’व्हेजिटेबल कार्व्हिंग’
शुक्रवार, 16 मार्च 2018
ट्रेंड्स
सध्या हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंगच्या व्यवसायामुळे ‘व्हेजिटेबल कार्व्हिंग’चा नावीन्यपूर्ण ट्रेंड मोठ्या प्रमाणात रुळत आहे. हा ट्रेंड आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत येऊन पोहोचला आहे.
भारतीय संस्कृतीत रांगोळीला प्रचंड महत्त्व आहे. प्रत्येक शुभप्रसंगी रांगोळी काढली जाते. अगदी देवघरातल्या रांगोळीपासून ते ताटाभोवती रेखाटायच्या रांगोळीपर्यंत सर्व प्रकार अगदी हौसेने काढले जातात. रांगोळीच्या प्रकारांमध्ये आता खूप नवनव्या गोष्टींची भर पडत आहे. सध्या हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंगच्या व्यवसायामुळे ‘व्हेजिटेबल कार्व्हिंग’चा नावीन्यपूर्ण ट्रेंड मोठ्या प्रमाणात रुळत आहे. हा ट्रेंड आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत येऊन पोहोचला आहे.
- कोणत्याही शुभ प्रसंगी जेवणाच्या पंक्तीला ताटाभोवती रांगोळी काढणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. बदलत्या काळानुसार पंक्तीची जागा जरी बफेने घेतली तशी ताटाभोवतीची रांगोळी गायब होऊ लागली असली तरी पारंपरिक सण-समारंभात ही परंपरा जपली जाते.
- पुण्यातील ऊर्मिला पाटणकर यांनी ही परंपरा जपण्याचा आधुनिक पद्धतीने प्रयत्न केला आहे. भाज्यांवर सुरेख कोरीव काम करून रांगोळी म्हणून ती पानाभोवती ठेवली जाते.
- पुण्यातल्या ऊर्मिला पाटणकर गेली आठ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध फळे आणि भाज्या वापरून पूर्णपणे शाकाहारी अशी रांगोळी काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. ही रांगोळी अतिशय सुरेख दिसते. गंमत म्हणजे नंतर ती खाता येते.
- व्यवसायाने फॅशन डिझायनर असणा-या ऊर्मिला यांनी कार्व्हिंगचे व्यवस्थित प्रशिक्षण घेतले आहे. या रांगोळीतली ही फुले टोमॅटो, गाजर,मुळा,काकडी यांसारख्या भाज्यांमध्ये कोरणे हे थोडे किचकट काम असते. हळूहळू सरावाने ते सोपे होते.
- घरगुती लहान मोठे कार्यक्रम,केळवणे,लग्न प्रसंगी पाहुण्यांना खूष करण्याची ही आणखी एक संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. शिवाय ही रांगोळी पर्यावरणपूरक देखील आहे. प्रत्यक्ष रांगोळीची किंमत ही त्याच्या मागणीनुसार बदलते. यावर्षी एखाद्या घरगुती कार्यक्रमात अशी रांगोळी नक्की ट्राय करावी.