सिंपल, बट स्टायलिश...

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ट्रेंड्‌स
बऱ्याचजणींना साधा पोषाख करायला आवडतो, पण त्याचवेळी आपण स्टायलिशही दिसावे, असेही कुठेतरी वाटत असते. मग साधेपणा आणि स्टाइल यांचा मेळ घालायचा कसा? खूप फॅशनेबल नाही, पण सोबर लुकसाठी सध्या बाजारात अशी बरीच आउटफिट्स, पादत्राणे आणि ॲक्सेसरीज आल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही हा मेळ नक्की घालू शकता.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मौनी रॉयचा पिंक लेहंगा तरुणींच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय तुम्हाला अनारकली ड्रेस हादेखील चांगला पर्याय आहे. करिश्मा कपूरसारखा ब्रोकेड अनारकली सूट आणि त्यावर काँट्रास्ट कलरची ओढणी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता.

सिंपल लुकसाठी लेमन कलरच्या चिकन वर्क असलेल्या अनारकलीनेदेखील तुमचा गेटअप उठावदार करू शकता. तुम्हाला फ्लोरल प्रिंटचे पलाझो आणि कुर्ते किंवा अनारकलीदेखील सिंपल लुक मिळवून देऊ शकतात.

साध्या पण परफेक्ट लुकसाठी कपड्यांबरोबर पादत्राणेदेखील आवश्यक असतात. त्यामुळे त्यांची निवडदेखील महत्त्वाची ठरते. सध्या पंजाबी जुती आणि स्टायलिश कलरफुल कोल्हापुरी लोकप्रिय होत आहेत. यामुळे तुम्हाला कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही गोष्टी मिळतात. तुम्ही कोल्हापुरी चप्पल एथनिक आणि वेस्टर्न आऊटफिटवरदेखील सहज वापरू शकता.  

ज्वेलरीमध्ये महत्त्वाच्या असतात त्या इयरिंग्ज. याशिवाय तुमचा पारंपरिक आणि वेस्टर्न कोणताही लुक पूर्ण होत नाही. इतर कोणतीही ज्वेलरी घातली नाही, तरी इयरिंग्ज अनिवार्य आहेत. कारण, त्यामुळे तुमचा लुक चेंज होतो. बाजारात सध्या नावीन्यपूर्ण डिझाइन्सच्या इयरिंग्ज उपलब्ध आहेतच, पण फॅशन म्हटले तर सध्या ‘क्लासी स्टड्स’ सिंपल आणि क्युट लुक देतात. या स्टड्सची क्रेझ सामान्य तरुणींपासून बॉलिवूडमधील अभिनेत्रींनादेखील आहे.  

एखाद्या पार्टी किंवा खास समारंभाला जाताना तरुणी आवरून झाल्यावर सुंदर हेअर स्टाइलदेखील करतात. हे करताना एक परिपूर्ण लुक मिळविण्यासाठी मोत्याच्या छोट्या छोट्या हेअर ॲक्सेसरीज जरूर वापराव्यात. यामुळे तुमचा लुक आणखी उठावदार दिसतो.   

संबंधित बातम्या