पायांचे सौंदर्य खुलवणारे पैंजण

समृद्धी धायगुडे
सोमवार, 20 मे 2019

ट्रेंड्‌स
महिलांचे आणि दागिन्यांचे जुने आणि घनिष्ठ नाते आहे. या नात्यामध्ये आधुनिक डिझाईन्सची भर पडत गेली आणि ते कालानुरूप बदलत पुढच्या पिढीपर्यंत पोचले. स्त्रियांच्या शृंगारातील एक भाग असलेले पारंपरिक पैंजण लहानपणापासून आपण वेगवेगळ्या रूपात घालतो. याच पैंजणांमध्ये नवनव्या डिझाईन्सची इतकी भर पडली आहे, की महाविद्यालयीन तरुणीदेखील तितक्‍याच आवडीने हे पायामध्ये घालतात. या दागिन्यांच्या बदलत्या ट्रेंडविषयी थोडे जाणून घेऊ.   

  • काही वर्षांपूर्वी पैंजणांचा वापर थोडा मागे पडला होता. पण आता त्यामध्ये आलेले वैविध्य बघता ते लहान मुलींपासून तरुणी, मोठ्या महिलांपर्यंत प्रत्येकीच्या पायांमध्ये हमखास दिसतेच. आजही घरामध्ये लहान मूल जन्माला आले, की त्याच्या पायात घालण्यासाठी वाळे, कडी, पैंजण भेट म्हणून दिली जातात.     
  • नवविवाहिता विशेषतः आपल्या लग्नाच्या दिवशी आणि विविध कार्यक्रमांमध्ये भारदस्त आणि उठावदार पैंजणांची निवड करते. नववधूचा पेहराव पैंजणांशिवाय पूर्णच होत नाही. आजही लग्नांमध्ये मुली वजनदार पैंजण घालतात. 
  • हिंदू धर्मात शक्‍यतो सोन्याचे दागिने पायात घालत नाहीत, त्यामुळे चांदीच्या पैंजणांना मोठी मागणी आहे. याशिवाय लाकडाच्या, प्लॅस्टिकच्या अँकलेट्‌सना मागणी वाढत आहे. सध्या नाजूक अँकलेट्‌स दोन्ही नाही, तर एकाच पायामध्ये घालण्याचा ट्रेंड आहे. 
  • ही अँकलेट्‌स फॉर्मल, कॅज्युअल वेअरवर घालण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. हल्ली मुली केप्री, शॉर्टस, जीन्स, सूट, साडी या सर्व प्रकारच्या पेहरावावर अँकलेट्‌स घालतात, त्यामुळे एकदम कुल लुक मिळतो. याबरोबर तुम्ही कोणतेही फूटवेअर, जसे की फ्लिपफ्लॉप, सॅन्डल, हिल्स सहज वापरू शकता. मात्र, अँकलेट्‌स बेली शूजबरोबर घालणे टाळावे.         
  • सर्व प्रकारच्या पेहरावावर घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स असल्यामुळे हळूहळू घुंगरू असलेल्या पैंजणांचा ट्रेंड कमी दिसतो. मात्र, विवाहित तरुणींसाठी जोडवी आणि पैंजण असा एकत्रित प्रकारदेखील बाजारात आलेला दिसतो. हे दोन्ही एका चेनने जोडलेले असतात. 
  • जेम स्टोन, ग्लास बीड्‌स, रंगीत मोती, गोल्ड प्लेटेड बीड्‌स तसेच स्वोरोस्कीची क्रिस्टलचे पैंजण तरुणींना भुरळ घालतात. नववधूंना खूप भारदस्त नको असतील, तरी सिंगल कुंदनचे पैंजण उठावदार दिसतात.    
     

संबंधित बातम्या