स्टायलिश हिवाळा

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

ट्रेंड्‌स
थंडीच्या दिवसात, शरीराचा प्रत्येक भाग झाकण्यासाठी आपण काळजी घेत असतो. त्यामुळे विंटर शॉपिंग गरजेचे असते. या विंटर शॉपिंग करताना थोडे हटके वूलन वेअर घेतले, तर तुम्हाला या सीझनमध्येही स्टायलिश राहण्यास मदत होईल. अर्थातच मुलींसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत...

नव्या प्रकारचे पोंचू
महिलांना हिवाळ्यात पोंचू हा पॅटर्न जास्त आवडतो. हा दिसायला जितका स्मार्ट तितकाच वापरायला देखील कंफर्टेबल असतो. या पोंचूमध्ये व्ही नेक, गोल नेक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. टेसल लुक हा त्याचा पारंपरिक प्रकार आहे. कमी थंडीत हे पोंचू छान आणि कंफर्टेबल ठरतात.

जीन्सबरोबर लांब श्रग
सध्या मोठ्या उंचीच्या श्रगची फॅशन आहे. हे श्रग वापरून ऊब आणि स्टाइल या दोन्ही गोष्टी आपण थंडीमध्ये सहज साधू शकतो. जीन्सवर लॉंग विंटर शूज आणि त्यावर हे श्रग उठून दिसतात. यामध्ये नी लेन्थचे श्रग्जही लोकप्रिय आहेत. यात स्ट्रिप्स असलेले पोलो नेकचे लॉंग श्रग्ज विशेष उठून दिसतात.

फ्रंट ओपन स्वेटर
सर्वसाधारणपणे जे स्वेटर वापरले जातात, त्यापेक्षा हे थोडे वेगळे आहेत. फ्रंट ओपन स्वेटर हे थोडे लांब आणि समोरच्या बाजूने लेअरिंग केलेले असतात. यामध्ये शक्‍यतो प्लेन डिझाईनची जास्त चलती आहे. हे वजनाला हलके असले, तरी उबदार असतात. स्कीन टाईट जीन्स किंवा फॉर्मल वेअरवर हे स्वेटर उठून दिसतात.

रॅप स्वेटर
रॅप स्वेटर सध्या ट्रेंडमध्ये आहे. हे स्वेटर व्ही नेकचे असल्यास छान दिसतात. मुख्य म्हणजे इतर कोणत्याही स्वेटरच्या प्रकारापेक्षा हे दिसायला एकदम स्टायलिश असतात. हा पॅटर्न म्हणजे स्वेटर, कार्डिगन आणि पुलोवरचे मिक्‍स कॉम्बिनेशन आहे. हा पॅटर्न आपण कोणत्याही प्रसंगी आणि वेस्टर्न आऊटफिटवरही सहज घालू शकतो.

फॉल श्रग 
हे श्रग्ज अगदी नेहमीच्या श्रगसारखेच असतात, परंतु यातली डिझाईन्स अतिशय वेगळी असतात. यालाच ‘फॉल श्रग’ किंवा ‘प्लेटेड श्रग्ज’ असेही म्हणतात. दिसायला मागून प्लेन दिसतात, पण समोरून थोडे फोल्ड झालेले असतात. हा पॅटर्न इतर सीझनमध्येही दिसतो, पण वेगळ्या कापडांमध्ये असतो. सध्या हाच प्रकार विंटर स्पेशल म्हणून मॉडर्न प्रिंटमध्ये अधिक उबदार होऊन आला आहे. 
या विंटर सीझनमध्ये स्टायलिश आणि उबदार राहायचे असल्यास हे प्रकार जरूर ट्राय करावेत. 

संबंधित बातम्या