. ‘Connected by the Indian Ocean, united by the Indian Samosa!’ असे म्हणत मोदी पुढे लिहितात, ‘सामोसे स्वादिष्ट दिसत आहेत. एकदा का आपण कोविड-१९ वर विजय मिळवला, की आपण मिळून सामोशांची मजा घेऊ.’

संबंधित बातम्या