मुंबई पोलिसांची ‘रोसेश’ स्टाइल

इरावती बारसोडे
सोमवार, 27 एप्रिल 2020

ट्रेंडिंग
 

मोनिषा बेटा, फ्लॅटन द कर्व्ह बोलो ऑर से ब्रेक द चेन. धिस गो करोना, करोना गो साऊंड्स कॅटॅगरिकली मिडलक्लास...

हे वाक्य कोण कोणास म्हणाले हे जाणकारांना वेगळे सांगायची गरज नाही. कालच कोणाचे तरी व्हॉट्सअॅप स्टेटस बघितले... त्यात हे मीम होते, माया साराभाई स्पेशल! साराभाई vs साराभाई या मालिकेतील ही व्यक्तिरेखा. 

हे मीम पाहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी केलेले एक ‘रोसेश साराभाई’ स्टाइल ट्विट आठवले. मुळात लोकांनी घरी बसावे यासाठी पोलीस बिचारे काय काय क्लृप्त्या करत आहेत... आधी बांबूचे फटके देऊन झाले, मग लोकांकडून व्यायाम करून घेतला, लोकांची आरतीही केली... सोशल मीडियावर तर सातत्याने लोकांनी घरी बसावे यासाठी विविध पोस्ट्स पोलीस शेअर करत आहेत. त्यातलेच हे एक ट्विट. 

मुंबई पोलिसांनी १४ एप्रिल रोजी रोसेश साराभाई या साराभाई vs साराभाई या लोकप्रिय मालिकेमधील व्यक्तिरेखेचा वापर करून एक ट्विट केले होते. रोसेश साराभाई ही व्यक्तिरेखा त्याच्या ‘जगात भारी’ कवितांसाठी फारच लोकप्रिय झाली होती. त्याच्या त्या स्टाइलमध्येच मुंबई पोलिसांनी हे ट्विट केले होते -
शेव्हिंग के लिये क्रीम से बेटर है फोम
शेव्हिंग के लिये क्रीम से बेटर है फोम
ड्युरिंग द लॉकडाऊन प्लिज स्टे अॅट होम

आणि पुढे #LockdownLessons #TakingOnCorona.

याच ट्विटमध्ये आणखी चार फोटो शेअर करण्यात आले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये कोरोनाविषयक जागृती करणाऱ्या रोसेश साराभाई स्टाइल कविता आहेत, त्यातली ही आणखी एका पाहा.. 
ऑरेंज का ज्युस, बनाना का शेक
मोनिषा भाभी बर्न्स व्हॉटएव्हर शी बेक्स
ऑरेंज का ज्युस, बनाना का शेक
मॉमा रिपोर्ट्स एव्हरी न्यूज शी फाइंड्स फेक

याशिवाय उरलेल्या तीन मीम्समध्ये हात धुण्याचे महत्त्व, सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व आणि खोकताना व शिंकताना तोंडावर हात ठेवला पाहिजे... हे महत्त्वाचे संदेश पोलिसांनी दिले आहेत. हे संदेश रोसेशच्या कवितांच्या स्टाइलमध्ये असल्यामुळे वेगळीच गंमत येते. हे संपूर्ण ट्विटच मजेशीर असल्यामुळे ट्विटर युजर्सनीही ते उचलून धरले. खूप जणांनी या क्रिएटिव्हीबद्दल मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. कोणी म्हणाले, मी लॉकडाऊन संपल्यानंतर तुमच्याकडे येऊन हे ब्रँडिंग स्किल शिकणार आहे. तर एकाने ट्विट केले, ‘Every station in Mumbai has 1 East & West. Let everyone in the world know ‘Apali Mumbai Police is the best.’ पोलिसांनी रिप्लायसुद्धा कवितांच्या माध्यमातूनच केला आहे... ‘हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात. कोरोनाची होईल लागण, सर्व जण राहा घरात.’ आणि `टू स्टे हायड्रेटेड मॉमा ड्रिंक्स अ लॉट ऑफ पानी, मुंबईकर घर पे रेहने के लिये शुक्रिया मेहरबानी.’

काहींनी तर या कविता रोसेशच्या स्टाइलमध्ये मनातल्या मनात म्हणूनही पाहिल्या असतील. पण त्याची गरज नाही, कारण स्वतः रोसेशने त्या म्हटल्या आहेत आणि आपल्या ट्विटरवर पोस्ट केल्या आहेत. रोसेश साराभाई ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता राजेश कुमार याने या कविता रोसेश स्टाइलमध्ये म्हणून ट्विटर अकाउंटवर पोस्ट केल्या आहेत... आणि हो, शेवटी तो व्हूपीSSSS म्हणायला विसरला नाहीये.

रोसेश, माया, साहिल, मोनिषा आणि इंद्रवर्धन साराभाई या सगळ्याच व्यक्तिरेखा विशेष होत्या. २००४ ते २००६ या कालावधित प्रसारित झालेल्या या मालिकेचा आजही तेवढाच चाहता वर्ग आहे. मालिकेचा दुसरा सीझनही हॉटस्टारवर पाहायला मिळेल (पहिलाही आहेच). आजही या ना त्या कारणाने अधूनमधून मालिकेवर आधारित मीम्स येत असतातच. 

संबंधित बातम्या