आर्मी प्रिंटची क्रेझ

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

ट्रेंड्‌स
 

फॅशन जगतात रोज नवनवीन ट्रेंड येत असतात. कपड्यांपासून ते त्यांचा रंग, कट्‌स, आणि प्रिंटसुद्धा. मुलींसाठी अर्थातच यामध्ये पुष्कळ व्हरायटी असते, परंतु मुलांच्या पेहरावातही प्रचंड व्हरायटी आता आलेली दिसते. यामध्ये आर्मी प्रिंटची भर पडणार आहे. आर्मी प्रिंटच्या पँट्‌स जास्त लोकप्रिय होत्या, पण आता त्यात जॅकेट्‌स, शर्ट, टी-शर्ट असे प्रकारही पाहायला मिळतात. या ट्रेंडविषयी. 

     कॅमोफ्लाज किंवा कॅमो प्रिंट हे सहसा आर्मी युनिफॉर्ममध्ये वापरले जाते असा समज आहे. यात आपला दोष नाही, कारण आपण तसे प्रिंट आर्मीवाल्यांच्या युनिफॉर्ममध्ये पाहिलेले असतात. परंतु आता कॅमो प्रिंट ट्रेंण्डमध्ये आहे. काँन्फिडंण्ट, टफ लुक देण्यास कॅमो प्रिंट अतिशय योग्य आहे. कॅमो प्रिंट दिसायला साधे असले, तरी ते कॅरी करणे सोपं नाही. लेदर शूज किंवा सॅण्डल्स, डार्क गॉगल आणि हे कॅमो प्रिंट हे सर्वांनाच शोभून दिसतीलच असे नाही.

     पेहरावाच्या बाबतीत असे ठोकताळे नसतात. प्रत्येकाची रंगांची आवड, व्यक्तिमत्त्व, बांधा इत्यादी गोष्टींवर कपड्याची निवड निश्‍चित होते. या प्रिंटची फॅशनदेखील बॉलिवूड प्रेरित आहे. हृतिक रोशनने एक आगळंवेगळं कॉम्बिनेशन वापरून पसंती मिळविली होती. त्याने फ्लोरल शर्ट आणि कॅमो जॅकेट आणि पॅन्ट हे कॉम्बिनेशन केले होते. खूप प्रभावीपणे कॅरी केले.

     फॅशन फॉलोअर्सना फ्लोरल आणि कॅमोचे कॉम्बीनेशन दुर्मिळच होते; पण त्यामुळेच ते अनोखे ठरले. एका रिॲलिटी शोमध्ये गायिका शाल्मली खोलगडे कॅमो जंपसूटमध्ये दिसली. तिचा स्लिव्हलेस फ्रंट झिप कॅमो जम्पसूट एकदम बोल्ड लुक देऊन गेला. तिचा सडपातळ बांधा, उंची, हेअरस्टाइल, सॅण्डल्स हे सगळंच कॅमो जम्पसूटला शोभणारे होते. 

     कॅमो प्रिंट हे काळ्या-करड्या, हिरव्या, पिवळसर, निळ्या अशा रंगसंगतीत असतात. या प्रिंटमध्ये कार्गो पॅन्ट, शॉर्टस, केप्री, शर्ट, टी-शर्ट, 
जॅकेट, शूज शोभून  दिसतात. कॅज्युअल डे आउटिंग, ट्रेक, जंगल सफारी इत्यादीसाठी कॅमो प्रिंट पेहराव उत्तम पर्याय आहे. कॅमो प्रिंटेड कार्गो, कॅप्री, जॅकेट वापरत असाल तर प्लेन काळा टी-शर्ट, टॅन्क टॉप हे कॉम्बिनेशन सुटसुटीत दिसते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या