क्‍यूट टियारा आणि हेअर स्टड्‌स

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

ट्रेंड्‌स
 

सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये गॅदरिंग सुरू आहेत. तर दुसरीकडे लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मुलगी आपण कसे आकर्षक दिसू यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी कपड्यांपासून ॲक्‍सेसरीज पर्यंत सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जाते, यामध्ये केशरचनेला विशेष महत्त्व मुलींकडून दिले जाते. केशरचना आकर्षक व्हावी यासाठी बाजारात विविध ॲक्‍सेसरीज उपलब्ध आहेत. यात सध्या क्‍यूट टियारा आणि हेअर स्टड्‌सचा ट्रेंड आहे. 
     सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने पारंपरिक पेहराव करताना तरुणी दिसतात. लग्न, सणवार, रिसेप्शन, महाविद्यालयातील ‘डे’ज यानिमित्ताने पेहरावाला साजेशी केशरचना केली जाते. मात्र ती खुलविण्यासाठी वेगवेगळ्या फुलांचा आधार घेतला जाण्याची फॅशन सध्या मागे पडली असली तरी अजूनही काही  थोड्या फार प्रमाणात मुली ही फॅशन फॉलो करताना दिसतात. 

     लग्न कार्यात नववधू सह दोन्ही बाजूच्या करवल्या देखील नटून थटून वावरत असतात. इतर वेळी मोकळे केस सोडणाऱ्या मुली अशावेळी बन हेअर स्टाईलला प्राधान्य देतात. पण पूर्वीच्या आणि आताच्या केशरचनेत फरक इतकाच आहे, की पूर्वी केसांचा अंबाडा घालून त्यावर पूर्णपणे भरगच्च केसांचे आच्छादन केले जायचे, आणि सध्या नाजूक कृत्रिम फुलांच्या स्टड्‌सचा वापर करून केसांचा हलका-फुलका बन केला जातो. 

     वेगवेगळ्या प्रकाराचे हेअरबन करून त्यावर बाजारात आलेल्या हेअर पिन्स, बन पिन्स, टियारा, रिबन, पर्ल, स्टड्‌स, झुमर, कृत्रिम बन, गोल्ड स्ट्रिंग यांचा वापर करून केशरचना सजविली जाते. 

     नुकत्याच सरत्या वर्षात दीपिकाचे लग्न चर्चेत राहिले. तिने लग्नाच्यावेळी दाक्षिणात्य स्टाईलला प्राधान्य दिले आणि बन या केशरचनेवर दाक्षिणात्य हेअर ॲक्‍सेसरीज घातल्या. त्यामुळे तुमचे केस लहान किंवा मोठे कसेही असले तरी बन हेअरस्टाइलवर तुम्ही कोणत्या हेअर ॲक्‍सेसरीज लावता त्यावर केशरचनेचे सौंदर्य अवलंबून असते. 

     नववधू म्हणून ही केशरचना करताना हेवी वर्कच्या हेअरपिन्स, झूमर, वेलवेट बेस पिन्सचा, डायमंड आणि पर्ल हेअर ॲक्‍सेसरीजचा वापर करावा. साइड बॅन करून डायमंड क्‍लिपचा देखील त्यामध्ये वापर करू शकता. करवली म्हणून हेअरस्टाइल करणार असाल तेव्हा नाजूक फुलांच्या स्टड्‌सचा,टियाराचा वापर करू शकता. 

     मोकळ्या केसांची केशरचना करताना पार्लची चेन लावून ती खुलवावी. संगीत, हळदी सारख्या समारंभांना मेटॅलिक हेअरबॅन्ड, किंवा प्रिन्सचा वापर करावा. 

     सध्या बाजारात गोल्डन, प्लॅटिनम, डायमंड, सिल्व्हर मध्ये वेगवेगळ्या आकाराच्या डिजायनार फ्लोरल ज्वेलरी ॲक्‍सेसरीज आल्या आहेत. या तुमच्या बन हेअरस्टाइलला लावून ती आणखी आकर्षक करू शकता. 

संबंधित बातम्या