छोट्या केसांची हेअर स्टाइल

समृद्धी धायगुडे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

ट्रेंड्‌स
तरुणींच्या सौंदर्यात महत्त्वाचा भाग म्हणजे केस. पण केसांची देखभाल करणे सगळ्याच तरुणींना आवडते किंवा जमतेच असे नाही. त्यामुळे बऱ्याचजणी केसांची देखभाल चांगली व्हावी, यासाठी केसांची लांबी कमी ठेवतात. मात्र अशा केसांची स्टाइल करायची असल्यास काही बॉलिवूड अभिनेत्रींचे हेअरकट्स नक्की ट्राय करा...

  • तुमचे केस लांब असतील, तर तुम्ही हवी ती हेअरस्टाइल करू शकता. पण लहान केसांची केशरचना करणे थोडे अवघड जाते. जर तुमचे केस लहान असतील आणि मनात हेअरस्टाइलचा गोंधळ होत असेल, तर या माहितीमुळे तुमचा गोंधळ नक्की कमी होईल.  
  • प्रत्येक वेळी त्याच त्याच केशरचना करून कंटाळला असाल, तर तुम्ही केस कर्ली किंवा स्ट्रेट करून घेऊ शकता. बॉलिवूडमध्ये कुठल्याही हेअरस्टाइलची फॅशन आली, की ती आपल्यापर्यंत पोचायला फारसा वेळ जात नाही. यात करिना कपूर, तापसी पन्नू, यामी गौतमी या अभिनेत्रींच्या हेअरस्टाइल्स जास्त लोकप्रिय आहेत.     
  • तुमचे केस खांद्यापर्यंत असतील, तर करिनासारखे मेसी पोनीटेल बांधू शकता. एका बाजूला घातलेली वेणीपण छान दिसते. 
  • मंदिरा बेदीसारखी केशरचना असेल, तर तुम्ही बरेच प्रयोग करू शकता. मंदिरासारखा पिक्सी हेअरकट स्टायलीश दिसतो. साडी असो किंवा फॉर्मल वेअर, सर्व प्रकारच्या पेहरावावर उठून दिसतो. या हेअरकटची खासियत म्हणजे हा हेअरकटला देखभालदेखील कमी करावी लागते. परफेक्ट मॉडर्न वूमन दिसण्यासाठी हा हेअरकट ट्राय कराच.  
  • यामी गौतमीने नुकतेच तिच्या काही चित्रपटांसाठी आणि जाहिरातींसाठी शॉर्ट हेअर केलेले दिसतात. अर्थातच ही केशरचना खूपच क्युट दिसते. या प्रकारच्या केशरचना चांगल्या प्रकारे कॅरी करू शकता.   
  • तापसी पन्नूचा बोल्ड लूक असो किंवा पारंपरिक, ती शॉर्ट हेअर्समध्ये दिसते. विशेषतः कुरळ्या केसांमध्ये दिसते. जर तुमचेही केस असेच असतील, तर तुम्हीदेखील अशा प्रकारची केशरचना करून हवा तसा लुक मिळवू शकता.      
  • कंगनाच्या कुरळ्या केसांच्या केशरचना सर्व प्रकारच्या पारंपरिक, पाश्चात्त्य पेहरावावर उठून दिसतात.
     

संबंधित बातम्या