हॅण्डमेड फूटवेअर्स

समृद्धी धायगुडे
सोमवार, 11 मार्च 2019

ट्रेंड्‌स
सध्या बऱ्याच तरुणी सस्टेनेबल लाईफस्टाईलला प्राधान्य देताना दिसतात. यामध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांपासून कपडे, ॲक्‍सेसरीज अशा सर्व वस्तूंचा समावेश होतो. आता उन्हाळ्याची चाहूल लागल्याने, त्या दृष्टीने आपला पेहराव आणि सगळ्याच गोष्टींत बदल केला जातो. यामध्ये फुटवेअर्स हा खूप छोटा भाग आहे, पण याकडेदेखील तरुणी हल्ली बारकाईने लक्ष देताना दिसतात. आज आपण हॅण्डमेड फूटवेअर्सच्या ट्रेंडविषयी माहिती घेऊ... 

तुमच्या पेहरावावरून तसेच तुमच्या राहणीमानावरून तुमचे व्यक्तिमत्त्व ठरते. एखाद्या नव्या व्यक्तीला तुम्ही भेटता, तेव्हा त्या व्यक्तीचे तुमच्या सर्व गोष्टींकडे लक्ष जाते. यामध्ये पादत्राणे हादेखील एक महत्त्वाचा भाग आहे. पादत्राणांवरूनही तुमची आवडनिवड, स्टाइल याचा अंदाज येतो. 

 • प्रत्येक पादत्राणाचा अंदाज, फिटिंग, स्टाइल वेगवेगळी असते. तुमच्या पेहरावातील प्रत्येक ॲक्‍सेसरीजची निवड फार महत्त्वाची असते. 
 • पादत्राणांचा मुख्य हेतू जमिनीवरील माती आणि चिखलापासून पायाचे संरक्षण हा आहे, तर दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे स्टाइल! पण सगळीच पादत्राणे सर्व प्रकारच्या पेहरावावर उठून दिसतातच असे नाही. 
 • एथनिक, वेस्टर्न, कंटेम्पररी पेहरावावर पादत्राणे निवडताना विशेष काळजी घ्यावी, कारण एक चुकीची निवड तुमचा पेहराव बिघडवू शकते.
 • सध्या बाजारात असे काही नामांकित ब्रॅंड आहेत, ज्यांनी मुलींच्या प्रत्येक पेहरावासाठी हॅण्डमेड पादत्राणे डिझाईन केली आहेत.
 • कदाचित तुम्हाला असे वाटू शकते, की हॅण्डमेड म्हटल्यावर डिझायनर आणि स्टायलिश पादत्राणांची व्हरायटी कमी असेल, पण असे नाही. 
 • प्रत्येक तरुणीला तिच्या पेहराव निवडीच्या स्वातंत्र्याप्रमाणे पादत्राणांच्या निवडीचे स्वातंत्र्यदेखील हॅण्डमेड फुटवेअर्समध्ये मिळते.
 • हॅण्डमेडमध्ये हायहिल्स, फ्लॅट, कोल्हापुरी, शूज, ज्युती, वेजेस, पेन्सिल आणि ब्लॉक हिल्स, ऑक्‍सफर्ड शूज, बॅलेरिना, स्लाईडर्स, स्टड्‌स, अँकल बूट असे वैविध्यपूर्ण प्रकार उपलब्ध आहेत. 
 • हॅण्डमेड पादत्राणे एम्ब्रॉयडरी, ब्रोकेड, फॅब्रिक, प्रिंट, कलमकारी, ब्लॉक प्रिंट, जरीकाम अशा वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असल्याने ती आपल्या पेहरावाच्या जास्त जवळ जाणारी आहेत. 
 • तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणांची आवड असेल, तर हा प्रकार जरूर तुमच्या कलेक्‍शनमध्ये ठेवा.
 • अगदी युनिक फुटवेअरसाठी तोडा एम्ब्रॉयडरी, इकत वेव्हज, कांथा एम्ब्रॉयडरी याशिवाय डेनिमची देखील पादत्राणे ऑनलाइन बाजारात तसेच आपल्या जवळच्या हॅण्डमेड वस्तू प्रदर्शनात मिळतात.
 • हॅण्डमेड पादत्राणे पारंपरिक कौशल्य आणि मॉडर्न स्टाइल वापरून तयार केली जातात. 
 • ही पादत्राणे तयार करण्यासाठी कौशल्य असलेल्या व्यक्ती काम करत असल्याने सामान्य पादत्राणांपेक्षा थोडी महाग असतात. यांची सुरुवात साधारण ७०० रुपयांपासून पुढे दोन-तीन हजार रुपयांपर्यंतदेखील किंमत असते.

संबंधित बातम्या